पुणे(प्रतिनिधी)– सातारा येथे येत्या १ ते ४ जानेवारीदरम्यान होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशनने या संमेलनाचे आयोजन केले आहे अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
प्रा. जोशी म्हणाले, ‘घटक संस्थांनी तसेच महामंडळातील सर्व समाविष्ट, संलग्न संस्थांनी विश्वास पाटील यांचे नाव अध्यक्षपदासाठी अग्रक्रमाने सुचविले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेने संमेलनाचे आयोजन केले असल्याने पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने कोणाचेही नाव अध्यक्षपदासाठी सुचविले नाही. संस्थांकडून शिफारस करण्यात आलेल्या नावातून मराठी साहित्याचे दालन समृद्ध करण्यासाठी दिलेले योगदान विचारात घेऊन विश्वास पाटील यांची सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. सभेत मतदान घेण्याची वेळ आली नाही. अध्यक्षांनाही त्यांचे मत नोंदवावे लागले नाही.
शनिवारी मार्गदर्शन समितीने संयोजकांसमवेत ठरविलेल्या कार्यक्रमाच्या आराखड्यास साहित्य महामंडळाच्या या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.
* हे संमेलन ४ दिवस होणार असून १,२,३ आणि ४ जानेवारी २०२६ रोजी साताऱ्यातील शाहू स्टेडीअम येथे होणार आहे
* ग्रंथदिंडी संमेलनाच्या उद्घाटनाच्या आदल्या दिवशी निघणार असून त्याच दिवशी दुपारी ग्रंथ प्रदर्शनाचे, कवीकट्टा आणि बालकुमारांसाठीच्या आनंद मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
* ग्रंथ प्रदर्शनाचा वाचकांना ४ दिवस लाभ घेता येणार आहे.
* वक्त्यांच्या भाषणांपेक्षा चर्चेतून परिसंवादातील विषयांना न्याय दिला जाणार आहे.
* निमंत्रितांचे कविसंमेलन, समकालीन गाजलेल्या पुस्तकावरील चर्चा, मान्यवर लेखकांच्या मुलाखती, * नामवंत कादंबरीकारांशी संवाद असे विविध दर्जेदार कार्यक्रम होणार आहेत.
* या संमेलनासाठी प्रथमच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सर्व पूर्वाध्यक्षांना, सरस्वती सन्मानप्राप्त लेखकांना, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त निवडक लेखकांना तसेच साहित्य महामंडळाच्या माजी अध्यक्षांना निमंत्रित केले जाणार आहे.
साताऱ्यातील ४ थे संमेलन
साताऱ्यात होणारे हे ४ थे संमेलन आहे. १८७८ मध्ये लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी ग्रंथकार संमेलन सुरु केल्यानंतर ३ रे संमेलन १९०५ साली रघुनाथ पांडुरंग करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात झाले होते. १९६२ मध्ये न. वि. गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली ४४ वे तर १९९३ साली विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली ६६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले होते.
शाहू स्टेडीअमवर होणार संमेलन
नियोजित संमेलन स्थळ छत्रपती शाहू स्टेडियम हे आहे. योगायोग असा की १९९३ साली ६६ वे संमेलन इथेच झाले होते. हे स्टेडियम १४ एकरात असून तिथे मुख्य मंडप, इतर मंडप, ग्रंथ प्रदर्शन, कवी गझल कट्टा, तसेच भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे. इतर छोटे कार्यक्रम करण्यासाठी तीन सभागृहे उपलब्ध आहेत. स्टेडियम मध्ये २५००० प्रेक्षक क्षमता असलेली गॅलरी आहे. हे स्टेडियम सातारा बस स्थानकापासून पायी चालत जाण्याच्या अंतरावर असून शहराच्या मध्यभागी असल्याने शहरातील आणि बाहेरून येणाऱ्या साहित्य रसिकांची सोय होणार आहे. स्टेडियमच्या पाठीमागील बाजूस पोलिस परेड ग्राउंडची ८ एकर जागा असून तिचा वापर पार्किंगसाठी करता येणार आहे.
——————————-
साहित्यिक जीवनचरित्र
विश्वास पाटील, १९९२ सालच्या मुख्य साहित्य अकादमी पुरस्काराचे विजेते. मराठीतील प्रख्यात कादंबरीकार व नाटककार आहेत. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील नेरले नावाच्या छोट्याशा खेड्यात शेतकरी कुटुंबात झाला.
महत्त्वाचे सन्मान व पुरस्कार.
