ओझोन थराची मोठी झीज भरून निघतेय; २०६६ पर्यंत पूर्ण पूर्ववत होण्याची शक्यता | WMO Report


पुणे(प्रतिनिधी)– जागतिक स्तरावर क्लोरोफ्लुरोकार्बन  आणि ओझोन थराला हानी पोहोचवणाऱ्या इतर घातक वायूंच्या उत्सर्जनावर आणलेल्या कडक निर्बंधांचे सकारात्मक व अत्यंत दिलासादायक परिणाम आता स्पष्टपणे दिसून येत आहेत. अंटार्क्टिका खंडावरील ओझोन थराला पडलेले मोठे छिद्र गेल्या काही दशकांत लक्षणीयरीत्या लहान झाले असून, येत्या २०६६ पर्यंत पृथ्वीभोवतीचे हे नैसर्गिक संरक्षक कवच पूर्णपणे पूर्ववत होण्याची दाट शक्यता जागतिक हवामान संघटनेच्या  नव्या अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. जागतिक ओझोन दिनानिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेल्या या अहवालात मॉन्ट्रियल प्रोटोकॉलच्या यशावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, सन २००० पासून सुरू झालेली ओझोन थराच्या पुनर्प्राप्तीची ही प्रक्रिया हा जागतिक पर्यावरणाचा एक मोठा यशस्वी टप्पा असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.

अंटार्क्टिकावरील ओझोन छिद्राच्या आकारात झालेली घट ही आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या पर्यावरणविषयक सहकार्याची साक्ष देणारी ठरली आहे. हवामान संघटनेच्या ओझोन बुलेटीननुसार, २०२४ आणि २०२५ या दोन्ही सलग वर्षांत ओझोन छिद्राचा विस्तार व खोली १९९० ते २०१० च्या सरासरीपेक्षा खूपच कमी नोंदवली गेली आहे. १९९२ मध्ये ओझोन थराच्या तीव्र क्षयाचे नमुने समोर आल्यानंतरच्या काळात २०२४ मधील ओझोन छिद्र हे सातव्या क्रमांकाचे सर्वांत लहान छिद्र ठरले, तर २०२५ मधील छिद्र हे चौथ्या ते पाचव्या क्रमांकाचे सर्वांत लहान छिद्र ठरले आहे. २०२४ मध्ये या छिद्राचे सरासरी क्षेत्रफळ सुमारे २० दशलक्ष चौरस किलोमीटर इतके होते, जे २८ सप्टेंबर रोजी कमाल २२.४ दशलक्ष चौरस किलोमीटरपर्यंत पोहोचले होते. सीएफसी वायूंच्या उत्सर्जनातील मोठी घट आणि अंटार्क्टिकाच्या उत्तरेकडून वाऱ्यांसोबत वाहून येणारी ओझोनयुक्त हवा या दोन प्रमुख घटकांमुळे ही सकारात्मक सुधारणा घडल्याचे हवामानशास्त्रज्ञांनी नमूद केले आहे.

अधिक वाचा  ऑलम्पिकमध्ये रौप्यपदक मिळाल्याने महाराष्ट्राचा ५२ वर्षाचा दुष्काळ नाहीसा झाला याचा मला अभिमान : सचिन खिलारी

पृथ्वीभोवती असणारा ओझोन थर सूर्यापासून निघणाऱ्या हानिकारक अतिनील किरणांपासून  सजीव सृष्टीचे रक्षण करतो. १९७५ च्या सुमारास वैज्ञानिकांच्या लक्षात आले की अंटार्क्टिका खंडावर ओझोन थराला मोठे छिद्र पडत आहे आणि कालांतराने हे छिद्र अधिक मोठे होत गेले. अमेरिकन अंतराळ संस्था नासाने  १९७९ पासून यासंदर्भातील चित्रे आणि शास्त्रीय माहिती जगासमोर आणण्यास सुरुवात केली. जागतिक स्तरावरील औद्योगिकीकरण, युद्धे, प्रदूषण तसेच रेफ्रिजरेटर, अग्निशामक फोम आणि इतर दैनंदिन उत्पादनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या क्लोरोफ्लुरोकार्बन वायूंमुळे या थराची मोठी झीज झाली. हे सीएफसी वायू वातावरणातील स्थितांबरात (स्ट्रॅटोस्फिअर) पोहोचल्यानंतर सूर्याच्या अतिनील किरणांमुळे त्यांचे विघटन होऊन क्लोरीनचे अणू मुक्त होतात. हे मुक्त क्लोरीन अणू ओझोनच्या रेणूंशी रासायनिक अभिक्रिया करून त्यांचे ऑक्सिजनमध्ये रूपांतर करतात, ज्या प्रक्रियेमुळे ओझोनचा थर पातळ होत जातो. ओझोन थर पूर्णपणे नष्ट झाला असता तर अतिनील किरणे थेट जमिनीवर पोहोचून मानवी शरीरावर आणि संपूर्ण परिसंस्थेवर अत्यंत गंभीर व घातक परिणाम झाले असते. मात्र, मॉन्ट्रियल प्रोटोकॉलद्वारे सीएफसी उत्पादनावर जागतिक निर्बंध लादण्यात आल्याने या विघातक प्रक्रियेला अटकाव बसला आहे.

अधिक वाचा  Maharashtra Sahitya Parishad election dispute : मसाप निवडणूक पेटली! खाजगी बैठकीच्या छुप्या रेकॉर्डिंगप्रकरणी विनोद कुलकर्णींविरुद्ध सायबर पोलिसांत तक्रार

 

जागतिक हवामान संघटनेच्या सरचिटणीस सेलेस्टे साउलो  यांनी या घडामोडीचे स्वागत करताना सांगितले की, ही पर्यावरणाच्या क्षेत्रातील यशाची एक मोठी कथा आहे. सन २००० पासून ओझोन थर सातत्याने पूर्ववत होत असून येत्या काही दशकांत तो पूर्णपणे पूर्ववत होईल. या संपूर्ण प्रक्रियेवर सतत लक्ष ठेवण्यासाठी डब्ल्यूएमओचे ग्लोबल ॲटमॉस्फियर वॉच‘  नेटवर्क जमिनीवरून उच्च दर्जाची निरीक्षणे नोंदवत आहे. या संदर्भात मत व्यक्त करताना पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले की, घातक वायूंच्या उत्सर्जनावर नियंत्रण आणल्याचा सकारात्मक परिणाम आता स्पष्ट दिसत आहे. ओझोन थराची झालेली झीज पूर्णपणे भरून निघण्यासाठी आणखी काही दशकांचा कालावधी लागणार असला, तरी सध्याची ही सुधारणा पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय दिलासादायक बाब आहे. नासा आणि राष्ट्रीय महासागरीय व वातावरणीय प्रशासनाच्या  शास्त्रज्ञांच्या मते २०६६ पर्यंत ओझोन थर पूर्णपणे पूर्ववत होण्याची दाट शक्यता आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love