Pune Municipal Corporation Election : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय समीकरणे वेगाने बदलत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Ajit Pawar गट) एका निर्णयाने शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. गुन्हेगारीमुक्त पुण्याची भाषा करणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीने चक्क कुख्यात गुंड गजा मारणे (Gaja Marne) याची पत्नी जयश्री मारणे (Jayashree Marne) आणि खुनाच्या आरोपाखाली कारागृहात असलेल्या आंदेकर (Andekar) कुटुंबातील दोन महिलांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. या निर्णयामुळे पुण्याला गुन्हेगारी मुक्त करण्याच्या आणाभाका घेणाऱ्या अजित पवारांच्या या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बावधनमधून जयश्री मारणे यांना मैदानात
कुख्यात गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे (Jayashree Marne) यांना अजित पवार गटाने प्रभाग क्रमांक १० (बावधन) मधून अधिकृत उमेदवारी दिली आहे. जयश्री मारणे या माजी नगरसेविका असून २०१२ मध्ये त्यांनी मनसेच्या(MNS) तिकिटावर निवडणूक जिंकली होती. २०२२ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला होता. विशेष म्हणजे, अवघ्या आठ दिवसांपूर्वी त्यांनी बारामती येथील हॉस्टेलवर जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांच्या उमेदवारीबाबत सुरू असलेल्या चर्चांवर अखेर अधिकृत मोहोर उमटवण्यात आली आहे.
आंदेकर कुटुंबालाही झुकते माप; कारागृहातून लढणार निवडणूक
दुसरीकडे, नाना पेठ भागातील वर्चस्व असलेल्या आंदेकर टोळीलाही राष्ट्रवादीने बळ दिले आहे. आयुष कोमकर (Ayush Komkar) हत्याप्रकरणात सध्या कारागृहात असलेल्या सोनाली आंदेकर (Sonali Andekar) आणि लक्ष्मी आंदेकर (Lakshmi Andekar) यांना प्रभाग क्रमांक २३ मधून उमेदवारी देण्यात आली आहे. या दोघींवरही खुनासह ५ कोटी ४० लाखांच्या खंडणीचा गंभीर आरोप आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांच्या हत्येनंतर आंदेकर आणि कोमकर (Komkar) कुटुंबातील वाद टोकाला गेला होता. या पार्श्वभूमीवर, मकोका अंतर्गत कारवाई झालेल्या आणि सध्या जेलमध्ये असलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना उमेदवारी दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
अजित पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
अजित पवार (Ajit Pawar) यांनी नेहमीच ‘पुण्यातील गुन्हेगारी मोडीत काढू’ अशी आक्रमक भूमिका मांडली आहे. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरताना ‘निवडून येण्याची क्षमता’ लक्षात घेऊन गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांच्या नातलगांना संधी दिल्याने त्यांच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ऐन मतदानाच्या तोंडावर झालेल्या या वादग्रस्त उमेदवारी वाटपामुळे पुण्यातील निवडणुकीत गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे.














