पुणे- राजकवी भा.रा.तांबे (भास्कर रामचंद्र तांबे) यांच्या कविता वाचताना भविष्यवेत्ता किंवा द्रष्टा असल्याचा अनुभव येतो. त्यांच्या कवितांमध्ये कलावादी दृष्टी होती. तर स्वत: भा. रा. तांबे यांच्यामध्ये अभिजात लिनता होती. त्यांनी स्वत:च्या कविता छापून येण्यासाठी कधीही प्रयत्न केले नाहीत अशा शब्दांत प्रसिद्ध कवियित्री आणि समीक्षक प्रा. नीलिमा गुंडी यांनी राजकवी भा.रा.तांबे यांचा गौरव केला.
आधुनिक मराठीतील गीत काव्यांचे प्रवर्तक मानले जाणारे व दीड शतकाहून अधिक काळ आपल्या अजरामर कवितांनी मराठी मनावर राज्य करणारे, राजकवी भा.रा.तांबे (भास्कर रामचंद्र तांबे) यांच्या १५१ व्या जयंती वर्षानिमित्त २०२५ तांबे कुटुंबियांच्या वतीने ज्योत्स्ना भोळे सभागृहात ‘मधु मागसि माझ्या’ हा आदरांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रारंभी तांब्यांचे हस्तलिखित, त्यांना मिळालेला राजकवी पुरस्कार तसेच निवडक मानपत्रें आणि तत्कालीन छायाचित्रांचे छोटेसे प्रदर्शन, औपचारिक उदघाटन आणि तिसऱ्या भागात सृजनस्नेही पुणे निर्मित आणि सुधीर मोघे प्रस्तुत ‘स्मरण राजकवींचे’ हा भा. रा. तांबे यांच्या निवडक काव्य-गीतांवर आधारित कार्यक्रम सादर करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख वक्त्या व प्रसिद्ध कवियित्री आणि समीक्षक प्रा. नीलिमा गुंडी, कार्यक्रमाचे अध्यक्ष व ज्येष्ठ भावकवी आणि संत साहित्यिक श्री. वि. ग. सातपुते , भा.रा. तांबे यांचे नातू शिरीष तांबे, सौ. रश्मी तांबे, चुलत नातू प्रकाश तांबे, सौ. मनिषा सातवे, आणि कार्यक्रमाचे संयोजक सुधीर मोघे आदी मान्यवर उपस्थित होते.
भा. रा. तांबे यांच्या कविता वाचन करत त्यातील भावार्थ समजावून सांगत प्रा. नीलिमा गुंडी म्हणाल्या, कवी हा परंपरेशी आणि भाषेशी एकजीव झालेला असतो, याचा प्रत्यय भा.रा. तांबे यांच्या कविता वाचताना येतो. त्यांच्या कवितेमध्ये कलादृष्टीची सूक्ष्मता आहे. अतिशय नाजुक प्रकारचे पैलू उलगडून दाखवणे अवघड आहे. परंतु, भा. रा. तांबे यांनी ते त्यांच्या काव्यामधून केले आहे. आंतर्मुख, आत्मनिष्ठ वृत्ती ही कलावंतामध्ये दुर्मिळ असते, ती भा. रा. तांबे यांच्यामध्ये होती. ते जीवन रहस्याचा वेध घेणारे कवी होते. ते नेहेमी सौंदर्यात दडलेले रहस्य शोधायचे. त्यामुळे त्यांची कविता उत्स्फूर्त आणि सहज असायची असे सांगून गुंडी पुढे म्हणाल्या, त्यांच्या काव्यामध्ये भावगीत, दीर्घकाव्य, संवाद काव्य आहे, विविध गणवृत्त, विविध राग याचा अंतर्भाव आपल्याला दिसतो. त्यामुळे परंपरा निर्माण करणारा कवी असे भा. रा. तांबे होते असेही गौरोद्गार त्यांनी काढले.
