जयपूर(ऑनलाईन टीम)— राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री व राजस्थान प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट यांच्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्षाचा शेवट अखेर पक्षात फुट पडण्यामध्ये झाला. मुख्यमंत्री गेहलोत यांच्याविरुद्ध बंड पुकारणाऱ्या सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी गोविंदसिंग डोटासरा यांची नवे प्रदेशाध्यक्षपद म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय पायलट समर्थक मंत्र्यांनाही हटविण्यात आले असून सचिन पायलट यांच्या व्यतिरिक्त विश्वेन्द्रसिंग आणि रमेश मीना यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे.
कॉंग्रेस पक्षाने सचिन पायलट यांना समजावण्याचा प्रयत्न होता होता. मंगळवारी झालेल्या कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत (सीएलपी) १०२ आमदार सहभागी झाले. या बैठकीलाही पायलट अनुपस्थित होते. बैठकीत सर्वानी सर्वानुमते पायलटयांना पक्षातून काढून टाकण्याच्या मुद्द्यावर एकमत झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
भ्रमित होऊन पायलट भाजपच्या जाळ्यात अडकले: सुरजेवाला
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले की. ‘भारतीय जनता पक्षाने षडयंत्राचा भाग म्हणून राजस्थानच्या आठ कोटी लोकांच्या सन्मानाला आव्हान दिले आहे. कॉंग्रेसचे सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा डाव होता. सत्ता आणि पैशाच्या जोरावर कॉंग्रेस पक्ष आणि अपक्ष आमदारांची खरेदी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. सचिन पायलट भ्रमित होऊन भाजपच्या जाळ्यात अडकले आणि त्यांनी कॉंग्रेसचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. गेल्या ७२ तासांपासून कॉंग्रेस हाय कमांडने सचिन पायलट व अन्य नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पायलट यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. पटवून देण्यासाठी कॉंग्रेसकडून सतत प्रयत्न केले गेले परंतु त्यांनी सर्व काही नाकारले.
कोण आहेत गोविंदसिंग डोटासरा?
गोविंदसिंग डोटासरा हे सलग तिसऱ्यांदा विधानसभेत आमदारपदी निवडून आले आहेत. 2008 पासून ते राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील लक्ष्मणगड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. डोटासरा हे 1981 पासून ते कॉंग्रेसमध्ये असून 2014 पासून राजस्थान प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आहेत.
कॉंग्रेस नेतृत्वाने डोटासरा यांना राजस्थानच्या निवडणुकीपूर्वी ऑक्टोबर 2018 मध्ये मीडिया आणि कम्युनिकेशन समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करुन मोठी जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला.