पुणे(प्रतिनिधि)–पुणेकरांना प्रतिक्षा असलेलं पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नवं टर्मिनल आता कार्यान्वित होण्यासाठी सज्ज झालं आहे. केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या टर्मिनलची प्रत्यक्ष पाहणी करत सज्जतेचा आढावा घेतला. येत्या रविवारी (१४ जुलै) दुपारी १ वाजल्यापासून हे टर्मिनल पुणेकरांसाठी सुरू होणार आहे.
मोहोळ यांनी सर्व बाबींची बारकाईने माहिती घेतली. या पाहणीवेळी पुणे विमानतळाचे संचालक श्री. संतोष ढोके यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी यावेळी समवेत होते. मुरलीधर मोहोळ यांनी हे टर्मिनल सुरु करण्यासाठी पाठपुरावा केला होता. सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या सीआयएसएफ जवानांच्या उपलब्धतेसह विविध तांत्रिक प्रक्रिया मोहोळ यांनी स्वतः लक्ष घालून पूर्ण केली. टर्मिनल सुरु करण्याची सर्व प्रक्रिया आता जवळपास संपली असून येत्या रविवारी दुपारी १ वाजल्यापासून हे टर्मिनल पुणेकरांसाठी सुरु होत आहे.
पुणे विमानतळावरील नवे टर्मिनल सुरु करण्यासाठी केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी खासदारपदी विजयी झाल्यानंतरच पाठपुराव्याला सुरुवात केली होती. यासाठी सर्वात मोठा असलेला सीआयएसएफच्या जवानांच्या संख्येचा प्रश्न मोहोळ यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन सोडवला होता. तसेच इतर तांत्रिक प्रक्रियाही पूर्ण करुन घेतल्या आणि नवे टर्मिनल कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा केला.
नव्या टर्मिनलमधून वर्षाला ९० लाख प्रवाशांना ये-जा करता येणार आहे. सुसज्ज व्यवस्था… ६ बोर्डिंग गेट… आणि एकाचवेळी पंधराशे ते अठराशे प्रवाशांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अत्याधुनिक सोई-सुविधांसह पुण्याच्या संस्कृतीची छाप या टर्मिनलवर पाहायला मिळते आहे.
नवे टर्मिनल हे पुण्याच्या विकासाचे साक्षीदार – मुरलीधर मोहोळ
पाहणीनंतर बोलताना केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीपासूनच पुण्याच्या विकासाबाबत आग्रही भूमिका ठेवलेली आहे. म्हणून केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठा निधी गेल्या दहा वर्षांत पुणे शहराला मिळाला आहे. नवे टर्मिनल हे पुण्याच्या विकासाचे साक्षीदार असून पुणे शहरातील हे विकासपर्व पुढेही निरंतर सुरु राहील’.