वि. ग. सातपुते म्हणाले, भा. रा. तांबे हे सर्वसामान्यांना भारावून टाकणारे व्यक्तिमत्व होते. भा. रा. तांबे या ईश्वरीय कवित्वाच्याप्रती त्यांच्या कुटुंबातर्फे कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा कार्यक्रम हा खरच आनंदाचा क्षण आहे. आपल्या पूर्वजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हा एक मोठा सद्गुण आहे तो तांबे कुटुंबियांमध्ये आहे आणि तो सर्वांमध्ये असावा.
भा. रा. तांबे यांचे नातू शिरीष तांबे म्हणाले भा.रा. तांबे यांची भाषा, त्यांचे काव्य, त्यांची काव्यसृष्टी, काव्यदृष्टी हा अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. सर्व रसिकांच्यावतीने तांबे कुटुंबीयांतर्फे आयोजित ह्या कार्यक्रमाद्वारे भा.रा तांबे यांना आदरांजली देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
भा.रा. तांबेचे संपूर्ण आयुष्य मध्य प्रदेशात व्यतीत झाले. पण त्यांनी लिहिलेल्या काव्यगीतांवर मराठी भाषिकांनी अतिशय अलौकिक प्रेम केले. त्यांच्या कवितांनी केवळ राज्याच्याच नव्हे तर देशाच्याही सीमा ओलांडल्याने त्यांचा नावलौकिक सर्वदूर झाला. त्यांच्या काव्य-गीतांबद्दल अनेक थोर साहित्यिक, समीक्षकांनी लिहिले आहे. अनेक उत्कृष्ट संगीतकार जसे गजाननराव वाटवे, वसंत प्रभू, पं. हृदयनाथ मंगेशकर, दशरथ पुजारी, राम फाटक यांच्यासह कमलाकर भागवत, श्रीधर फडके यांनी कविवर्यांच्या गीतांना संगीतबद्ध केले आणि गायक गजाननराव वाटवे, पं. कुमार गंधर्व, सुधीर फडके, भारतरत्न लता मंगेशकर, चिरतरुण आवाज असलेल्या आशा भोसले, मंदाकिनी पांडे, माणिक वर्मा यांनी त्यांची गीते गायलेली आहेत, जी आज इतकी वर्षे उलटल्यानंतरही मराठी रसिकांच्या हृदयात ताजी आहेत. म्हणूनच ती पुन्हा-पुन्हा गायली-ऐकली जातात, काना-मनात रुंजी घालतात. त्यांना मराठी भावगीतांचे जनक असे कौतुकाने संबोधण्यात येते.
राजकवीचा सन्मान मिळण्यापूर्वी भा. रा. तांबे यांनी मध्य भारतात विविध मानाच्या पदांवर काम केलेलं होतं. देवास, इंदूर येथे युवराज शिक्षक, पिपलोदा संस्थानचे दिवाण, शोपूर संस्थानिकाचे राजकीय सल्लागार, प्रतापगढ संस्थानचे पोलीस सुपरिंटेंडन्ट आणि न्यायाधीश, ग्वाल्हेर शिक्षण खात्यात रजिस्ट्रार अशा जबाबदारीच्या व महत्वाच्या पदांवर त्यांनी काम केले. त्यांच्या ठिकाणी असलेल्या प्रशासकीय कौशल्य व कार्यक्षमतेने ते एक कुशल व कणखर अधिकारी म्हणूनही ओळखले जात. काव्यास विशेष अनुकूल नसणार्या व्यवसायांतही तांबे यांचा काव्यलेखनाचा छंद कायम राहिला. १९३७ मध्ये ग्वाल्हेर संस्थानाने त्यांचा राजकवी म्हणून बहुमान केला. त्यांचा कार्यकाळ मध्य प्रदेशातच गेल्यामुळे तिथल्या राज्य शासनातर्फे आजही त्यांच्या नावे विविध पुरस्कार, सन्मान दिले जातात. शिवाय ग्वाल्हेरसह अनेक महत्वाच्या शहरांमध्ये तांबे प्रेमी अभ्यास मंडळे कार्यरत आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरजा आपटे यांनी केले.