दिव्यदुर्गा : जागर दिव्यदुर्गांचा : जिद्दी मेधाताई

दिव्यदुर्गा : जागर दिव्यदुर्गांचा : जिद्दी मेधाताई
दिव्यदुर्गा : जागर दिव्यदुर्गांचा : जिद्दी मेधाताई

शारदीय नवरात्रोत्सव सुरु झाले आहे. चैतन्याने बहरलेल्या सृष्टीत आपण समरसून हा सोहळा साजरा करतो. या नवरात्री उत्सवात आपल्याला यंदा दिव्यदुर्गा भेटणार आहेत.

निसर्गतः किंवा अन्य काही कारणाने दिव्यांगत्व आले असले तरी त्याची कमतरता न मानता न्युनत्वावर मात करत आपल्या उच्च मनोबलाच्या आधारे पराकोटीचे असामान्य कर्तृत्व अनेक महिलांनी सिद्ध केले  आहे. ज्ञानाचे भांडार असलेल्या, आपल्या स्वतःच्या पायावर उभ्याअसणाऱ्या, इतरांच्याही जीवनात मोलाची भर टाकणाऱ्या शक्तीची पूजा करणाऱ्या स्वयंप्रेरित अशा दिव्यदुर्गांचा जागर …

श्रीमती मेधा नारायण कुलकर्णी,

संस्थापिका – मेक माय ड्रीम फाउंडेशन

 

जिद्दी मेधाताई

मनात जिद्द, आत्मविश्वास आणि  काही तरी करून दाखवायचा निर्धार असेल तर कोणत्याही प्रकारचे  अडथळे  (दिव्यांगत्व) आपल्याला यशाची शिखरे पादाक्रांत करण्यापासून रोखू शकत नाही, असे धडाडीने सांगणाऱ्या, जन्मत:च दोन ही  हात नसतांना  ही आज अनेकांना मदतीचा, प्रेरणेचा हात देऊन स्वत:च्या पायावर उभे रहाण्याची उमेद देणाऱ्या मेधाताईची ही कथा…

अधिक वाचा  आरक्षणप्रश्नी सर्वपक्षीय बैठक बोलवावी : शरद पवार यांची सूचना, केंद्राने लक्ष घालण्याचे आवाहन

श्रीमती मेधा नारायण कुलकर्णी, मेक माय ड्रीम फाउंडेशन या  शारिरीकदृष्ट्या दिव्यांग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांचे पुनर्वसन करणाऱ्या संस्थेच्या संस्थापिका. सांगली जवळील मिरज येथे जन्मलेल्या मेधाताईंना  निसर्गाने जन्मत:च अपंगत्व दिले. पण त्याचा बाऊ न करता, आहे ते स्वीकारून त्या जिद्दीने उभ्या राहिल्या. मिरजेतील महाविद्यालयातून बी. कॉम. पर्यंतचे शिक्षण घेत असतांनाच त्यांनी जपानी भाषा अवगत करून घेत सिल्वर मेडल मिळवले. पुढे बँकेच्या परीक्षा देऊन २३ वर्ष सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये  सरकारी नोकरी केली.

कुटुंबियांची साथ, आर्थिक सुबत्ता सर्व काही आलबेल असतानाही  त्यांच्या मनात मात्र  काहीतरी वेगळंच सुरू होतं ..आपल्या सारख्याच (दिव्यांग) बंधूभगिनींसाठी काही तरी करण्याची उर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. बँकेतील सरकारी नोकरी अर्ध्यात सोडून   वयाच्या ४३ व्या वर्षी त्यांनी मेक माय ड्रीम फाऊंडेशनची स्थापना केली.

अधिक वाचा  रोहन भोसले आणि पिंटू साव यांच्या नव्या हिंदी चित्रपटाचा पोस्टर लाँच

मेधा ताई सांगत होत्या, विविध प्रकारच्या दिव्यांग  पोलिओ ग्रस्त, अपंग, कर्णबधिर, मूकबधिर, अंध, सेलेब्रल पाल्सी आदि बंधू भगिनींना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्याची गरज आहे.  त्यांचे शारिरीक तथा  मानसिक सक्षमीकरण करणे, त्यांच्यासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती करणे आवश्यक होते. याची  गरज लक्षात घेऊन  २००९ मध्ये  मेधाताईंनी  संस्थेची स्थापना केली. दिव्यांगांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी, स्वावलंबी, आत्मनिर्भर  बनविण्यासाठी ही संस्था काम करते. किमान इयत्ता  दहावी पास झालेल्या दिव्यांगांना मार्गदर्शन करत आत्मनिर्भर बनवते.

सुरवातीला २ मुलांचे समुपदेशन करत सुरू झालेला हा मेधाताईचा प्रवास आज विविध उपक्रमांनी विस्तारला   आहे. विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार,  क्षमतेनुसार  त्यांच्या उपजत  कलेची जाणीव करून दिली जाते. स्वत:च्या  क्षमतेवर जीवनाचा मार्ग निवडण्यासाठी समुपदेशन करत स्वत:ची  लढाई स्वत: लढण्यासाठी  प्रेरणा  देण्याचे काम त्या २००९ पासून करीत आहेत. आजवर या संस्थेने ८० हून अधिक दिव्यांगांचे पुनर्वसन केले आहे.

अधिक वाचा  राष्ट्रीय एकतेचे बीज पेरण्यासाठी देशात प्रथमच ११ गणेश मंडळांच्या संयुक्त मिरवणुकीचा नवा पायंडा

त्यांचे विविध प्रश्न समाजापुढे मांडत, आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणे, कमावत्या मुलांना बिनव्याजी वाहन कर्ज मिळवून देणे,  कर्णबधिरांना  श्रवणयंत्र उपलब्ध करून देणे,  विविध प्रकारच्या  मदत असे अनेक उपक्रम संस्थेमार्फत राबविले जातात.  त्यासाठी  विविध ठिकाणी शिबिरे घेतली जातात.

जिद्द,चिकाटी आणि आत्मविश्वास  असेल तर कोणतेही शिखर कठीण नाही याची  जाणीव करून देण्यासाठी  त्या अनेक वर्षांपासून दिव्यांगांसाठी ट्रेकिंगचे, वॉकेथानचेही आयोजन करतात.

मेक माय ड्रीम  फाऊंडेशनच्या माध्यमातून दिव्यागांचे सर्व  प्रश्न एकाच छताखाली सुटावे, त्यांची  निवासाची, भोजनाची, व्यावसायिक प्रशिक्षणाची सुविधा एकाच ठिकाणी  असावी यासाठी सुसज्ज गुरुकुल उभारण्याचे स्वप्न  सत्यात उतरविण्यासाठी  मेधाताई  सध्या धडपडत आहे. त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा.

लेखक – अपर्णा महाशब्दे पाटील

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love