पुणे: आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एआयटी) या संस्थेचा ३१ व्या दिवसानिमित्त दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इसरो) माजी अध्यक्ष डॉ. के. सिवन यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच ‘द सक्सेसफुल यंग आंत्रप्रेन्युअर पुरस्कार’ २००२ च्या तुकडीचे माजी विद्यार्थी प्रीतपालसिंग यांना दिला जाणार आहे.
लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, हा समारंभ येत्या सोमवारी (ता. २४) दुपारी ४.४५ वाजता रमण सभागृह, एआयटी दिघी कॅम्पस, पुणे येथे होणार आहे.
स्थापना दिनानिमित्त सीओएएस अष्टपैलू विद्यार्थी फिरता करंडक, सर्वोत्कृष्ट नवकल्पनेसाठी देण्यात येणारी राजपूत रेजिमेंट ट्राॅफी, ‘जीओसी इन सी’ सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी पुरस्कार, सर्वोत्कृष्ट विद्यार्थी क्रीडापटूसाठी राजशेखर ट्राॅफी, सर्वोत्कृष्ट संशोधन, सल्लासेवा, अध्यापन तसेच शिक्षकेतर उत्तम कार्यासाठीही पुरस्कार दिले जाणार आहेत. ‘एआयटी’ ही निवासी स्वरुपाची संस्था असून, ३० एकरांच्या निसर्गरम्य परिसरात वसली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीचे ध्येय साध्य करण्यासाठी संस्थेत अनेक क्लब्ज, अभ्यासक्रमाला पूरक उपक्रम चालवले जातात. संस्थेचे पुणे विभागात बेस्ट प्लेसमेंटचे रेकार्ड आहे. दरवर्षी मायक्रोसॉफ्ट, गूगल, अमेझॉन, मास्टरकार्ड, बीएनवाय मेलन, डाईश इंडिया, लार्सन अंड टुब्रो, गोदरेज अशा बहुराष्ट्रीय कंपन्यांमधून संस्थेचे विद्यार्थी प्लेसमेंट मिळवत आहेत, अशी माहिती ‘एआयटी’चे संचालक ब्रिगेडियर (नि.) अभय भट यांनी दिली.
आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना तत्कालीन लष्करप्रमुख जनरल बी. सी. जोशी यांच्या दूरदर्शी नेतृत्वातून झाली. लष्कराच्या सर्व शाखांमध्ये कार्यरत असणाऱ्या युवांसाठी अभियांत्रिकी पदवीचे रीतसर शिक्षण गरजेचे असल्याचे हेरून, सुरवातीला संगणक अभियांत्रिकी, इलेक्ट्रानिक्स अॅंड टेलिकम्यूनिकेशन इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग, अशा तीन विद्याशाखांचे पदवी शिक्षण १९९४ मध्ये सुरू झाले. तेव्हा प्रत्येक विद्याशाखेची प्रवेशक्षमता ६० विद्यार्थी इतकी होती. आज एआयटीमध्ये एकूण पाच विद्याशाखांमध्ये प्रत्येकी ४८० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संगणक, आयटी, इलेक्ट्रानिक्स अंड टेलिकम्यूनिकेशन, मेकॅनिकल आणि ऑटोमेशन व रोबोटिक्स, अशा पाच विद्याशाखा सुरू असून, याशिवाय डाटा सायन्स या विषयात पदव्युत्तर पदवीची सोयही आहे, असेही त्यांनी नमूद केले.