पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास(भाग १२ )

पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास
पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा शेवटचा मुक्काम पंढरपूर जवळील वाखरी येथे असतो. तेथून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी बरोबरच महाराष्ट्राच्या इतर भागातून आलेल्या पालख्या देखील पंढरपुरात आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी प्रवेश करतात. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ऐश्वर्याने पंढरपुरात प्रवेश करावी असे वाटल्याने पंढरपुरातील एक भगवद्भक्त श्री कृष्णाजी बाळकृष्ण भाटे तथा श्री बाबुराव भाटे यांनी वाखरीतून पंढरपूरला पालखी नेण्यासाठी रथ तयार केला, याच रथातून आजपर्यंत पालखी पंढरपूरला येत असते. ही पालखी विसाव्यावर आली की आळंदीपासून पालखीत असणाऱ्या श्री माऊलींच्या पादुका पूजा-आरती करून एका स्वच्छ रुमालात बांधून तो रुमाल श्री शितोळे सरदार यांच्या गळ्यात बांधतात, तो पूर्वी डोक्यावर बांधला जात. श्री शितोळे सरदार त्या पादुका घेऊन पुढे पंढरपूरकडे चालत येतात, कारण पांडुरंगाच्या भेटीला जाणाऱ्या माऊलीने रथात बसून कसे जावयाचे म्हणून विसाव्यापासून त्या पादुका घेऊन शितोळे सरदार चालत येतात.  श्री शितोळे सरदार यांचे बरोबर एका बाजूने श्री.वासकर महाराज तर दुसऱ्या बाजूने श्री.आरफळकर हे चालत येतात. या पद्धतीने पंढरपूरमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पोहोचते.

अधिक वाचा  कविता शब्दांचा खेळ; तिच्यात विकार नसावा -राजन लाखे : 'एमआयटी एडीटी' विद्यापीठात रंगली 'अनंत' काव्यमैफिल

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा तुकाराम महाराजांचे कनिष्ठ चिरंजीव श्री नारायण महाराज यांनी सन १६८० मध्ये सुरू केला, याच सुमारास एक वेगळी घटना घडल्याचा इतिहास देखील आहे. सन१६८१-८२ च्या सुमारास ही घटना घडली आहे. देहू पासून जवळच सांगुडी म्हणून एक गाव आहे, या गावात सेनापती दाभाडे यांचा सरदार लोदीखान पठाण राहत होता, या पठाणाने वारकऱ्यांना व तुकाराम महाराज पालखी सोहळ्यास त्रास द्यायला सुरुवात केली व आसपासची गावेही लुटायला सुरुवात केली.

   मऊ मेणाहूनी आम्ही विष्णुदास |

    कठीण वज्राशी भेदू ऐसे ॥

     भले तरी देऊ कासेची लंगोटी I

     नाठाळाच्या माथी हाणू काठी ॥

असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे, याचाच अवलंब नारायण महाराजांनी करायचे ठरवून त्यांनी सभोवतालच्या गावातील लोकांना एकत्र जमवून लोदीखान पठाण याचेवर हल्ला केला, लोदीखानचा पराभव झाला, त्या गावातून पठाणाचे पूर्ण उच्चाटन झाले, आजही त्या गावात एकही मुस्लिम घर नाही पण गावाबाहेर एक हजार कबरी आहेत असे सांगितले जाते. असा एक वेगळा प्रसंग संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्या बरोबर जोडला जातो.(क्रमशः)

अधिक वाचा  खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला: पुणेकरांना सतर्कतेचा इशारा!

 – डॉ सचिन वसंतराव लादे, पंढरपूर

मो.क्र. ७५८८२१६५२६

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love