पुणे : स्वमग्न मुलांचे तारुण्यातील पदार्पण सर्वसाधारण मुलांपेक्षा अधिक आव्हानात्मक असते. मात्र, योग्य पूर्वतयारी, पालकांमधील सामंजस्य आणि पाल्यामधील सकारात्मक बाबींवरील विश्वास, ही त्रिसूत्री अमलात आणल्यास हे आव्हान प्रयत्नपूर्वक हाताळता येते, असे प्रतिपादन स्वमग्न मुलांवरील उपचार आणि वर्तणूक तज्ज्ञांनी केले.
‘वैखरी स्पीच थेरपी क्लिनिक’च्या वतीने आयोजित ‘ग्रोईंग अप वुईथ ऑटिझम’ या मुक्त चर्चासत्रामध्ये ऑक्युपेशनल थेरपिस्ट अंजली जोशी, बालमानसशास्त्र तज्ज्ञ पल्लवी इनामदार, बालरोगतज्ज्ञ व अॅडॉलेसन्ट फिजिशियन डॉ. वैशाली देशमुख यांनी आपले विचार मांडले. स्पीच लँग्वेज विशेषज्ञ वेदाली इनामदार यांनी चर्चेचे संयोजन केले. स्वमग्न मुलगे व मुली तारुण्यात पदार्पण करताना निर्माण होणारी शारीरिक, लैंगिक, वर्तणूकविषयक आणि तारुण्यसुलभ संवेदनाविषयक आव्हाने कशी हाताळावीत, अशी या चर्चेची मध्यवर्ती संकल्पना होती.
मयूर कॉलनी, कर्वे रस्ता येथील बालशिक्षण सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला डॉ. ज्योत्स्ना पडळकर, डॉ. सुनील गोडबोले, डॉ. सुनंदा आगाशे, डॉ. रश्मी गुपचुप, डॉ. अनुराधा माईणकर आदी स्पीच थेरपिस्ट, बालरोगतज्ज्ञ, बालमानसशास्त्र तज्ज्ञ आदींसह केईएम रुग्णालयाच्या टीडीएच विभागाचे प्रमुख बिंदू पटनी, ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ डॉ अनाल्पा परांजपे, शुभदा पेंढारकर, स्वमग्न मुलांचे पालक व अन्य नातेवाईक उपस्थित होते.
डॉ. देशमुख यांनी माहितीपूर्ण पारदर्शिकांच्या साह्याने स्वमग्न मुलामुलींच्या यौवनावस्थेतील आव्हानांची गुंतागुंत उलगडली. स्वमग्नताग्रस्त मुलांची पौंगडावस्था, त्या काळात झपाट्याने होणारे शारीरिक बदल स्वीकारणे, हे सर्वांत मोठे आव्हान असते, असे सांगून देशमुख म्हणाल्या, “स्वमग्न मुलांच्या पालकांनी या आव्हानाची पूर्वतयारी केली पाहिजे. लहान वयापासूनच टप्प्याटप्प्याने मुलांना स्वतःचे शरीर, विविध अवयव, त्यांची कार्ये, अवयवांची होणारी वाढ, तेव्हा संप्रेरकांत होणारे बदल, त्यांचे दृष्य परिणाम, तसेच शारीरिक स्वच्छतेच्या सवयी, भिन्न लिंगी व्यक्तीविषयी वाटणारे नैसर्गिक आकर्षण आणि तनामनात उठणारे कल्लोळ हे सारे कसे स्वीकारायचे याची तयारी आधीपासून करून घेणे योग्य ठरते.”
या काळातील शारीरिक, मानसिक, भावनिक आंदोलने तीव्र असतात. या आंदोलनांचे व्यवस्थापन शिकवणे, त्यांच्यात समतोल साधायला मदत करणे, ही पालकांची जबाबदारी आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मदतीने पालकांनी स्वमग्न मुलांशी सतत संवाद साधणे गरजेचे आहे. हा संवाद नेहमी सोप्या, सहज पण थेट भाषेत असला पाहिजे. त्यासाठी दृष्यमाध्यमाची मदत उपयुक्त ठरते, कारण स्वमग्न मुलांच्या दृक् संवेदना अधिक प्रभावी असतात, असे त्या म्हणाल्या.
अंजली जोशी यांनी स्वमग्न मुलांचे वेळापत्रक तंतोतंत पाळणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. ‘वारंवार, ठराविक वेळेला ठराविक गोष्टी करण्याची सवय ही मुले पटकन आत्मसात करतात आणि कधीही विसरत नाहीत. त्यांच्यातील सकारात्मक मुद्दे पालकांनी सतत पुढे आणले पाहिजेत. तसेच त्यांनी केलेल्या अयोग्य कृतीला सौम्य शिक्षा पण योग्य कृतीला पारितोषिक आणि कौतुकाचा नजराणा दिला पाहिजे. त्यातून योग्य तो संदेश ती स्वीकारतात. त्यांना सुरवातीपासून भरपूर शारीरिक हालचाली, क्रीडाप्रकार शिकवा. घरातल्या छोट्या कामांमध्ये त्यांच्यावर जबाबदारी सोपवा. तारुण्यात पदार्पण करत असताना, जी प्रचंड उर्जा त्यांच्यात निर्माण होत असते, ती सकारात्मक दिशेने वापरली जाईल, याची काळजी घ्या, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले.
इनामदार म्हणाल्या, ‘यौवनावस्थेत पदार्पण करणाऱ्या स्वमग्न मुलांना शरीरसाक्षर करणे, हे आव्हान पालकांनी आधीच्या वयापासूनच ओळखले पाहिजे. वयानुरूप होणारे शारीर बदल त्यांना आधीपासून सांगायला हवेत. मुख्य म्हणजे स्वमग्न मुलांना विविध कृतींसाठीचे अनेक पर्याय उपलब्ध केले पाहिजेत. त्यांनाही सर्वसाधारण मुलांप्रमाणेच वाट पाहण्याची सवय लावणे, नकार ऐकण्याची सवय करणे, स्वतःच्या खासगी अवयवांची स्वच्छता, सुरक्षा, गुड टच बड टच यांचे भान यांची जाणीव करून देणे आवश्यक आहे’.
अदिती विशाल यांनी सूत्रसंचालन केले तर प्राजक्ता मुळे यांनी पसायदान सादर केले.