शिवाजी महाराजांचा अपमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता – उदयनराजे

राजकारण
Spread the love

मुंबई—भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर ‘जयहिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी-जय शिवाजी घोषणा दिल्यानंतर सभापती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना समज देत हे राज्यसभेचे सभागृह नसून आपला कक्ष आहे, येथे फक्त शपथ घेतली जाते असे सुनावल्याच्या वृत्ताने देशातील आणि राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.

‘शिवरायांचं नाव घेत सत्तेवर आलेला भाजप औरंगजेबासारखं राज्य चालवत आहे,’ अशी टीका काँग्रेसनं केली आहे तर ‘जय शिवाजी, जय भवानी’ घोषणेवर आक्षेप घेणाऱ्या नायडूंवर भाजप गप्प का? असा सवाल शिवसेनेचे खासदार सानाजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने, ‘जय भवानी, जय शिवाजी’ लिहिलेले २० लाख पत्र उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पाठविणार असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, “माझा स्वभाव पाहता मी ऐकून घेईन असं वाटतं का? या सभागृहाचा चेअरमन मी आहे, असं फक्त नायडू म्हणाले. जे घडलं नाही, ते भासवण्याचा प्रयत्न करू नका, ही माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे,” असे उदयनराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले आहे.

राज्यसभेतील २० राज्यांतील रिक्त झालेल्या ६१ जागांसाठी १९ जून रोजी निवडणुका झाल्या होत्या. बुधवारी ४३ नवनिर्वाचित खासदारांनी काल सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपाचे उदयनराजे भोसले आणि भागवत कराड तसेच शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी या महाराष्ट्राच्या सदस्यांनी शपथ घेतली. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी ही शपथ दिली.

उदयनराजे भोसले यांनी इंग्रजीत शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर त्यांनी ‘जयहिंद, जय महाराष्ट्र, ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. उपराष्ट्रपतींनी त्यास आक्षेप घेतला व अशा घोषणांची नोंदही केली जात नाही, असे सांगतले. त्यावरून राजकीय वादाला तोंड फुटलं आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून व्यंकय्या नायडू यांना ‘जय भवानी, जय शिवाजी’ असं लिहून २० लाख पोस्टकार्डे पाठवली जाणार आहेत. तर, व्यंकय्या नायडू यांनी माफी मागावी, अशी मागणी ब्राह्मण महासंघानं केली आहे.

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रवक्ते सचिन सावंत यांनीही भाजपवर तोफ डागली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने त्यांच्या वंशजांनी केलेल्या घोषणाही चालत नाही. छत्रपतींच्या वंशजांना पुन्हा‌ अतिशय मागच्या रांगेत ठेवून इतिहास पुनर्जिवित केला जात आहे. शिवरायांच्या आशीर्वाद असल्याचं सांगत सत्तेवर आलेला भाजप औरंगजेबासारखे राज्य चालवत आहे,’ अशी टीका करत सावंत यांनी भाजपचा निषेध केला आहे.

 शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या निमित्तानं ‘शिवप्रतिष्ठान’चे संभाजी भिडे यांना टोला हाणला आहे. छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? भाजपाचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झाले आहे. संभाजी भिडे यांच्याकडून सांगली, सातारा बंदची अदयाप घोषणा नाही,’ अशी खोचक टीका राऊत यांनी केली आहे.

शिवाजी महाराजांचा अपमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता

दरम्यान, “छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तिथेच राजीनामा दिला असता. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांचं वर्तन चुकीचं नाही,” अशी प्रतिक्रिया उदयनराजे यांनी दिली.

राज्यसभेची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी जय शिवाजी’ घोषणेवरुन सुरु असलेल्या राजकारणावर दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत उदयनराजे यांनी ही प्रतिक्रिया दिली. कुठल्याही प्रकारे महाराजांचा अपमान झाला याच्याएवढी हास्यास्पद गोष्ट असू शकत नाही, असंही उदयनराजे म्हणाले. शपथविधीच्या वेळी शरद पवार तिथे उपस्थित होते. तेव्हा त्यांना विचारा. कृपा करुन जे घडलं नाही ते भासवण्याचा प्रयत्न करु नका, ही माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, असे त्यांनी म्हटल आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *