पुणे शहरात गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) या दुर्मिळ आजाराने धोका वाढला

पुणे शहरात गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) या दुर्मिळ आजाराने धोका वाढला
पुणे शहरात गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) या दुर्मिळ आजाराने धोका वाढला

पुणे(प्रतिनिधि – पुणे शहरात गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) या दुर्मिळ आजाराने धोका वाढला आहे. पुणे जिल्ह्यात शुक्रवार संध्याकाळपर्यंत ६७ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. सिंहगड रोड परिसरातील नांदेड गाव, किरकटवाडी आणि धायरी या भागांमध्ये या  आजाराचा प्रादुर्भाव जास्त असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे  स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गुलियन बॅरी सिंड्रोमचे सुरुवातीचे लक्षण अशक्तपणा आणि हातापायाला मुंग्या येणे असे आहे. पुण्यातील बाधित रुग्णांमध्ये या लक्षणांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर दिसून आले आहे.

जीबीएस हा एक दुर्मिळ ऑटोइम्यून आजार आहे. यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चुकून नसांवर हल्ला करते. यामुळे मज्जातंतूंच्या काही भागांना नुकसान होतं आणि स्नायू कमकुवत होणं, मुंग्या येणं, संतुलन गमावणं आणि त्यानंतर पक्षाघात येण्याचं कारण ठरतं.

अधिक वाचा  शौर्यदिनी विजयस्तंभास लाखो अनुयायांकडून अभिवादन : कोरेगाव भीमात उसळला भीमसागर

१३ रुग्ण व्हेंटिलेटरवर

आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीणमध्ये ३९, पुणे महापालिकेत १३, पिंपरी चिंचवड महापालिकेत १२ आणि इतर जिल्ह्यातील ३ रुग्ण आहेत. यामध्ये ४३ पुरुष आणि २४ महिलांचा समावेश आहे. यापैकी १३ रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. १९ वर्षांपर्यंतचे एकूण ३३ रुग्ण आहेत. २० ते ८० या वयोगटातील एकूण ३४ रुग्णांना या आजाराची लागण झाली आहे.

नागरिकांनी घाबरुन जाऊ नये

या आजाराबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, न घाबरता योग्य उपचाराने या आजारावर नियंत्रण मिळवता येतं. नागरिकांनी घाबरू नका असं आवाहन त्यांनी केलं आहे. अचानक वाढलेल्या संसर्गाला आळा घालण्यासाठी रॅपिड रिस्पॉन्स टीम (RRT) तयार करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, जीबीएसच्या पहिल्या संशयित प्रकरणात ६४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

अधिक वाचा  ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र अण्णाजी उर्फ रामभाऊ जोशी यांचे निधन

पालिका आयुक्तांकडून पाहणी व उपाययोजना

शहरातील वाढत्या  रुग्णांची संख्या पाहता महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी बुधवारी नांदेड गावात प्रत्यक्ष पाहणी केली.  गावात असलेल्या विहिरीत शेवाळ जमा झाले असून, याच विहिरीतून पाणीपुरवठा होत असल्याचे आढळले आहे. या विहिरींचा आणि पाणीपुरवठ्याचा अभ्यास करून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश आयुक्त भोसले यांनी दिले आहेत.

त्याचबरोबर,  नव्याने समाविष्ट गावांमधील विहिरी, पाण्याच्या टाक्या, तसेच आजाराने बाधित भाग व नागरिक यांची भेट घेतली. तसेच रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या आरोग्याची चौकशी करत विचारपूस केली. त्याचवेळी त्यांनी या परिसरातील  महापालिकेच्या संबंधित विभागांना आणि ग्रामीण जिल्हा परिषद आरोग्य विभागाला त्वरित उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले. आयुक्तांच्या आदेशानंतर ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभाग युद्धपातळीवर काम करत आहे.

अधिक वाचा  बांगलादेशातील वंशविच्छेदा विरोधात कॅंडलमार्च

डॉक्टरांचे मत आणि उपाययोजना

गुलियन बॅरी सिंड्रोम हा पोस्ट-वायरल आणि पोस्ट-बॅक्टेरियल आजार आहे.

स्नायू दुखणे आणि गुडघे दुखणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत.

दूषित पाण्यामुळे हा आजार होऊ शकतो, त्यामुळे पाणी उकळून पिणे आणि उघड्यावरचे अन्न टाळावे.

हा आजार दुर्मिळ असला तरीही प्राणघातक नाही, असे सह्याद्री हॉस्पिटलच्या डॉ. आराधना चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

 

 

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love