पुणे(प्रतिनिधि)– प्रत्येकास समान मताचा अधिकार देणारे संविधान हीच भारताची ओळख असुन, संविधानाचे मुल्य जपले तरच खऱ्या अर्थाने श्रेष्ठ भारत, आत्मनिर्भर भारत होऊ शकतो. संविधानीक मुल्यांची व देशाच्या स्वायत्त संस्थांची पायमल्ली रोखत देशाची वाटचाल ‘संविधान आधारित’ होण्याकडे लक्ष ठेवणे, हे विरोधी पक्षांचे कर्तव्य असुन विरोधी पक्षांची संविधानीक कर्तव्यपुर्ती ही डॅा बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली ठरेल असे प्रतिपादन काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी अभिवादनपर कार्यक्रमात बोलतांना केले.
“महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस लिगल विभागा”च्या वतीने महामानव, भारतरत्न डॅा बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी, पुणे मनपा येथील डॅा आंबेडकरांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन कार्यक्रमात बोलतांना त्यांनी केले.
कार्यक्रमाचे संयोजक सरचिटणीस ॲड फैयाझ शेख यांनी स्वागत – प्रास्ताविक केले. ऊपध्यक्ष ॲड शहीद अख्तर यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी ॲड श्रीकांत पाटील, ॲड सुरेश नांगरे, ॲड बाळासाहेब बामणे, ॲड विजय तिकोणे, ॲड अतुल गुंड पाटील, ॲड राजाभाऊ चांदेरे, ॲड इराफन शेख, ॲड सुरेश देवकर, ॲड आलीस सय्यद, इंटकचे मनोहर गाडेकर, जेष्ठ काँग्रेसजन सुरेश नांगरे, सुभाष जेधे, गणेश शिंदे, धनंजय भिलारे, विना कदम, अनिल धिमधीमे, विक्रांत धोत्रे इ उपस्थित होते. या प्रसंगी संविधान प्रतींचे वाटप व सामुहीक वाचन करण्यात आले.
विविध धर्मिय स्वातंत्र्य सेनानींच्या प्रदीर्घ ब्रिटीश विरोधी लढ्यामुळे, बलीदानामुळे भारत लोकशाही प्रणीत प्रजासत्ताक देश म्हणून जगासमोर ऊभा राहिला. स्वातंत्र्या करीता वाहीलेल्या बलिदानाचे महत्व लक्षांत घेता, भविष्याची काळजी वहात ‘भारतिय संविधाना प्रती’ जागरूक राहून, भारतीय घटनेचे रक्षण करणे हे भारतीय नागरिकाचे देशाप्रती कर्तव्य ठरणार आहे. संविधानीक लोकशाहीत जागरुक नागरिकच् त्याच्या भविष्याचा शिल्पकार असून, भारताची संविधान आधारीत वाटचालीवर पहारा ठेवणे हीच खऱ्या अर्थाने डॅा बाबासाहेबांना आदरांजली ठरेल” अशा भावना उपस्थितींनी व्यक्त केल्या. ॲड राजेंद्र काळेबेरे यांनी आभार प्रदर्शन यांनी केले.