फेब्रुवारी २०२० मध्ये श्री. पाटील यांना त्यांच्या साहित्य योगदानासाठी विशेषत: “झाडाझडती” (A Dirge for Dammed) आणि “नागकेशर” या कादंबऱ्यांसाठी इंदिरा गोस्वामी साहित्य राष्ट्रीय पुरस्कार (आसाम) प्राप्त झाला. यापूर्वी हा मान महाश्वेता देवी आणि भैरप्पा यां सारख्या नामवंत लेखकांना मिळाला होता.
झाडाझडती (हॅशेट या विख्यात प्रकाशन संस्थेकडून इंग्रजीत A Dirge for Dammed नावाने प्रकाशित). या कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. ही कादंबरी मोठ्या धरणांमुळे विस्थापित झालेल्या धरणग्रस्तांच्या जीवनावर व त्यांच्या पुनर्वसनाच्या समस्येवर आधारित असून भारतातील तिचा अनेक भाषांत अनुवाद झाला आहे.
सामाजिक आणि राजकीय कादंबऱ्या
लस्ट फॉर लालबाग (Lust for Lalbaug) – मुंबईतील ६२ कापड गिरण्यांच्या विक्रीमागील राजकारण, माफियांचा हस्तक्षेप आणि तीन लाख गिरणी कामगारांचे हाल. 1982 च्या गिरणी कामगारांच्या संपानंतरचे मन्वंतर.
पांगीरा – शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याच्या अतोनात वापरामुळे समृद्धीकडून दुष्काळाकडे परिवर्तन झालेल्या एका खेड्याच्या ह्रासाची कथा.
नागकेशर – सहकार, ऊस उद्योग आणि सार्वत्रिक निवडणुकां भोवती फिरणाऱ्या राजकीय खेळी आणि सामान्य कष्टकऱ्यांच्या वाट्याला आलेले दैन्य या विषयावरची ही वेगळी कादंबरी आहे.
दुडिया _ नक्षलवादाकडे फोडलेली वळलेली एक आदिवासी तरुणी आणि छत्तीसगडच्या पार्श्वभूमीवर श्री पाटील यांनी लिहिलेली दुडिया ही कादंबरी. श्री पाटील यांची ही कलाकृती तीन वर्षांमध्ये ही कादंबरी हिंदी इंग्रजी कन्नड तेलगू बेंगाली आसामी ओडिया मल्याळी अशा आठ भारतीय भाषांमध्ये प्रकाशित होऊन साहित्यिक चर्चेचा विषय बनलेली आहे.
ग्रेट कांचना सर्कस_श्री पाटील यांची दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरील एका कांचना नावाच्या एका सर्कसरागिणीच्या बहादुरीची आणि तिने आपल्या माणसा जनावरांसह केलेल्या दोन हजार किलोमीटर प्रवासाची वेगळी कहाणी आहे. ही कादंबरी हिंदीमध्ये वाणी प्रकाशन ने प्रकाशित केली आहे.
ऐतिहासिक कादंबऱ्या
संभाजी आणि पानिपत – या ऐतिहासिक कादंबऱ्यांना अफाट लोकप्रियता लाभली असून पानिपतच्या युद्धाबाबत वांग्मयीन पटलावरून नवीन प्रमेय श्री पाटील यांनी मांडली. तसेच संभाजीराजांच्या परंपरागत व्यक्तिरेखेच्या मांडणीला छेद देऊन एक बलदंड राजकीय पुरुष व शिवछत्रपती नंतर हिंदवी स्वराज्य कणखरपणे सांभाळणारे शंभुराजे असे त्यांचे विराट चित्र या कादंबरीच्या द्वारे वाचकांसमोर सादर केले.केवळ मराठीतच तीन लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. पानिपत आणि संभाजी दोन्ही कादंबऱ्या अलीकडे इंग्रजीमध्ये सुद्धा वेस्टलँड इका या प्रकाशन संस्थेने इंग्रजीमध्ये प्रकाशित केल्या आहेत.
महानायक – सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील संघर्षावर आधारित राजकीय नाट्य व व्यक्तिगत परस्पर संबंधांचा श्री पाटील यांनी धांडोळा घेतला. तसेच नेताजींच्या ब्रह्मदेशातील व जपान मधील कारकिर्दीचा शोध घेऊन तो कादंबरी माध्यमातून सकसपणे सादर केला.
या कादंबरीसाठी श्री. पाटील यांनी इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, जपान, म्यानमार (बर्मा) आणि आग्नेय आशियातील अनेक देशांत जाऊन त्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या पाऊलखुणांचा मागोवा घेतला.
महासम्राट – या नावाने श्री पाटील यांनी छत्रपती शिवराय यांच्या जीवनावर कादंबरी मालिका घोषित केलेली आहे. त्यापैकी “झंझावात” आणि “रणखैंदळ” हे दोन भाग प्रकाशित झालेले आहेत. या दोन्ही भागांचे इंग्रजी हिंदी आणि कन्नड मध्ये भाषांतरे झालेली आहेत.
