संत तुकाराम महाराजांचे कनिष्ठ चिरंजीव श्री नारायण महाराजांनी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा जसा सुरू केला तसाच तो पुढच्या काळात धीरोदात्तपणे सुरू ठेवल्याचेही लक्षात येते. सन १७१० चे सुमारास मोठा दुष्काळ पडला, त्या वेळी हा पालखी सोहळा कसा सुरू ठेवायचा किंवा देहू गावामध्ये लोकांची उपासमार कशी थांबवायची हा एक प्रश्न निर्माण झाला, अशा प्रसंगी संत तुकाराम महाराजांचा आदर्श घेऊन श्री नारायण महाराजांनी आपल्या स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवले, आपल्या घरातील सर्व चीजवस्तूंचा वापर करून त्यांनी त्यावेळेस या पालखी सोहळ्यासाठी लागणाऱ्या गोष्टी जमवल्या, अन्नछत्र चालवले, पुजा -अर्चा व यात्रा चालू ठेवली. त्याचप्रमाणे गावातील लोकांना काम मिळावे म्हणून विठ्ठल मंदिराचा जीर्णोद्धार करण्यास सुरुवात केली व आपल्या जवळ जे काही आहे ते सगळे या कामासाठी वापरले. याच वेळेस छत्रपती शाहू महाराजांनी तसेच फलटणचे निंबाळकर व तळेगावचे दाभाडे यांनीही या कामासाठी मदत केली. अशा प्रकारे हा पालखी सोहळा बंद पडू नये यासाठी नारायण महाराजांनी कष्ट घेतल्याचे दिसते.
सन १६८० मध्ये श्री.नारायण महाराजांनी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांचा संयुक्त पालखी सोहळा सुरू केला व तो सन १८३५ पर्यंत अव्याहतपणे चालू होता. मात्र श्री.हैबतबाबा यांनी सन १८३५ मध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा स्वतंत्रपणे पालखी सोहळा सुरू केला, तरीही संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांचे पालखी सोहळे पंढरपूरकडे एकाच वाटेने येत असत. दोन्ही पालखी सोहळ्यांच्यामध्ये असणाऱ्या दिंड्यांची संख्या वाढल्यामुळे व दिंड्यामधील वारकऱ्यांची संख्या वाढल्यामुळे सन १९३५-३६ मध्ये संत तुकाराम महाराजांची पालखी हडपसरहून वेगळ्या मार्गाने म्हणजे सोलापूर रस्त्याने पंढरपूरकडे यायला सुरुवात झाली. सध्या ही पालखी हडपसर – चौफुला – बारामती – अकलूज – महाळुंग – तोंडले-बोंडले – भंडीशेगाव या मार्गाने येते व याच मार्गाने परत जाते.(क्रमशः)
– डॉ.सचिन वसंतराव लादे, पंढरपूर
मो.क्र. ७५८८२१६५२६