पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग १५)

पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास
पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास

श्रीक्षेत्र पैठण हे श्री एकनाथ महाराजांच्या वास्तव्याचे व समाधीचेही पवित्र असे स्थान. पैठण हे गाव सन १३०० पासून सन १९४९ पर्यंत मुस्लिम अमलाखाली होते. पैठण गावातून संत एकनाथ महाराजांची सन १६८० ते १६८५ या दरम्यानच्या काळापासून दिंडी निघून प्रवास करीत प्रथम ती आळंदीस येत असे व तेथून ती दिंडी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्या संयुक्त पालखीबरोबर पंढरपुरात येत असत. पण या दिंडीमध्ये पालखी अथवा पादुका नसत. सन १८३५ मध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा स्वतंत्रपणे पालखी सोहळा निघायला सुरुवात झाल्यापासून पैठण येथून सन १८३५ पासून संत एकनाथ महाराजांची दिंडी थेट पंढरपुरी यायला सुरवात झाली. या दिंडीचा येण्याचा बहुतांश मार्ग निजामाच्या हद्दीतील गावातून असल्याने मोठ्या उत्साहाने या गावातून या मार्गाने पालखी मिरवत आणणे धोक्याचे असल्याने फक्त पादुका घेऊन दिंडी येऊ लागली, या पादुका देखील पुष्कळ वेळा लपवून आणाव्या लागत. या पादुका घेऊन दिंडीबरोबर श्री एकनाथ महाराजांचे वंशजांपैकी जे कोणी प्रमुख येत असत, ते दिंडीमध्ये विणेकऱ्यांच्या पुढे चालत. त्यांच्या अंगात कोट असे व कोटाच्या आतल्या खिशात प्रत्येक बाजूस एक पादुका ठेवीत. कोटास बटणे लावून उपरणे गुंडाळीत, पैठण पासून निजामाची हद्द संपेपर्यंत व ब्रिटीशांची हद्द लागेपर्यंत म्हणजे कुर्डू या गावापर्यंत या पादुका अशा लपवून आणत व नंतर कुर्डू गावापासून त्या डोक्यावरून वाहून आणत.

अधिक वाचा  पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास(भाग- १८)

संत एकनाथ महाराजांच्या पादुका पालखीतून सन १९००-१९१० च्या दरम्यान आणण्यास सुरुवात झाली. पुढे सन १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले, परंतु मराठवाड्यामध्ये रझाकारांची चळवळ सुरू झाली, त्यावेळेस पालखीच काय पण दिंडी घेऊन जाणेसुद्धा अवघड वाटू लागले, पण पंढरपूरच्या वारीचा नियम चुकू नये म्हणून सन १९४८ मध्ये पैठण देवस्थान आणि वारकरी यांनी सर्वानुमते पंढरीच्या वारीस जाण्याचा मार्ग बदलण्याचे ठरवले, कारण नेहमीच्या मार्गावरील कुठल्याही गावावरून गेले तरी मुसलमानांच्या दंग्याची भीती होती. यासाठी हा मार्ग बदल करण्याचे गुपचूप ठरविण्यात आले. परंतु पूर्वीच्या मार्गावरील ज्या गावातून ही पालखी जात असे, त्या गावातील लोकांना व विशेषतः त्या गावातील मुस्लिम बांधवांना ही गोष्ट कळली, तेव्हा त्यांनी पैठण या ठिकाणी जाऊन पैठणच्या देवस्थान संस्थानच्या लोकांना विनंती केली, आम्ही या पालखीचे व वारकऱ्यांचे रक्षण करतो, परंतु आपण आपल्या पालखीचा मार्ग बदलू नये. दरवर्षी प्रमाणे पालखी मिरवत- मिरवत आमचे गावातूनच गेली पाहिजे. या विनंतीचा विचार करून पैठण देवस्थान संस्थानला आपला निर्णय बदलावा लागला व पूर्वीच्या मार्गानेच सन१९४८ मध्ये पालखी सोहळा काढावा लागला व कुठेही अडथळा न येता हा पालखी सोहळा पंढरपूरला येऊन पोहोचला.(क्रमश:)

अधिक वाचा  पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग ६)

– डॉ सचिन वसंतराव लादे, पंढरपूर

     मो.क्र. ७५८८२१६५२६

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love