पुणे(प्रतिनिधी)–साप्ताहिक विवेकचे माजी संपादक कै. राजाभाऊ नेने यांच्या स्मृतीनिमित्त पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिला जाणारा प्रतिष्ठित ‘कै. राजाभाऊ नेने स्मृती पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ पत्रकार विराग पाचपोर आणि अंजली तागडे यांना जाहीर करण्यात आला आहे.
पत्रकारिता क्षेत्रातील योगदानासाठी विवेकतर्फे दरवर्षी हा सन्मान प्रदान केला जातो. सोमवार, १३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता वडाळा येथील ‘चंचल स्मृती’ हॉलमध्ये आयोजित एका विशेष सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
यंदाच्या पुरस्काराचे मानकरी विराग पाचपोर हे मुस्लिम राष्ट्रीय मंचचे संयोजक म्हणून कार्यरत आहेत, तर अंजली तागडे या ‘विश्व संवाद केंद्र’च्या संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि २५ हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्र प्रचार प्रमुख मा. प्रमोद बापट यांच्या हस्ते हा गौरव सोहळा संपन्न होईल. यापूर्वी ब.ना. जोग, ज.द. जोगळेकर, दिगंबर घुमरे, चं.पा. भिशिकर, अरविंद गोडबोले, वसंतराव उपाध्ये, दिलीप धारूरकर, मोरेश्वर जोशी आणि विद्याधर ताठे यांसारख्या दिग्गज मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून पद्मश्री रमेश पतंगे लिखित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संवैधानिक चिंतन’ या महत्वपूर्ण पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक प्रतिक कर्पे आणि मुंबई विद्यापीठाच्या आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागाचे संचालक प्राचार्य डॉ. बळीराम गायकवाड यांच्या शुभहस्ते या पुस्तकाचे अनावरण होईल.