नाटक- पानिपतचे रणांगण. पानिपत कादंबरीवर आधारलेले श्री पाटील यांचीही नाट्यकृती रंगमंचावर २००० मध्ये आली. देशात तिचे देशात व विदेशात ७०० प्रयोग झालेले आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक वामन केंद्रे यांनी या नाट्यकृतीचे दिग्दर्शन केले होते.
आपल्या साहित्यिक कार्याबरोबरच श्री. पाटील यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी केवळ १४ महिन्यांत शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे बांधकाम पूर्ण केले.
पुरस्कार
१९८९ – नाथ माधव पुरस्कार (पानिपत)
१९९० – प्रियांदर्शनी राष्ट्रीय पुरस्कार (पानिपत), भारतीय भाषा परिषद पुरस्कार (पानिपत), महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार (पानिपत), विखे पाटील पुरस्कार (झाडाझडती)
१९९२ – साहित्य अकादमी पुरस्कार (झाडाझडती), रोहमारे साहित्य पुरस्कार
१९९३ – राज्य शासन सर्वोत्तम कादंबरी पुरस्कार (पांगीरा)
१९९९ – राज्य शासन सर्वोत्तम कादंबरी पुरस्कार (महानायक)
२००० – जयवंत दळवी पुरस्कार
(नाटक लेखन – रणांगण)
२००० सर्वोत्कृष्ट नाटक शासन पुरस्कार “पानिपतची रणांगण”
२००५ – महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, सर्वोत्कृष्ट कादंबरी पुरस्कार (चंद्रमुखी)
२००९ – राज्य शासन चित्रपट समीक्षण पुरस्कार (नॉट गॉन विथ द विंड)
२०११ – लाभोसेटवार पुरस्कार (अमेरिका) – एक लाख रुपये, सर्वोत्तम मराठी लेखक म्हणून
२०१६ – लोकमंगल सर्वोत्तम कादंबरी पुरस्कार (लस्ट फॉर लालबाग.)
२०१६ महाराष्ट्र महाराष्ट्र टाइम्स तर्फे गेल्या दोन दशकातील सर्वोत्कृष्ट व वाचनीय कादंबरी म्हणून “महानायक ची निवड
२०१७ – सर्वोत्कृष्ट मराठी लोकप्रिय लेखक , वाचकांच्या पसंतीचा सर्वाधिक लोकप्रिय मराठी लेखक पुरस्कार (दिव्य मराठी)
श्री. विश्वास पाटील यांची ग्रंथसंपदा
१. गाभूळलेल्या चंद्रबनात.
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे (तिसरी आवृत्ती)
२. नागकेसर, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे (तीसरी आवृत्ती)
हिंदी: रवी बुले, राजकमल, दिल्ली
3 पानिपत. राजहंस प्रकाशन 47 वी आवृत्ती
हिंदी : भारतीय भारतीय ज्ञानपीठ आणि वाणी प्रकाशन (पंधरावी आवृत्ती)
गुजराती: डॉ. प्रतिभा दवे, नवसाहित्य , अहमदाबाद
पंजाबी: प्रकाशन विभाग पंजाब सरकार पतीयाळा
कन्नड: सपना बुक हाऊस बेंगलोर
इंग्रजी: वेस्टलांड दिल्ली, चौथी आवृत्ती
३. पानिपत
भाषा: मराठी, राजहंस प्रकाशन, पुणे (द्वादशाव्या आवृत्ती)
हिंदी: प्रकाश भावेकर, वाणी प्रकाशन, दिल्ली
कन्नड: डॉ. चंद्रकांत पोखळे, सपना बुक स्टॉल, बंगलोर
४. पांगिरा:
राजहंस प्रकाशन (19 वी आवृत्ती)
हिंदी: वाणी प्रकाशन, दिल्ली
कन्नड: सपना बुक स्टॉल, बंगलोर
५. झाडाझडती:
राजहंस प्रकाशन (27 वी आवृत्ती)
हिंदी: वाणी प्रकाशन, दिल्ली (पाचवी आवृत्ती)
कन्नड: साहित्य अकादमी दिल्ली .
इंग्रजी: डॉ. कीर्ती रामचंद्र, A Dirge For The Dammed, हॅचेट दिल्ली.
उर्दू: साजिद रशीद, साहित्य अकादमी, दिल्ली
गुजराती: लोहिना आसू, नमो साहित्य मंदिर अहमदाब
मल्याळम: कालीदास दामोदरन, साहित्य अकादमी दिल्ली.
