अभंगगाथेच्या प्रेरणेतून प्रगतीची ‘एमपीएससी’त भरारी : पिंपरीकन्येने केले असाध्य ते साध्य…

अभंगगाथेच्या प्रेरणेतून प्रगतीची ‘एमपीएससी'त भरारी
अभंगगाथेच्या प्रेरणेतून प्रगतीची ‘एमपीएससी'त भरारी

पुणे(प्रतिनिधी)-एमपीएससी परीक्षेच्या पहिल्या प्रयत्नात अवघ्या दोन गुणांनी संधी हुकली…त्याने मन काहीसे हताश झाले….तेव्हा तुकोबांच्या अभंगगाथेने मोठा आधार दिला… असाध्य ते साध्य करिता सायास, या जगद्गुरूंच्या शब्दांतून प्रेरणा घेत अखेर पिंपरीतल्या चिखली, मोरेवस्ती येथील रिक्षाचालकाच्या कन्येने एमपीएससीत यशाचा झेंडा फडकवला.

प्रगती शिवाजी काशीद, असे या जिद्दी मुलीचे नाव आहे. विक्रीकर निरीक्षक आणि मंत्रालयातील सहाय्यक कक्ष अधिकारी या दोन्ही पदांना गवसणी घालण्याची किमया तिने केली आहे. बेताची आर्थिक स्थिती असतानाही जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर अवघ्या २४ व्या वर्षी तिने मिळविलेले हे यश कौतुकाचा विषय ठरले आहे.

चिखली, मोरेवस्ती येथील वारकरी संप्रदायातील काशीद कुटुंबात तिचा जन्म झाला. तिचे मूळ गाव इंदापूर तालुक्मयातील निरवांगी येथील मानेवस्ती. घरच्या गरिबीमुळे काशीद कुटुंब चिखली, मोरे वस्ती येथे स्थलांतरीत झाले. वडिल शिवाजी हे रिक्षा चालक, तर आई रेणुका गृहिणी. भाऊ वैभव बी. कॉमच्या शेवटच्या वर्षात. प्रगतीचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण कृष्णानगर येथील गणगे प्रशालेत झाले. अकरावी आणि बारावी यमुनानगर येथील मॉडर्न महाविद्यालयात, तर बीएस्सी (फिजिक्स) पिंपरीगावातील महात्मा फुले महाविद्यालयात पूर्ण केले. इयत्ता सातवीत असताना शिष्यवृतीचे मार्गदर्शक शिक्षक संतोष लोहार आणि संजय साळुंके या शिक्षकांकडून एमपीएससी परीक्षेची माहिती आणि मार्गदर्शन मिळाले. तेव्हापासून प्रगतीने एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याचे ध्येय उराशी बाळगले. बीएसस्सीची (फिजिक्स) पदवी घेतल्यानंतर प्रगतीने २०२० पासून एमपीएसी परीक्षेची तयारी सुरू केली. मात्र, पहिल्या प्रयत्नात अवघ्या दोन गुणांनी तिला अपयशाचा सामना करावा लागला. पण तुकोबांच्या अभंगगाथेतून तिला प्रेरणा मिळाली. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे, या ओळींनी तिला बळ दिले. त्यानंतर खचून न जाता तिने पुन्हा तयारी सुरू केली. पहाटे साडेपाच वाजता उठून ती अभ्यास करायची. दररोज कमीत कमी दहा तास अभ्यास करायचा, हा दंडक तिने मोडला नाही.

अधिक वाचा  राज ठाकरे यांनी केली महाराष्ट्रातील पहिल्या 'मनसे आपत्कालीन व्यवस्थापन पथका'ची पुण्यात घोषणा

एमपीएससीची तयारी करीत असताना सुरुवातीला शाहूनगर येथील नालंदा ग्रंथालयाचा तिला आधार मिळाला. याच काळात कुटुंबाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. शिक्षणाचा खर्च भागविताना रिक्षा चालक असलेल्या वडिलांची दमछाक होई. हे पाहून प्रगतीला खूप वेदना होत. संकट काळात मंचर येथील ह. भ. प. शंकर महाराज शेवाळे यांनी काशीद कुटुंबाला आर्थिक सहाय्य केले. त्यामुळे प्रगतीने पुण्यातील युनिक ऍकॅडमीतून एमपीएससीची तयारी सुरू केली. प्रगतीचा आतेभाऊ व महसूल सहायक असलेल्या अक्षय फलफले यांचेही तिला मार्गदर्शन लाभले. तसेच सहकारी सौरभ तरळ यानेही कायम पाठबळ दिले. त्यातूनच एमपीएससी परीक्षेत २५८ गुण मिळवत प्रगतीने उल्लेखनीय यश मिळविले. शिवसेना भोसरी विधानसभा उपशहरपप्रमुख नेताजी काशीद, शहर संघटक रावसाहेब थोरात. ह. भ. प. शंकर महाराज शेवाळे यांच्यासह विविध मान्यवरांनी या यशाबद्दल तिचे कौतुक केले.

अधिक वाचा  जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शुक्रवारी दुपारच्या सुमारास होणार प्रस्थान : इंद्रायणीकाठ भक्तीने गेला फुलून

यश मिळेपर्यंत प्रयत्न महत्त्वाचे : प्रगती 

शंभर घाव घातल्यानंतर कठीण दगड फुटतो. याचा अर्थ ९९ वा घाव व्यर्थ गेला असे होत नाही. त्यामुळे यश मिळेपर्यंत प्रयत्न करीत रहाणे महत्त्वाचे असते, अशी प्रतिक्रिया प्रगतीने व्यक्त केली.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love