पुणे(प्रतिनिधि)–राखीव जागेवर लबाडी करून नेते लढत आहेत. लिंगायत समाज आणि धनगर समाजाचे लोक जर एससीचे प्रमाणपत्र घेऊन जागा लढत असतील तर तो त्या समाजावरतील अन्याच नाही का? असा सवाल उपराकार लेखक आणि माजी आमदार लक्ष्मण माने यांनी उपस्थित केला. ज्यांना प्रतिनिधी म्हणून निवडून जायला पाहिजे ते या जागांवरून निवडून जात नाहीत, म्हणून राखीव जागा बंद केल्या तरी त्याला माझा पाठिंबा आहे, असे लक्ष्मण माने म्हणाले.
महाविकास आघाडीला मिळालेल्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर उपराकार लेखक आणि माजी आमदार लक्ष्मण माने यांनी शरद पवार यांची भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी, एससी समाजाच्या जागांवर इतर समाजाचे लोकं खोट्या प्रमाणपत्राच्याआधारे निवडून येत असल्यावरुन त्यांनी संताप व्यक्त केला. तसेच, नवनीत राणा यांच्या नावाचा उल्लेख करत राखीव जागांवरुन खोट्या प्रमाणपत्राचा वापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, सत्तेचं विकेंद्रीकरण न झाल्यास इथून पुढच्या काळात देश चालणं शक्य नाही. या देशात ६० ते ६५ टक्के लोकं हे मागासवर्गी आहेत, त्यामुळे मागसवर्गीयांना सत्तेत स्थान दिलं पाहिजे. आजही वरच्याच समाजातील लोकाचां आग्रह असेल, तर ८ पैकी ६ ते ७ माणसं एकाच जातीची असतील तर ही चिंतेची बाब आहे. गरीब, मागासवर्गीय समाजातील माणसांनी राजकारणात यायचंच नाही का? सध्या मध्यमवर्गीय माणूस निवडणुकीला पात्र नाही, खालचा तर सोडाच, कारण निवडणुकींसाठी किती खर्च लागतो, ज्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्यासाठीच राजकारण आहे, असे म्हणत लक्ष्मण माने यांनी खंत व्यक्त केली. दरम्यान, मी पवार साहेबांना भेटत असतो, आता झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले आहे. तर, आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ८० ते ८५ जागा मिळू शकतात, असे भाकितही माने यांनी केले.