का भडकले अजित पवार मनसेच्या नगरसेवकावर? काय म्हणाले नगरसेवक?

Ajit Pawar

का भडकले अजित पवार मनसेच्या नगरसेवकावर?काय म्हणाले नगरसेवक?

पुणे— राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वभावातील स्पष्टवक्तेपणा सर्वांनाच ज्ञात आहे. परंतु कधी कधी त्यांचे हे बोलणे फटकळपणाचे अनेकांना वाटते आणि त्यामुळे अनेकजण दुखावलेही जातात. असाच प्रकार आज पुण्यामध्ये घडला. फिजिकल डिस्टन्स ठेवण्यावरून पिंपरी-चिंचवड  महानगर पालिकेचे मनसेचे गटनेते आणि नगरसेवक सचिन चिखले यांच्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच भडकले. दादांच्या या भडकण्यामुळे दुखावलेल्या चिखले यांनीही,एवढीच काळजी होती तर अधिकारी, कर्मचाऱ्यांचा लवाजमा बोलवलाच कशाला, ऐकूणच घ्यायचं नव्हतं तर निमंत्रण दिलंच कशाला, असा सवाल केला. एवढंच नाही तर त्यांनी अजित पवारांच्या वर्तणुकीवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अधिक वाचा  ईएसआयसी एससी एसटी एम्प्लॉईज अँड ऑफिसर्स असोसिएशन, पुणेच्या वतीने भीमजयंती फेस्टिवल उत्साहात साजरा

 पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी जम्बो कोविड सेंटरच्या नियोजित स्थळाची पाहणी केली. पिंपरी चिंचवड महापालिकेतील मनसेचे गटनेते व नगरसेवक सचिन चिखले हे प्रशासनाकडून हाताळल्या जाणाऱ्या परिस्थितीची माहिती देण्यासाठी अजित पवारांकडे जात होते. त्याचवेळी अजित पवार चिखले यांच्यावर भडकले. “आमचे चार मंत्री पॉझिटिव्ह आले आहेत. लांबून बोला, फिजिकल डिस्टन्स ठेवा,” असं म्हणत अजित पवार यांनी सुनावलं. त्यावर सचिन चिखले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

याच दौऱ्यात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने महापालिकेतील सर्व पक्षाच्या गट नेत्यांनाही आमंत्रित केलं होतं. त्यानुसार आपण प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराची माहिती देण्यासाठी, कोरोनाबाधितांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याची माहिती देण्यासाठी मनसेचे नगरसेवक सचिन चिखले हेही उपस्थित होते. मात्र अजित पवारांनी एकूण घेणं तर दूरच उलट एकेरी उल्लेख करत आपल्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचं म्हणत मनसेचे नगरसेवक सचिन चिखले यांनी अजित पवारांच्या वर्तवणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love