आसामी: विधीर्ण बागजाई तिसरी आवृत्ती साहित्य अकादमी दिल्ली.
६. चंद्रमुखी
मराठी, राजहंस प्रकाशन, पुणे ( अठरावी आवृत्ती)
हिंदी: डॉ. रामजी तिवारी. भारतीय ज्ञानपीठ (चौथी आवृत्ती)
कन्नड: डॉ. चंद्रकांत पोखळे, सपना बुक हाऊस, बेंगलोर
७. लस्ट फॉर लालबाग :
राजहंस प्रकाशन, पुणे (तिसरी आवृत्ती)
कन्नड : शोषणे, अनु. डॉ. चंद्रकांत पोकळे, सपना बुक हाऊस , बंगलोर
हिंदी : डॉक्टर रामजी तिवारी, राजकमल, दिल्ली
मल्याळम: ए आर नायर, चिंथा पब्लिशर्स
८. संभाजी:
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे (बाविसावी आवृत्ती)
हिंदी : डॉ. रामजी तिवारी, भारतीय ज्ञानपीठ, वाणी दिल्ली (पाचवी आवृत्ती)
इंग्रजी : अनु. डॉ. विक्रांत पांडे वेस्ट लँड दिल्ली (चौथी चौथी आवृत्ती)
कन्नड : डॉ. चंद्रकांत पोखळे, सपना बुक हाऊस, बंगलोर
९. क्रांतिसूर्य :
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे (आठवी आवृत्ती)
१०. महानायक :
राजहंस प्रकाशन, पुणे (सविसावी
आवृत्ती)
हिंदी : डॉ. रामजी, भारतीय ज्ञानपीठ, वाणी दिल्ली (सोळावी आवृत्ती)
गुजराती : डॉ. प्रतिभा दवे, आर. आर. सेठ कंपनी, अहमदाबाद (तिसरी आवृत्ती)
कन्नड : डॉ. चंद्रकांत पोखळे, सपना बुक हाऊस, बंगलोर (पाचवी आवृत्ती)
राजस्थानी : सत्यनारायण स्वामी , साहित्य अकादमी, दिल्ली
मल्याळम् : प्रा. पी. माधवन पिल्लई, डी. सी. बुक्स, कोट्टायम
इंग्रजी : अनु. डॉ. कीर्ती रामचंद्र, वेस्ट लंडन (सहावी आवृत्ती)
बांगला : दिपेन चक्रवर्ती, आनंद बुक पब्लिशर्स, कोलकाता (पाचवी आवृत्ती)
ओडिया : न्यू एज पब्लिकेशन्स, कटक (पाचवी आवृत्ती)
तामिळ : डॉ. एस. सुब्रह्मण्यम, हिंदी ह्रदय, चेन्नई
११. आंबी :
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे (तिसरी आवृत्ती)
१२. महासम्राट
(खंड पहिला – झंझावात)
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे (तिसरी आवृत्ती)
इंग्रजी : अनु. नदीम खान, वेस्ट लंडन (दुसरी आवृत्ती)
हिंदी : अनु. रवि बुले, राजकमल दिल्ली
कन्नड : अनु. चंद्रकांत पोखळे, सपना बुक हाऊस, बेंगलोर
१३. महासम्राट खंड दुसरा :
रणखंदळ : मेहता पब्लिशिंग हाऊस (दुसरी आवृत्ती),
इंग्रजी: The Whirlwind नदीम न खान, वेस्ट लँड, दिल्ली,
कत्रड- सपना बुक हाऊस, बेंगलोर
१४. दुडिया :
मराठी – मॅजेस्टिक प्रकाशन, (दुसरी आवृत्ती)
हिंदी: राजकमल प्रकाशन,
इंग्रजी : Niyogi Delhi .
कन्नड – सपना पब्लिकेशन, बेंगलोर,
ओडिया -ब्लॅक ईगल बुक्स, डुब्लिन आसामी – अनु. चंदसुद्धा आंकबाक, गोहत्ती
बंगाली – शंतनू गंगोपाध्याय, रिटो प्रकाशन,
मल्याळम् – ए.आ. नायर, चिंथा पब्लिशर्स
तेलगू: अनु वासव दत्ता, हैदराबाद
१५. पानिपतचे रणांगण
(नाटक) : मराठी, मेहता पब्लिशिंग हाऊस, (दुसरी आवृत्ती)
१६. नॉट गॉन विथ द विंड :
मराठी – मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे (चौथी आवृत्ती)
इंग्रजी – All Time Favourite Books & Movies नियोगी बुक्स, दिल्ली.
हिंदी – बड़ि किताबोपर बड़ि फिल्मे भारतीय ज्ञानपीठ, दिल्ली (तिसरी आवृत्ती)