जागतिक पातळीवरील दोन मोठ्या संकटांमुळे शेअर बाजारात प्रचंड पडझड; भारतीय बाजार २४,००० च्या खाली

भारतीय शेअर बाजार घसरण आणि जागतिक तणाव
भारतीय शेअर बाजार घसरण आणि जागतिक तणाव

जागतिक पातळीवरील वाढत्या तणावाचा आणि आर्थिक अनिश्चिततेचा मोठा फटका आज भारतीय शेअर बाजारासह जगभरातील बाजारपेठांना बसला आहे. देशांतर्गत बाजारात प्रचंड विक्रीच्या दबावामुळे निफ्टीने २४,००० ची महत्त्वाची आणि अत्यंत नाजूक पातळी तोडली असून बाजार या पातळीच्या खाली बंद झाला आहे. बाजारात आधीच इंडेक्स पातळीवर मोठ्या प्रमाणावर शॉर्ट पोझिशन्स तयार होत्या, ज्यांमुळे २४,००० ची ही पातळी अत्यंत नाजूक बनली होती; त्यातच जागतिक पातळीवरून आलेल्या नकारात्मक संकेतांमुळे बाजाराची सुरुवातच मोठ्या घसरणीने झाली आणि त्यानंतरही संपूर्ण सत्रात बाजारात साधी हिरवी कॅन्डलही पाहायला मिळाली नाही. केवळ भारतीय बाजारच नव्हे, तर काल रात्री अमेरिकेतील डाऊ जोन्स ४०० अंकांनी घसरला आणि नॅसडॅक १ टक्क्यापेक्षा जास्त तुटला होता.

आज सकाळी आशियाई बाजारपेठांमध्ये जपानचा बाजार ३ टक्क्यांनी तर कोरियाचा बाजार ४ टक्क्यांनी कोसळला. युरोपातील जर्मनी, फ्रान्स आणि ब्रिटनचा ‘फूट्सी’  या सर्वच बाजारांमध्ये प्रचंड घसरण पाहायला मिळाली. या जागतिक महाघसरणीमागे प्रामुख्याने दोन अत्यंत चिंताजनक आणि मोठी कारणे आहेत, जी दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहेत आणि या प्रतिकूल परिस्थितीचा थेट फटका गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओला बसत आहे.

या पडझडीमागील पहिले आणि मुख्य कारण म्हणजे मिडल ईस्ट (मध्य पूर्व) मधील युद्धाचा भडका आणि त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ हे आहे. अमेरिकेने इराणी तेल टँकरवर थेट हल्ला चढवला, ज्यामुळे तेल बाजारात प्रचंड खळबळ उडाली आहे. अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणनेही त्याला चोख प्रत्युत्तर दिले असून इराणने अनेक अमेरिकन सैनिक मारल्याचा दावा केला आहे, ज्याला अमेरिकेकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र, अमेरिकेने इराणवर आत्तापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करण्याची चेतावणी दिली असून इराणनेही कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्याची पूर्ण तयारी असल्याचे सांगत अमेरिकेला इशारा दिला आहे. या वाढत्या लष्करी तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल ९५ डॉलरच्या पार गेला असून ‘मुरबान क्रूड’ने तर १०० डॉलरचा टप्पा ओलांडून शतक ठोकले आहे.

अधिक वाचा  वॉल्टर्स क्लुवर तर्फे पुण्यात इनोव्हेशन हब : अद्ययावत सुविधेसह जागतिक तंत्रज्ञान कंपनीचा भारतात विस्तार

कच्च्या तेलाच्या या वाढत्या किमती भारतासारख्या देशासाठी अत्यंत घातक आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परकीय चलनाची बचत करण्यासाठी सोने खरेदी कमी करण्याचे आणि परदेश दौरे टाळण्याचे आवाहन केले होते, जेणेकरून डॉलर वाचवता येईल आणि वाढत्या तेल आयातीचा बोजा हाताळता येईल. जर पेट्रोल आणि डिझेलचे दर चढेच राहिले, तर देशात महागाई वाढेल, ज्यामुळे मध्यवर्ती बँकांना व्याजदर वाढवावे लागतील किंवा ते चढेच ठेवावे लागतील, जे शेअर बाजारासाठी अत्यंत नकारात्मक पाऊल ठरेल. कच्चे तेल जर १०० ते ११५ डॉलरच्या पातळीवर गेले, तर शेअर बाजाराची वाढ पूर्णपणे रखडेल.

