पुणे(प्रतिनिधी)—पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या ‘हिट अँड रन’ प्रकरणाचा सखोल तपासणी अहवाल पुणे पोलिसांनी बाल न्याय मंडळास सादर केला आहे. या अहवालाच्या माध्यमातून अपघाताबाबतची संपूर्ण माहिती मंडळास देण्यात आली आहे.
कल्याणीनगर येथे १९ मे रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास भरधाव मोटारीने दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण-तरुणीला धडक दिली होती. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या मुलास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. अपघातानंतर अल्पवयीन मुलाला बाल न्याय मंडळाने जामीन मंजूर केला. बाल न्याय मंडळाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध सत्र न्यायालयात अर्ज करून अल्पवयीन आरोपीला सज्ञान समजावे, असा अर्ज पुणे पोलिसांनी न्यायालयात सादर केला. सत्र न्यायालायने पुणे पोलिसांना पुन्हा बाल न्याय मंडळात अर्ज करण्याला सांगितले. त्यानुसार पुणे पोलिसांनी मंडळात अर्ज केला असता अल्पवयीन मुलाला १४ दिवसांसाठी बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले.
गंभीर गु्ह्यात एक महिन्याच्या आत बाल न्याय मंडळास अहवाल देणे बंधनकारक असतो. त्यामुळे पुणे पोलिसांनी हा अहवाल बाल न्याय मंडळास नुकताच सादर केला आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे करत आहे.
बाल न्याय मंडळास सादर केलेल्या अहवालात नेमकं काय?
कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा सखोल तपासणी अहवाल बाल न्याय मंडळात सादर करण्यात आला आहे. अपघाताची संपूर्ण माहिती, हॉटेल आणि इतर ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण, मोटारीत अल्पवयीन मुलासोबत असणारा चालक, मोटारीतील मुले, पार्टीत सामील झालेले मुले, प्रत्यक्षदर्शींचे जबाब घेण्यात आले होते. याबाबतची माहिती बाल न्याय मंडळास अहवालाद्वारे देण्यात आली आहे, असे सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी सांगितले.
अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने कचऱ्यात
अपघात झाल्यानंतर ससून रुग्णालयात अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. बदलण्यात आलेले रक्तनमुने मुलाची आई शिवानी अगरवालचे असल्याचे तपासात उघडकीस आले. मुलाच्या रक्तात मद्यांश सापडू नये म्हणून ससूनमधील डॉक्टरांशी संगनमत करून शिवानी टेस्ट निगेटिव्ह यासाठी ससून मधील डॉक्टरांच्या मदतीने शिवानीचे रक्त घेण्यात आले. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने जैववैद्यकीय कचऱ्यात फेकून दिल्याचे तपासात समोर आले आहे. ससूनमधील जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम एका कंपनीकडून करण्यात येते. पोलिसांनी फेकून दिलेल्या मुलाच्या रक्ताचे नमुन्याचे काय झाले, याची माहिती कंपनीकडून घेण्यात येत आहे.
रक्तनमुने बदलण्यासाठी विशाल अगरवालकडून पैसे
अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी ससून रुग्णालयातील शिपाई अतुल घटकांबळे याला आरोपी अश्फाक मकानदार याने येरवडा येथील बाल न्याय मंडळाच्या परिसरात तीन लाख रुपये दिले होते. घटकांबळे याने अडीच लाख रुपये डॉ. श्रीहरी हाळनोर याला दिले. उर्वरित ५० हजार रुपये त्याने स्वत:कडे ठेवले. डॉक्टरांना देण्यात आलेले तीन लाख रुपये विशाल अगरवालने कल्याणीनगरमधील एका हॉटेलमध्ये अश्फाक मकानदार दिल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले.