पुणे(प्रतिनिधि)–चांगुलपणाला जात-धर्माचा संबंध नसतो. चांगुलपणात अभिजन-बहुजन असा भेद करता येत नाही. वारकरी संप्रदायाची परंपरा जपून वाटचाल करीत असलेल्या ज्ञानेश्वर मोळक यांनी महापुरुषांच्या सुसंवादाची भूमिका आयुष्यभर जपली आहे, असे गौरवोद्गार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी काढले. आजच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर केवळ राजकारणासाठी केला जात आहे. पण मोळक हे विवेकी, सत्यनिष्ठ मराठा आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचतर्फे साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पुणे महापलिकेचे निवृत्त अतिरिक्त आयुक्त, परिवर्तनवादी साहित्यिक ज्ञानेश्वर मोळक यांचा बुधवारी साहित्यसम्राट पुरस्काराने डॉ. सबनीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर होते. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक विठ्ठल गायकवाड, पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, रिपाईचे नेते परशुराम गायकवाड, माजी नगरसेविका लता राजगुरू, रिपाई सेनेच्या कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पपुल मंचावर होते. सन्मानपत्र, ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप होते. पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संत-महात्मे मानवी कल्याण या एकाच विचाराने कार्य करीत आले आहेत, असे सांगून डॉ. सबनीस म्हणाले, शासकीय सेवेत कार्यरत असताना मोळक यांनी पुरोगामीत्वाची भूमिका घेऊन समाज, संस्कृतीला दिशा देण्याचे काम केले आहे. संत, महापुरुषांच्या विचारांचा त्यांच्यात अंश आहे. त्यांची धर्माची व्याप्ती शुद्ध आहे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, शांत, संयमी व्यक्तीमत्त्व असलेले ज्ञानेश्वर मोळक आदरणीय आहेत. शासकीय सेवेत असताना आणि नसतानाही जवळची व्यक्ती वाटावी असे त्यांचे व्यक्तीमत्त्व आहे.
सुरुवातीस कार्यक्रमाचे मुख्य संयोजक विठ्ठल गायकवाड यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी माहिती दिली. परशुराम वाडेकर, अरविंद शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल गायकवाड यांनी केले तर आभार दादा सोनवणे यांनी मानले.