पुणे(प्रतिनिधि)–‘क्षमा, शौर्य, धर्म आणि नीती या तत्वांचा समावेश असलेला हा पुरस्कार एक ऊर्जा आहे. आपापल्या क्षेत्रात अमूल्य योगदान देऊन समाजाला प्रेरणा देणाऱ्या नारीशक्तीचा हा विशेष सन्मान आहे. मूल्य, मातृत्वप्रेम आणि वारकरी संप्रदायाचे हे प्रतीक आहे. दूरदृष्टी ठेवून विश्वधर्मी डॉ. कराड यांनी नारीशक्तीच्या गौरवासाठी सुरू केलेल्या या पुरस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांनी आधुनिक काळात नव्याने सशक्तीकरणाच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली,’ असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष व शास्त्रज्ञ डॉ. भूषण पटवर्धन यांनी केले.
‘त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव राष्ट्रीय पुरस्कार’ सोहळा संपन्न
विश्वशांती केंद्र (आळंदी) आणि माईर्स एमआयटी, पुणे यांच्या वतीने विश्वधर्मी मानवतातीर्थ रामेश्वर (रूई), ता.जि. लातूर येथे त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड यांच्या १२ व्या पुण्यस्मरण स्मृतिदिनाचे औचित्य साधून ‘पूर्णब्रह्मायोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव राष्ट्रीय पुरस्कार’ वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्यात डॉ. भूषण पटवर्धन प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. बडोदा संस्थानचे जितेंद्रसिंह गायकवाड विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड अध्यक्षस्थानी होते.
पंचकन्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
याप्रसंगी समाजाला आदर्श घालून देणाऱ्या बडोदा संस्थानच्या महाराणी सौ. आशाराजे संग्रामसिंहराजे गायकवाड, ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती भारती ठाकूर (राजस्थान), राजयोगिनी डॉ. बिन्नी सरीन (राजस्थान), शिक्षिका व समाजसेविका श्रीमती दमयंती जितवान (उत्तराखंड) आणि श्रीमती रमाबाई किसन महाराज साखरे (आळंदी) (श्रीमती कुलकर्णी यांच्या वतीने) या पंचकन्यांना ‘पूर्णब्रह्मायोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, स्मृतिपदक व रोख रु. १,२५,०००/- असे पुरस्काराचे स्वरूप होते.
याव्यतिरिक्त, जितेंद्रसिंह गायकवाड आणि डॉ. भूषण पटवर्धन यांनाही जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने डॉ. बिन्नी सरीन यांच्या हस्ते प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
मान्यवरांचे विचार आणि ठराव
डॉ. भूषण पटवर्धन यांनी महिलांच्या सन्मानाचे महत्त्व अधोरेखित केले, तर प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी रामेश्वर गावाचे ‘विश्वधर्मी मानवता तीर्थ’ म्हणून झालेले रूपांतर आणि अक्कांचे कार्य यावर प्रकाश टाकला. जितेंद्रसिंह गायकवाड यांनी कराड सरांच्या दूरदृष्टीची प्रशंसा करत आपल्या आनंदाचे प्रदर्शन केले. पुरस्कार प्राप्त पंचकन्यांनीही आपल्या भावना व्यक्त करत अक्कांच्या प्रेरणेने कार्य करण्याची ग्वाही दिली.
यावेळी डॉ. एस.एन.पठाण यांनी सर्वसंमतीने एक महत्त्वपूर्ण ठराव मांडला. त्यानुसार, ‘हिंदुत्व याचा अर्थ भारतीय एकात्मता आणि या माध्यमातून सर्व जाती धर्मांच्या लोकांमध्ये बंधुत्व राहील, तसेच भारत देशात आणि संपूर्ण जगात विश्वशांतीसाठी कार्य करण्याचा आहे.’ प्रा. स्वाती कराड चाटे यांनी स्वागतपर भाषणात अक्कांच्या कणखर व्यक्तिमत्त्वाला उजाळा दिला. डॉ. मिलींद पात्रे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सुचित्रा नागरे यांनी आभार मानले.