पुणे – पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विजयासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी कंबर कसली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ यांना विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी नामदार पाटील सूक्ष्म नियोजन केले असून, गेल्या दोन दिवसांपासून सर्वच विधानसभा मतदारसंघाच्या प्रभाग निहाय बैठका घेत आहेत. या बैठकांमध्ये ते पदाधिकाऱ्यांना तोंडात साखर, डोक्यावर बर्फ आणि पायाला भिंगरी लावून घरोघरी संपर्काच्या सूचना करत आहेत.
पुणे लोकसभा मतदारसंघासाठी प्रचाराला रंगत येण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पक्षाने महाविजयाचा संकल्प केला असून, यासाठी सर्वच नेते जिवाचे रान करताना दिसत आहेत. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गेल्या आठवड्यात भाजपा पुणे शहरच्या सर्व आघाड्या आणि मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून, मुरलीधर मोहोळ यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
आता त्यांनी सूक्ष्म नियोजनावर भर दिला असून, सहाही विधानसभा मतदारसंघात प्रभाग निहाय बैठका घेत आहेत. याची सुरुवात सोमवारी कसबा विधानसभा मतदारसंघातून केली. सोमवारी कसबा विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १५ आणि २९ मधील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर कोथरुड, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट अशा मतदारसंघाची बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
पुणे लोकसभा निवडणुकीत मुरलीधर मोहोळ यांना विक्रमी मतांनी विजयी करायचे आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी हृदयामध्ये महाविजयाचा संकल्प करुन, तोंडात साखर ठेवून, डोक्यावर बर्फ ठेवून आणि पायाला भिंगरी लावून घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधावा असे आवाहन केले.