महाराष्ट्र १० वी बोर्डाचा निकाल उद्या; ८ मे रोजी : दुपारी १ वाजता ‘या’ वेबसाईटवर पाहता येणार निकाल!

महाराष्ट्र १० वी बोर्डाचा निकाल
महाराष्ट्र १० वी बोर्डाचा निकाल

पुणे(प्रतिनिधी)– महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षेचा निकाल शुक्रवार, दिनांक ८ मे, २०२६ रोजी दुपारी ठीक १.०० वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे.

राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी यासंदर्भातील अधिकृत प्रकटन प्रसिद्ध केले असून, राज्यातील नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा आता संपली आहे.

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधील विद्यार्थ्यांचे निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर एकाच वेळी प्रसिद्ध केले जातील. विद्यार्थ्यांना त्यांचे विषयनिहाय गुण पाहण्यासाठी

अधिक वाचा  'ट्रॅव्हल विथ जो' फेम युट्युबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक : कोण आहे ज्योती मल्होत्रा?

results.digilocker.gov.in

mahahsscboard.in

sscresult.mkcl.org

results.targetpublications.org

results.navneet.com

या संकेतस्थळांचा वापर करता येईल. याशिवाय, विद्यार्थ्यांना ‘डिजीलॉकर’  या मोबाईल ॲपवरही आपली डिजिटल गुणपत्रिका उपलब्ध करून देण्यात आली असून, ती डाऊनलोड करून जतन करण्याची सोय मंडळाने केली आहे. शाळांना त्यांच्या शाळेचा एकत्रित निकाल त्यांच्या अधिकृत लॉगिनमध्ये पाहता येणार आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांची पडताळणी करायची आहे किंवा उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती हव्या आहेत, त्यांच्यासाठी मंडळाने ऑनलाईन अर्जाची सोय केली आहे. यासाठी शनिवार, ९ मे २०२६ ते शनिवार, २३ मे २०२६ या कालावधीत स्वतः किंवा शाळेमार्फत ऑनलाईन अर्ज करता येईल. गुणपडताळणी, छायाप्रत किंवा पुनर्मूल्यांकनासाठी आवश्यक असलेले शुल्क विद्यार्थी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय किंवा नेट बँकिंगद्वारे भरू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करायचे आहे, त्यांना प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्यापासून पाच कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांत विहित नमुन्यात शुल्क भरून पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येईल, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.

अधिक वाचा  #Governor Ramesh Bais : भारताच्या परिवर्तनात युवा पिढीची महत्वाची भूमिका - राज्यपाल रमेश बैस

जे विद्यार्थी सर्व विषयांसह परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत, परंतु त्यांना आपल्या गुणांमध्ये सुधारणा करायची आहे, त्यांच्यासाठी ‘श्रेणी/गुणसुधार’  योजनेअंतर्गत जून-जुलै २०२६, फेब्रुवारी-मार्च २०२७ आणि जून-जुलै २०२७ अशा सलग तीन संधी उपलब्ध असतील. तसेच, परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या किंवा श्रेणी सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जून-जुलै २०२६ मध्ये पुरवणी परीक्षा आयोजित केली जाणार आहे. या पुरवणी परीक्षेसाठीची आवेदनपत्रे मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने भरून घेतली जाणार असून, त्याबाबतचे स्वतंत्र परिपत्रक लवकरच निर्गमित करण्यात येईल. या निकालाबाबत अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी आपल्या संबंधित विभागीय मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love