लाडकी बहीण योजनेला खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना जोडा दाखवा : एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा : योजनेचा थाटात शुभारंभ

लाडकी बहीण योजनेला खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना जोडा दाखवा
लाडकी बहीण योजनेला खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना जोडा दाखवा

पुणे(प्रतिनिधि)–मी सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून संघर्ष करत पुढे आलो असून, राज्यातील बहीण, भावांची आपल्याला काळजी आहे. त्यामुळेच आम्ही ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली आहे. मात्र, सावत्र भाऊ त्यालाही खोडा घालण्याचा प्रयत्न करत असून, त्यांची गाठ आता माझ्याशी आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेला खोडा घालणाऱया सावत्र भावांना जोडा दाखवा, असा थेट इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी विरोधकांना दिला.

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’चा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी केंद्रीय सहकार व हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, विधन परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे, राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, या योजनेवरती विरोधक म्हणाले लाडक्या भावाचं काय?  यांना कधी तरी लाडक्या भावावर प्रेम होतं का?  असतं तर ते सोडून गेले असते का?  पण आम्ही लाडक्या भावांनाही शिष्यवृत्ती द्यायला सुरुवात केली आहे. महिलांना तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे. सावत्र कपटी भावांवर मात करून आलो आहे. फक्त त्यांना लक्षात ठेवा. त्यांना योग्यवेळी जागा दाखवा. भीक देता का, विकत घेता का, लाच घेता का असे शब्द काढायला लागले. या बहिणींबद्दल असं बोलताना जनाची नाही तरी मनाची वाटायला हवी होती. ते या योजनेच्या विरोधात कोर्टातही गेले. कोर्टाने त्यांची याचिका फेटाळली आणि बहिणींच्या बाजूने निकाल दिला. खोडा घालायला आलेल्या सावत्र भावांना संधी येईल तेव्हा जोडा दाखवा, सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांना दीड हजारांचे महत्व कळणार आहे का?  असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी लगावला.

अधिक वाचा  पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण:राज्य सरकारमधील मंत्र्याबरोबर संबंध असल्याच्या चर्चेने गूढ वाढले

एकनाथ शिंदे म्हणाले पुढे म्हणाले, आज मोठय़ा मैदानात लाखो बहिणींना बोलावून हा सोहळा करायचा होता. पण, स्टेडियममध्ये घेतला. चार मोठे हॉल आहेत. त्यात l बहिणी लाडक्या बहिणी बसल्या आहेत. हा कार्यक्रम लाइव्ह दिसत आहे. कॅबिनेटमध्ये मी म्हटले होते, की रक्षाबंधनाच्या आधी हे पैसे पोहोचले पाहिजेत. अजित पवार, फडणवीस यांनी तीन हजार टाका आणि ट्रायल रन घ्या, असे सांगितले. त्यानंतर आज लाडक्या बहिणी सांगत आहेत खात्यात पैसे आले. तेव्हापासून राखी बांधायचा कार्यक्रम सुरू झाला. बहिणींच्या आयुष्यातील हा आनंदाचा दिवस आहे. हा आनंद साजरा करण्यासाठी नारीशक्ती येथे एकवटली आहे.

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे अनेकांना पोटदुखी, कावीळ, डोकेदुखी असे विकार जडले आहेत. विरोधकांनी आता झंडू बाम लावला, तरी त्यांचा हा आजार जाणार नाही. कारण, एवढा कठीण आजार जडला आहे. विरोधक म्हणतात, १५०० रुपयात काय होणार आहे? परंतु, गरिबीचे चटके काय असतात, हे त्यांना कसे कळणार? १५०० रुपयांचे मोल काय आहे, हे माझ्या लाडक्या बहिणींना चांगले माहिती आहे. त्यामुळे १५००  रुपयांचे मोल अधिक आहे. ५०-६० वर्षांत विरोधकांनी महिलांसाठी काय केले? आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीबीटी योजना आणली. त्यामुळे लाभार्थ्यांना थेट पैसे मिळू लागले आहेत. काँग्रेसच्या काळात दिल्लीतून पैसे पाठवले, तर निम्म्यापेक्षा कमी पैसे शेवटच्या लाभार्थ्याला मिळायचे. आता, आमच्या सरकारमध्ये तसे होत नाही. थेट लाभार्थ्याच्या खात्यात पैसे जमा होतात. आता आम्ही 1500 रुपये देत आहोत. सरकारला ताकद दिली, तर दीड हजारची मदत पावणेदोन, दोन हजार ते तीन हजार रुपये करणार आहोत, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.

अधिक वाचा  पार्थ पवार म्हणतात सत्यमेव जयते

 हे देना बँकवाले सरकार : फडणवीस 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, लाडकी बहीण योजनेचे अर्ज बाद होण्यासाठी विरोधकांनी अनेक प्रयत्न केले. पण, सर्व प्रयत्न आम्ही हाणून पाडले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डीबीटी प्रणाली आणल्याने योजनांचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतात. पूर्वीच्या योजना या दलालांच्या व्हायच्या. आता दलालांचे दुकान बंद झाले आहे. प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यात पैसे आल्याशिवाय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. हे सरकार ‘लेना बँक’वाले नव्हे, तर ‘देना बँक’वाले सरकार आहे. मागचे सरकार हे वसुली करणारे होते. लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर सावत्रभाऊंच्या पोटात दुखायला लागले. काही जण कोर्टात गेले. काहींनी अर्जामध्ये महिलांऐवजी पुरुषांचे छायाचित्र लावले. तसेच ऑनलाइन पोर्टलमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न झाला. पोर्टल बंद झाल्यावर टीका सुरू झाली. परंतु, विरोधकांचे सर्व प्रयत्न हाणून पाडत आमच्या सरकारने ही योजना यशस्वी करून दाखवली.

अधिक वाचा  काविळ झाल्याने विरोधकांना पिवळे दिसतेय--प्रवीण दरेकर

योजना तात्पुरती नव्हे, कायमस्वरुपी : अजितदादांची ग्वाही 

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना तात्पुरत्या स्वरूपाची नसून, ती पुढील काळातदेखील सुरू राहणार आहे. योजना बंद होणार, या अपप्रचाराला मायमाऊलींनी बळी पडू नये. आत्ताचे सरकार हे सातत्य ठेवणारे आहे. पुढील पाच वर्षे ही योजना सुरू राहील. परंतु, त्याकरिता तुमची साथ हवी आहे. त्यासाठी येत्या निवडणुकीत कमळ, धनुष्यबाण आणि घडय़ाळ हे चिन्ह लक्षात ठेवा, अशी सादही त्यांनी घातली.

 

 

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love