पुणे(प्रतिनिधि)—‘फेक नॅरेटिव्ह’ हे आजच्या काळातला रावण आहे. या रावणाच्या बेंबीत बाण मारायचा आहे. त्यामुळे फेक नॅरेटिव्हला थेट नॅरेटिव्हने उत्तर देण्याची इकोसिस्टिम आपण तयार करतो आहोत. त्यासाठी सर्वांनी योगदान देण्याची गरज आहे. खोट्याला खऱ्याने उत्तर द्यायचे आहे. त्यासाठी आता आदेशाची वाट पाहू नका. मैदानात उतरा आणि हवी तशी बॅटिंग करा. फक्त हिट विकेट व्हायचे नाही, सेल्फ गोल करायचा नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना प्रचारासाठी मैदानात उतरण्याचे आवाहन केले. दरम्यान, मुख्यमंत्री कोण हा प्रश्न आता विचारू नका. मुख्यमंत्री महायुतीचाच होणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजपचे पुण्यातील बालेवाडी येथे आयोजित महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनात ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, जे फुटबॉल खेळतात त्यांना माहिती आहे, सेल्फगोल करायचा नाही. मात्र, काही लोक बोलायला उतरले की समोरच्यावर बोलण्याऐवजी आपल्यावरच बोलून जातात. ते असे काही बोलतात की त्याची उत्तरे पुढील चार दिवस द्यावे लागतात. त्यामुळे विरोधकांना उत्तर देण्यासाठी आदेशाची वाट पाहू नका. मैदानात उतरा आणि ठोकून काढा असा आदेश त्यांनी दिला.
आज जागो झालो नाही, तर जागे होण्याची संधीही मिळणार नाही
फडणवीस म्हणाले, की आज हिंदुंना, शिवप्रेमींना दहशतवादी म्हटले जाते. आज जागो झालो नाही, तर जागे होण्याची संधीही मिळणार नाही. आपल्या हिंदुत्त्वाबद्दल अपराधबोध ठेवण्याची गरज नाही. फेक नॅरेटिव्ह हा आजचा रावण आहे, त्याच्या बेंबीत बाण मारायचा आहे. केवळ दोन लाख मतांचा फरक आहे, पण लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हाच दोन लाख मते वाढली आहेत.
मुख्यमंत्री महायुतीचाच होणार
अलीकडे काम करणाऱ्यांपेक्षा सल्ले देणारे वाढले आहेत. नेत्यांकडून काही चुका झाल्या असतील तर कार्यकर्त्यांनी पोटात घ्याव्यात. नकारात्मक बोलून निष्ठेने काम करणाऱ्यांच्या मनात विष कालवू नका. कमी जागा मिळाल्यावरही कोण बरोबर राहतो हे महत्त्वाचे आहे. पावणे दोन कोटी मते घेतल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री कोण हा प्रश्न आता विचारू नका. मुख्यमंत्री महायुतीचाच होणार आहे. महायुतीचे सरकार आणणे एवढेच लक्ष्य आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.