पुणे—मेव्हण्याला धमकावल्या प्रकरणात भाजपाचे माजी खासदार संजय काकडे आणि त्यांच्या पत्नी उषा काकडे यांना गुरुवारी सकाळी चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली. त्यांना दुपारी १२ वाजता न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.
काकडे यांना बुधवारी आरोपत्रासोबत न्यायालयात हजर केल्याची व ते फरार झाल्याची माहिती सोशल मिडियावर पसरली होती. मात्र, ही माहिती खोटी व अफवा असल्याचे त्यांचे जनसंपर्क प्रतिनिधीने कळविले होते.
मात्र, गुरुवारी काकडे आणि त्यांच्या पत्नी उषा यांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी युवराज ढमाले (वय ४० या काकडे यांच्या मेव्हण्याने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. बुधवारी काकडे यांना अटक करण्यासाठी चतु:श्रृंगी पोलिसांचे पथक त्यांच्या घरी आणि कार्यालयात गेले होते. परंतु ते त्या ठिकाणी सापडले नाहीत. गुरुवारी सकाळी घरी जाऊन त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर दुपारी १२ वाजता त्यांना न्यायलायात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात काकडे दाम्पत्याला जामीन मंजूर करण्यात आला. ढमाले यांच्या वतीने विजयसिंह ठोंबरे यांनी बाजू मांडली.
काय आहे प्रकरण
संजय काकडे यांचे मेव्हणे तसेच उषा काकडे यांचे बंधू युवराज ढमाले (वय 40) यांना गोळ्या घालून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात काकडे दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ढमाले यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक आहेत. संजय काकडे आणि फिर्यादी यांच्या मध्ये सुरुवातीला भागीदारीत व्यवसाय होता. मात्र त्यांच्यात मतभेद निर्माण झाल्यामुळे 2010 पासून दोघेही स्वतंत्ररीत्या व्यवसाय करतात. ऑगस्ट 2018 मध्ये फिर्यादी संजय काकडे यांच्या घरी गेले असता काकडे यांनी त्याला तुला संपवायला वेळ लागणार नाही, तू पैशाचा माज येऊ देऊ नकोस, तुला आणि तुझ्या कुटुंबाला सुपारी देऊन संपवेल, अशा शब्दात धमकी दिल्याबाबत मागील काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता.