पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास(भाग ११)

पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास
पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास

आळंदीहून निघणार्‍या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याबरोबर सध्या शंभरहून अधिक दिंड्या असतात, ही संख्या सातत्याने वाढते आहे. पालखीबरोबर पुढे असणारे घोडे सरदार शितोळे यांचेच असतात, यापैकी पुढील घोड्यावर स्वार नसतो, तो माऊलीचा घोडा म्हणून ओळखला जातो. मागील घोड्यावर स्वार असतो. पालखीचे मुक्कामाचे तंबू , ते उभारण्यासाठी व उतरण्यासाठी लागणारा सेवकवर्ग, घोडे या सर्वांचा खर्च श्री शितोळे सरदार यांचाच असतो. त्याचप्रमाणे प्रत्येक दिंडीचेही तंबू असतात ते त्या त्या दिंडीच्या मालकीचे असतात. पालखी वाटेत चालत असताना कितीही पाऊस आला तरी वारकरी विचलित होत नाहीत अथवा पालखी सोहळा विस्कळीत होत नाही, उलट वारकरी बेभान होऊन मोठमोठ्याने अभंग – भजन गाऊन या पावसात देखील ते आनंदाने पुढे पुढे चालत राहत असतात.

अधिक वाचा  गणेशोत्सवात १० दिवस दारू बंद (ड्राय डे) ठेवण्यात यावी : गणेश मंडळांची मागणी

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये एकूण चार रिंगण सोहळे पार पडतात. पालखीच्या मार्गावर तरडगाव येथे उभे रिंगण, शंकर नगर येथे गोल रिंगण, भंडीशेगाव येथे देखील गोल रिंगण व  वाखरी- पंढरपूर रस्त्यावर विसाव्यापाशी उभे रिंगण असते. रिंगणामध्ये दोन्ही अश्व पालखी भोवती सर्व दिंड्यांमध्ये जाऊन प्रदक्षिणा घालतात. यावेळी स्वार नसलेला माऊलीचा म्हणून ओळखला जाणारा अश्व मोकळाच वेगाने जातो व मागचा स्वार असलेला अश्व त्या अश्वास जाऊन गाठतो. अश्व धावत असताना काही वेळा भाविक यात्रेकरू अश्वाच्या मार्गावर आडवे पडतात तर काही आपल्या लहान बाळाला मार्गात ठेवतात, अश्व त्यावरून उडी घेऊन पुढे धावतो, कोणालाही इजा होत नाही, हा काही नवसांचा प्रकार असतो असे सांगितले जाते. या रिंगण सोहळ्याप्रसंगी सर्व वारकऱ्यांचा उत्साह गगनाला भिडलेला असतो. माऊलीचा अश्व जसजसा पुढे पुढे धावत जातो, तसतसं वारकऱ्यांच्या आनंदाला उधान येते, ते देखील नाचून अभंग गायन करतात. एकूणच हा सोहळा पाहण्यासारखा असतो.(क्रमशः)

अधिक वाचा  पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास(भाग १०)

डॉ.सचिन वसंतराव लादे, पंढरपूर

     मो.क्र. ७५८८२१६५२६

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love