मुंबई(ऑनलाईन टीम)— राज्यात आम्ही आहे तोपर्यंत राजकीय प्रादुर्भाव होणार नाही असे सांगत आम्ही फवारणीचे पंप घेऊन फिरत आहोत, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला. शिवसेनेच्या सर्व खासदारांची आज (दि.१८जुलै) कोरोनाच्या प्रादुर्भावासंदर्भात मुख्यमंत्र्यांबरोबर वर्षा बंगल्यावर बैठक झाली. त्यानंतर राऊत प्रसार माध्यमांशी बोलत होते. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतील बैठकीशी आजच्या या बैठकीचा कोणताही संबंध नसल्याचंही त्यांनी सागितलं.
आजच्या या बैठकीत राजकीय चर्चा झाली नाही. राज्यात सरकारला कुठलाही धोका नसल्याचा संजय राऊत पुनरुच्चार केला. राज्यात आम्ही असेपर्यंत राजकीय प्रादुर्भाव होणार नाही असा विश्वास व्यक्त करत त्यासाठी आम्ही फवारणीचे पंप घेऊन फिरत आहोत असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. आज साडे तीन महिन्यानंतर शिवसेनेचे सर्व खासदार एकत्र आले. प्रत्येक लोकप्रतिनिधीला आपल्या मतदारसंघातील अडचणी नेत्याने ऐकून घ्याव्या असं वाटत असतं. त्यासाठीच आजची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.
या बैठकीला लोकसभा आणि राज्यसभेचे असे एकूण शिवसेनेचे २१ खासदार उपस्थितीत होते. प्रत्येक खासदाराच्या जिल्ह्यात अधिकाऱ्यांकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राबवण्यात येत असलेल्या उपाय योजनांचा आढावा घेण्यात आला. तसेच लॉकडाऊनमुळे उद्योग – व्यवसायांवर आणि शेतकऱ्यांवर होत असलेला परिणाम याबाबत चर्चा करण्यात आली. या परिस्थितीत केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीबाबतही खासदारांच्या भूमिकेबाबत मुख्यमंत्र्यांनी मतं जाणून घेतली. यासाठी राज्य आणि केंद्र सरकारमध्ये समन्वय साधण्यासाठी आणि केंद्राने सुचवलेल्या मार्गदर्शक तत्वांची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यासंदर्भात खासदारांनी सक्रिय सहभाग घ्यावा याबाबत मुख्यमंत्र्यांकडून सूचना देण्यात आल्या.
कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावली असली आणि या बैठकीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही असे राऊत सांगत असले तरी राजस्थान येथे सुरु असलेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे पहिले जात आहे. उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर आजची बैठक घेतली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खासदारांकडून मते जाणून घेतल्याचे बोलले जात आहे.