पुणे: स्त्रीवादी लेखिका विद्युत भागवत यांचे गुरुवारी हृद्याविकराच्या धक्क्याने निधन झाले. त्या ७७ वर्षांच्या होत्या. पती रवी,एक मुलगी,जावई ,दोन नातू असा परिवार त्यांच्या मागे आहे. शनिवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
विद्युत भागवत या पुण्यातील स्त्रीवादी,प्रतिथयश लेखिका आणि कार्यकर्त्या होत्या.भारतात अग्रणी असणाऱ्या पुणे विद्यापीठातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्राच्या त्या संस्थापक संचालक होत्या.
विद्युत भागवत या स्त्रीवादी अभ्यासक, लेखिका आणि कार्यकर्त्या म्हणून महाराष्ट्र,महाराष्ट्राबाहेर सुद्धा प्रसिध्द आहेत. गेल्या३५हून अधिक वर्षे त्या महाराष्ट्रातील महिला, विद्यार्थी, दलित आणि शेतकर्यांच्या चळवळींशी संबंधित होत्या. महिलांविषयक अभ्यासाला स्वतंत्र अभ्यास शाखा म्हणून घडविणाऱ्या विचारवंतांच्या यादीत त्यांचा समावेश होतो. त्यांचे स्त्रियांच्या प्रश्नांवरील लिखाण, स्त्रीवादी सिद्धांत आणि सामाजिक इतिहासावरील लिखाण गाजले आहे. शैक्षणिक लेखनाव्यतिरीक्त त्या वृत्तपत्रांतही लिहितात. कथा, कविता आणि कादंबरीलेखनासाठी त्या सुपरिचत होत्या.
भागवत यांचे व्यक्तित्व आणि वैचारिक भूमिकेतून स्त्रीवादाविषयीचे विविध पैलू उलगडतात. भाषाशास्त्र, साहित्य, समाजशास्त्र, शिक्षण आणि स्त्रीविषयक अभ्यास अशा विविध विषयांमध्ये त्या ज्ञानदान आणि संशोधनकार्यात व्यग्र होत्या.
विविध भारतीय भाषांमधील लेखिकांचे साहित्य एकत्र आणणार्या ‘विमेन्स रायटिंग इन इंडिया’ या प्रकल्पाच्या त्या संपादक होत्या. हा प्रकल्प भारतातील स्त्रीवादी अभ्यास प्रवासात महत्त्वाचा ठरला. हैदराबाद येथील ‘अन्वेषी’ या स्त्रीवादी संघटनेच्या कार्यालयात झालेल्या या प्रकल्पाचे सुझी थारू आणि के. ललिता यांनी नेतृत्व केले होते.
भागवत यांनी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमधून विपुल लेखन केले. सामाजिक चळवळी, मध्ययुगीन आणि आधुनिक महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास त्यातून मांडला गेला आहे. शिवाय स्रीवादी साहित्याच्या अभ्यास, स्त्रीवादी विचार आणि सिद्धांत, तसेच स्त्रीवादी अभ्यासशाखेच्या संदर्भाने येणारे प्रश्नही समोर आले आहेत. स्त्रीवादाचा मूळ स्त्रोत या दृष्टिकोनातून त्यांनी संत कवयित्रींच्या काव्यासंबंधीही अभ्यास केला आहे. महाराष्ट्रातील लिंगभेदविषयक सामाजिक इतिहासावर त्या सातत्याने लिहित असत.
भागवत यांनी महाराष्ट्रात झालेल्या अनेक सामाजिक चळवळींत सक्रीय सहभाग घेतला. महिलांच्या चळवळींपासून ते दलित व गरीब शेतकर्यांच्या चळवळींपर्यंत त्यांनी त्यांचा बारकाईने अभ्यासही केला. ऐतिहासिक, साहित्यिक आणि लिंगभेदाबाबत लिहिताना प्रदेश हा विभाग महत्त्वाचा असतो, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. अनेक भाषांतर प्रकल्पांमध्येही भागवत यांचा सक्रीय सहभाग असल्याचे दिसते.
मराठी ही ज्ञानभाषा व्हावी, या दृष्टीने त्या सातत्याने लिखाण करीत असत. विद्यापीठात शिकवत असताना लिंगभेद, भारतीय समाज, जागतिकीकरण व आंतरराष्ट्रीय आदानप्रदान, सामाजिक न्याय यांसारखे विषय त्या कल्पकतेने मांडत असत. महाराष्ट्रातील जातविरोधी, शेतकरी आणि महिला चळवळींतील सक्रीय सहभागाचा त्यांच्या संशोधन आणि शिकवण्यावर पगडा होता. सरकारी आश्रमांत बौद्धिकदृष्ट्या अक्षम महिलांची संततीनियमन शस्त्रक्रीया केली जाते, या प्रश्नाची गंभीर दखल घेत त्यांनी पुस्तकी ज्ञान आणि चळवळ यातील तफावत दूर करण्याचे बरेच प्रयत्न केले.
‘मानववंशशास्त्रातील लिंगभावाची शोधमोहीम’, ‘वाढत्या मूलतत्त्ववादाला शह, सुसंवादी लोकशाहीच्या दिशेने’ (या लेखमालेचे संपादन) आणि ‘फेमिनिस्ट सोशल थॉट्स’ ही त्यांची महत्त्वाची पुस्तके आहेत. भागवत यांची पहिली कादंबरी ‘आरपारावलोकिता’ २० एप्रिल २०१९ रोजी हरिती प्रकाशनाने प्रकाशित केली. या कादंबरीत महाराष्ट्रातील स्त्री-प्रश्नाची गुंतागुंत आहे.
भागवत यांना ‘स्त्री प्रश्नाची वाटचाल’ या पुस्तकाच्या लेखनासाठी २००४–०५ सालचा समाजविज्ञान कोश पुरस्कार मिळाला. त्यांना २००६ सालच्या महाराष्ट्र सारस्वत गौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.