पुणे : “मासिक पाळीच्या काळात मुलींच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याला योगदान देण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि समर्थन खूप महत्वाचे आहे. शारीरिक स्तरावर मासिक पाळीदरम्यान योग्य स्वच्छता आणि आहार महत्वाचा असतो, तर मानसिक स्तरावर ताणाव कमी करण्यासाठी व्यायाम, योगा आणि संवाद उपयुक्त असतात.” असा सल्ला मिलेट्री नर्सींग सर्वीसेच्या अधिकार्यांनी दिला.
‘द एम्पॉवर हर फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘मासिक पाळी आरोग्य’ आणि ‘प्रथमोपचार’ या कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. संस्थेच्या हिरकणी योजने अंतर्गत दत्तक घेण्यात आलेल्या मुलींसाठी डेक्कन जिमखाना येथे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रथमोपचार या विषयावर डॉ. श्रद्धा सुंठवाल यांनी विशेष मार्गदर्शन केले.
याप्रसंगी ‘द एम्पॉवर हर फाउंडेशन’चे प्रमुख विश्वस्त, प्रसिद्ध भाषा तज्ज्ञ संदीप नुलकर, संचालिक रूपाली शिंदे-आगाशे व उप संचालिका तन्मयी खिरे उपस्थित होत्या.
सर्व मुलींना संपूर्ण वर्षभराचा सॅनिटरी पॅडचा साठा आणि एक प्रथमोपचार किट याचा मोफत वाटप करण्यात आला. याचे वितरण रणजी क्रिकेटर अमेय श्रीखंडे व आंतरराष्ट्रीय टेनिस खेळाडू जेनिफर लुइखाम यांच्या हस्ते करण्यात आले.
“मासिक पाळीच्या एक आठवडाआधी मुलींच्या शरीरात काही विशिष्ट बदल घडतांना दिसतात. काही जणींमध्ये सतत खात राहण्याची इच्छा होणे, मूड बदलणे, स्तन दुखणे, सतत रडू येणे किंवा तीव्र वेदना होणे यासारखी लक्षणे दिसतात. या लक्षणांवर उपचार करण्यासाठी योग्य प्रकारची वैद्यकीय मदत घेणे गरजेचे असते. मासिक पाळीच्या समावेशकता व स्वच्छतेच्या समस्येचे निराकरण करणे, पाळीबद्दल संवाद सुरू करणे, निषिद्धता तोडणे आणि या सामान्य शारीरिक कार्याभोवतीचा कलंक संपवणे महत्वाचे आहे. असे केलेल्याने आपण या बद्दलचे शिक्षण आणि अनुकूल स्वच्छता सुविधांच्या गरजेबद्दल जागरुकता वाढवू शकतो.”
“मासिक पाळीचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी, पाणी, स्वच्छता, सुविधा, परवडणारे आणि मसिक पाळीसाठी उपलब्ध असलेले स्वच्छता साहित्य, चांगल्या पद्धतींबद्दल माहिती आणि एक सहाय्यक वातावरण तयार करणे आवश्यक आहे.” असे ही उपस्थित तज्ज्ञांनी सांगितले.
डॉ. श्रध्दा सुंठवाल म्हणाल्या, “प्रथमोपचार म्हणजे एखाद्या आजारात आपत्कालीन परिस्थितीत विशिष्ट वैद्यकीय उपचार उपलब्ध होईपर्यंत केलेले उपचार. कापणे, खरचटणे, भाजणे, लचकणे, मुकामार लागणे, नाकातून रक्त येणे, चक्कर येणे, डोळ्यात काहीतरी जाणे, कुसळ जाणे, जनावर अथवा कीटक चावणे आणि रस्त्यावरील अपघात इत्यादी गोष्टींसाठी तत्काळ कृती करणे महत्वाचे असते. आपत्कालीन परिस्थितीत जर निर्जंतुक करणारे द्रव आणि बॅडेजस उपलब्ध नसतील तर स्वच्छ हात धुवावे व स्वच्छ पाण्याचा उपयोग करावा. आग लागल्यास ताबडतोब त्या व्यक्तीला ब्लँकेट मध्ये गुंडाळावे. विजेचा शॉक लागल्यास मेन स्विच बंद करावे, विषबाधा झाल्यास त्या व्यक्तीला ओकार्या काढायला लावू नये असा सल्ला देण्यात आला.”
संदीप नुलकर म्हणाले, “संस्थे तर्फे तुम्हाला जी मदत केली जात आहे त्याकडे तुम्ही उपकार म्हणून पाहू नका अथवा त्या दडपणाखाली पण राहू नका. तुम्हाला मदत करणे हे उपकार नसून आमचे सामाजिक कर्तव्य आहे. संस्थेच्या माध्यमातून सतत मदतीचा हाथ समोर आहेच मात्र मुलींनी व त्यांच्या पालकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. संस्था मुलींचे शिक्षण, छंद वर्ग, खेळाचे प्रशिक्षण याचा खर्च करणार असून त्यांच्या वैद्यकीय सुरक्षिततेसाठी कॅशलेस पॉलिसी काढली आहे. नुलकरांनी समाजातील सर्व दानशुरांना सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन केले.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ‘द एम्पॉवर हर फाउंडेशन’चे विश्वस्त संदीप नुलकर यांनी केले.