श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे प्रस्थान ज्येष्ठ कृष्ण एकादशी दिवशी होते, पालखी पंढरपूरला त्रंबकेश्वर – नाशिक – सिन्नर – मत्व्हारे – पाडेगाव – गोगलगाव – राजुरी – श्रीरामपूर – बेलापूर – राहुरी – नगर – मिरजगाव – कर्जत – रायगाव – जेऊर – करकंब – वाखरी – विसावा या मार्गाने सोळा दिवसांमध्ये येते तर पंढरपुरातून जाताना पंढरपूर – तुळशी – केम- झरे – करमाळा – जातेगाव – बाभूळगाव – घोगरगाव – नगर – राहुरी _ लोणी – गोगलगाव – नानज – सिन्नर – देवळाली – त्रंबकेश्वर या मार्गाने 12 दिवसांमध्ये पोहोचते. या पालखी सोहळ्यामध्ये पादुका सुरुवातीला डोक्यावर नंतर खांद्यावरून वाहिलेल्या पालखीत व सध्या रथातून पंढरपुरात आणल्या जातात.
संत ज्ञानेश्वर महाराजांचे बंधू संत श्री सोपानकाका यांची सासवड येथे समाधी आहे. सोपानकाकांचा समाधी काल सन १२९६ चा आहे, पण पालखी निघण्यास सुरुवात झाली ती सन१९०० मध्ये. म्हणजे याचाच अर्थ जवळपास सहाशे वर्षानंतर सोपानकाकांच्या नावाने पालखी निघण्यास सुरुवात झाली. या पालखीचे प्रस्थान संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड येथून हलण्यापूर्वी एक दिवस आधी म्हणजे ज्येष्ठ वद्य द्वादशी या दिवशी होते. हा पालखी सोहळा पंढरपूरला सासवड – कापूरहोळ- शिरवळ – लोणंद – बारामती – अकलूज – तोंडले-बोंडले- भंडीशेगाव – वाखरी – पंढरपूर या मार्गाने पंढरपुरात तेरा दिवसांमध्ये पोहोचतो तर याच मार्गाने पंढरपुरातून आषाढी वारी झाल्यानंतर हा पालखी सोहळा परत माघारी सासवडला पोहोचतो. या पालखी सोहळ्याची सर्व जबाबदारी सोपानकाका समाधी मंदिराचे पुजारी, विश्वस्त व मालक श्री गोसावी यांच्याकडे आहे.(क्रमशः)
– डॉ.सचिन वसंतराव लादे, पंढरपूर
मो.क्र. ७५८८२१६५२६