पुणे: नांदे (सुस) येथील आयएसबीएम कॉलेज ऑफ इंजिनियरींगच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी विभागाच्या पीपल्स एम्पॉवरमेंट ग्रुप तर्फे तीन दिवसीय ‘ इमर्जिंग ट्रेन्ड्स अँड टेक्नॉलॉजी’ (आयसीईटीटी – २६) वर दिनांक २६ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे.
या परिषदेचे उद्घाटन २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० वा. नांदे येथील आयएसबीएम कॉलेजमध्ये होणार आहे. इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्यूकेशन महाराष्ट्र व गोवाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह काकासो देसाई हे उद्घाटक म्हणून असतील.
थायलंडमधील उत्तरादित राजाभात विद्यापीठातील शिक्षण संशोधक अध्यापिका व आंतरराष्ट्रीय शिक्षण राजदूत वालिदा औनरुएन या सन्माननीय प्रमुख पाहुणे असतील. तसेच इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्यूकेशन महाराष्ट्र व गोवाचे कार्यकारी परिषद सदस्य डॉ. अशोक मोरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयएसबीएम शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद कुमार असतील.
आयोजित परिषदेचा मुख्य उद्देश्य हा संशोधक, शिक्षणतज्ज्ञ, उद्योग व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, कम्युनिकेशन सिस्टम्स, रिन्यूएबल एनर्जी, बायोमेडिकल इंजिनिअरिंग, सायबर सुरक्षा, व्यवस्थापन आणि इतर उदयोन्मुख डोमेन या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संशोधन, तांत्रिक प्रगती आणि आंतरविद्याशाखीय कल्पना सामायिक करण्यासाठी एक गतिमान व्यासपीठ प्रदान करणे हा आहे.
या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ञांची प्रमुख मार्गदर्शनपर भाषणे, १० विशेष ट्रॅकवर तांत्रिक पेपर सादरीकरणे, हायब्रिड आणि ऑनलाइन तांत्रिक सत्रे होतील.
शैक्षणिक उत्कृष्टता आणि उद्योग सहकार्याला चालना मिळण्यासाठी या परिषदेत भारत आणि परदेशातील शेकडो संशोधकांचा सहभाग होईल.
या परिषदेचे मुख्य समन्वयक आयएसबीएमचे प्राचार्य डॉ. पंकज कुमार श्रीवास्तव, डॉ. ए. एम. सपकाळ, प्रा. सिताराम लोंगानी आणि प्रा. नेहा सिंग आहेत.