दुसरे अत्यंत गंभीर कारण म्हणजे जगभरातील ‘बॉन्ड यील्ड’  मध्ये झालेली विक्रमी वाढ होय, ज्याने जागतिक बाजारावर प्रचंड दबाव आणला आहे. अमेरिका, जपान आणि युनायटेड किंगडम (UK) सह जगातील प्रमुख देशांचे बॉन्ड यील्ड अनेक देशांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. अमेरिकेतील ३० वर्षांचे बॉन्ड यील्ड जून २००७ नंतर म्हणजेच तब्बल १९ वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचून ५.२५% वर गेले आहे. जपानमधील ३० वर्षांचे बॉन्ड यील्ड ऐतिहासिक पातळीवर असून १० वर्षांचे यील्ड ३० वर्षांच्या उच्चांकावर आहे. युनायटेड किंगडममध्ये ३० वर्षांचे बॉन्ड यील्ड २८ वर्षांच्या उच्चांकी पातळीवर (१९९८ नंतर प्रथमच) तर १० वर्षांचे यील्ड १८ वर्षांच्या उच्चांकी पातळीवर (२००८ च्या आर्थिक मंदीच्या काळातील पातळीवर) आले आहे.

अधिक वाचा  मॉन्सून अंदमानात दाखल : महाराष्ट्रात ६ जूनला दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज

काय आहे बॉन्ड यील्ड

या बॉन्ड यील्डमधील वाढीचा अर्थ सोप्या भाषेत सांगायचा तर कर्ज महागणे असा होतो. जेव्हा सरकारला कर्ज घेण्यासाठी जास्त व्याज द्यावे लागते, तेव्हा संपूर्ण अर्थव्यवस्थेत कर्जाचे दर वाढतात आणि यामुळे कंपन्यांचे कर्ज महाग होते. आधी ५ टक्क्यांवर मिळणारे कर्ज जर ६ टक्क्यांवर मिळू लागले, तर कंपन्या नवीन विस्तार आराखडे काही काळासाठी थांबवतात किंवा पुढे ढकलतात. विस्तार थांबल्यामुळे कंपन्यांची व्यावसायिक वाढ खुंटते, त्यांचे आगामी तिमाहीचे आर्थिक निकाल खराब येतात आणि परिणामी शेअर बाजार खाली येतो. याशिवाय, कर्ज महाग झाल्यामुळे कंपन्यांच्या नफ्यावर आणि खर्चावर थेट ताण पडतो.

या परिस्थितीचा दुसरा मोठा फटका असा बसतो की, वाढत्या व्याजदरांमुळे बँकांच्या मुदत ठेव वरील व्याजाचे दरही वाढतात. जर गुंतवणूकदारांना सुरक्षित फिक्स डिपॉझिट किंवा सरकारी बॉन्ड्समध्येच ८ ते १० टक्के किंवा त्याहून अधिक परतावा मिळू लागला, तर ते शेअर बाजारातील जोखीम आणि चढ-उतार पत्करणे टाळतात. जागतिक तणाव, तेलाचे वाढते दर आणि राजकीय घडामोडी या सर्व चिंता रोज पाहण्यापेक्षा गुंतवणूकदार आपले पैसे शेअर बाजारातून काढून सुरक्षित अशा बॉन्ड्स किंवा एफडीमध्ये गुंतवण्यास प्राधान्य देतात. यामुळे शेअर बाजारातील रोखता (लिक्विडिटी) कमी होऊन बाजारावर दुहेरी मार पडतो.

अधिक वाचा  शिवराज्याभिषेक: स्वराज्याचा संकल्प आणि स्वाभिमानी राष्ट्राची पायाभरणी

एकंदरीत, सध्याच्या या जागतिक मंदीच्या भीतीचे आणि आर्थिक संकटाचे मूळ कारण मध्य पूर्वेतील युद्धाच्या तणावात दडलेले आहे. जोपर्यंत हा संघर्ष शांत होत नाही आणि कच्च्या तेलाच्या किमती सध्याच्या ९० ते ९५ डॉलरवरून कमी होऊन पुन्हा ७० डॉलरच्या पातळीवर येत नाहीत, तोपर्यंत शेअर बाजारात शाश्वत आणि मोठी तेजी येणे अत्यंत कठीण आहे. मधल्या काळात काही अफवांमुळे किंवा तात्कालिक घडामोडींमुळे बाजारात किरकोळ सुधारणा किंवा तेजीचे सत्र पाहायला मिळू शकते, पण बाजार नवीन ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठण्याची शक्यता सध्या तरी धुसर दिसत आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love