
पुणे(प्रतिनिधि)–फलटण येथील यशवंत सहकारी बँकेच्या घोटाळा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर खासदार मेधा कुलकर्णी आणि भाजपचे नेते व महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यातील वाद उफाळून आला आहे. “बँकेच्या २३० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. परंतु मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याने ठेवीदारांच्या ठेवी अडचणीत आल्या आहेत. राज्याच्या सहकार खात्याकडे बँकेतील अनियमिततेबाबत तीन अहवाल आले आहे. सहकार खात्याने मोठी अनियमितता असूनही कायदेशीर कारवाई अद्याप केली नाही, असा आरोप मेधा कुलकर्णी यांनी केला आहे. सहकार खाते, पोलीस खाते यांनी अद्याप कारवाई का केली नाही हाही प्रश्न आहे असेही त्या म्हणाल्या. शेखर चरेगावकर यांच्यासोबतच्या वादातून त्यांचे बंधू तथा भाजपचे पदाधिकारी शार्दूल चरेगावकर यांनी आपल्याला धमकीचा फोन केल्याचा दावा मेधा कुलकर्णी यांनी केला आहे.
मेधा कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत हा आरोप केला. दरम्यान, माझ्या संपर्कात ज्या व्यक्ती आहेत, त्यांना शेखर चरेगावकर यांचे भाऊ शार्दूल यांच्याकडून धमकावले जात आहे. तसेच सहकार खात्यातील अधिकारी यांच्यावरही दबाव टाकला जात आहे. मलादेखील ‘तुम्ही याप्रकरणात गप्प बसा; अन्यथा तुमचे गेल्यावेळी तिकीट कापले, तसे पुढेही बघून घेऊ’ अशी धमकी दिली जाते. हा प्रकार अतिशय गंभीर असून, पक्षाचे वरिष्ठ याची दखल घेतील, असा विश्वास आहे. केंद्रीय सहकार विभागाकडेही याबाबत तक्रार केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांना भेटून याबाबत तक्रार करणार आहे. गुन्हेगार असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. सामान्य नागरिकाचे पैसे यात लुबाडण्यात आले आहे. भाजपमधील पदाच्या आडून कोणी असा गैरकारभार करत असेल, तर त्याची पक्षातील वरिष्ठ गंभीर दखल घेतील, असे ट्या म्हणाल्या.
150 कोटींचा घोटाळा?
फलटण येथील यशवंत बँकेत १५० कोटीपेक्षा अधिक रुपयांचा घोटाळा झाला आहे. यात बँकेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचा प्रमुख सहभाग आहे. चरेगावकर यांनी वेगवेगळ्या बोगस कंपन्यांमार्फत कराड येथील अनेक लोकांची फसवणूक केलेली आहे. ऑडिट रिपोर्टमध्येही गैरकारभार दिसून येतो आहे. त्यामुळे या घोटाळ्याची केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागामार्गात चौकशी करून चरेगांवकर यांच्यासह दोषी संचालक मंडळावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केली. या प्रकरणाची दखल घेऊन सहकार आयुक्तांनी त्वरित कारवाई करावी, अन्यथा सहकार आयुक्त कार्यालयाला बँकेचे ठेवीदार व कर्जदारांना घेऊन घेराव आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी दिला. यावेळी फसवणूक झालेले बँकेचे ठेवीदार व कर्जदार यांच्यासह ऍड. निलेश जाधव, गणेश पवार, एस. डी. कुलकर्णी उपस्थित होते.
प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “चरेगांवकर यांनी अनेकांच्या नावावर बोगस कर्ज काढली असून, अनेकांना त्यांच्या अपरोक्षपणे जामीनदार केले आहे. ही कर्जे थकीत आहेत. कर्जाचे पैसे हस्तेपरहस्ते बोगस कंपन्यांमध्ये वळवलेले आहे. सर्व आर्थिक व्यवहारांमध्ये स्वतःचा व कुटुंबाचा फायदा केला आहे. त्याचप्रमाणे बँकेमधील पैशाचा विनियोग स्वतःच्या खाजगी मालमत्ता घेण्यासाठी केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. पीडित ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळाले पाहिजेत.”
“यशवंत सहकारी बँकेचे अनेक ठेवीदार यांनी माझी भेट घेऊन बँकेच्या घोटाळ्याची कागदपत्रे दिली. आर्थिक व्यवहारात झालेल्या अफरातफरीमुळे लोकांना त्यांचे हक्काचे पैसे मिळणे अशक्य झाले आहे. संचालक मंडळाकडून ठेवीदारांवर दबाव आणला जात आहे. अनेकांनी या फसवणुकीमुळे व दबावाला बळी पडून आत्महत्या केल्या आहेत. मात्र चरेगांवकर ठेवीदारांना आणि कर्जदारांनाच दोषी ठरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करून खोटी कर्ज प्रकरणे करून बँकेचे मोठे आर्थिक नुकसान केल्याने कर्ज बुडीत झाली आहेत. १२७ कोटी रुपयांचे कर्ज हे केवळ चरेगावकर आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावाने आहे. स्वतःच्या बँकेतून कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे त्यांनी माझ्या नावावर कोणते कर्ज नाही सांगणे बिनबुडाचे आहे. ठेवीदार यांचे पैसे बँक देऊ शकत नसल्याने ती बुडीत दाखवून ‘आरबीआय’कडून केवळ पाच लाख रुपये ठेवीदार यांना देण्याचे आश्वासन देऊन ग्राहक आणि शासन यांची फसवणूक करण्यात येत आहे. कोणताही कागदपत्राची शहानिशा न करता कर्ज वाटप झाल्याने बँकेचे अध्यक्ष आणि संचालक यांनी मोठा घोटाळा केला आहे. याची सीबीआय चौकशी करण्यात यावी. बँकेवर प्रशासक नेमण्यात यावा. चुकीचे व्यक्ती नावे कर्ज घेतल्याने बँकेचे अध्यक्ष आणि संचालक यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी,” असेही प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या.