पुणे(प्रतिनिधि)- संत ज्ञानेश्वर यांच्या निस्सीम प्रेमापोटी नांदेडच्या एका उद्योजकाने संत ज्ञानेश्वरांच्या चरणी एक कोटीचा सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे. या सोन्याच्या मुकुटाचे वजन जवळपास एक किलो आहे.
भारत विश्वनाथ रामीनवार असे या भाविकाचे नाव असून ते एक प्रसिद्ध उद्योजक आहेत. मंगळवारी रामीनवार कुटुंबियांनी सोन्याचा मुकुट मंदिर समितीकडे सुपूर्द केला.
भक्ती, कला आणि तंत्रज्ञान यांचा अद्वितीय संगम असलेल्या एका अलंकारिक मुकुटाचं आज आळंदीतील श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी अर्पण करण्यात आले.
नांदेड येथील भारत रामिनवार आणि मिरा रामिनवार या भक्तदांपत्यानं सुमारे १ कोटी रुपये किंमतीचा आणि १ किलो शुद्ध सोन्यापासून बनवलेला हा मुकुट “ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी” येथे अर्पण केला.मुकुटावर कमळ, चक्र, सूर्यकिरण आदी मंगल धार्मिक प्रतीकांची कलात्मक मांडणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, वारकरी परंपरेशी नातं असलेल्या कुशल कारागिरांनी हा मुकुट भक्तिभावाने घडवला असून, त्यामुळे त्याला अधिक पावित्र्य लाभले आहे असे रामिनवार परिवाराच्यावतीने सांगण्यात आले.
या विशेष प्रसंगी प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे , व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आणि विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप हे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत माऊलींना हा अलंकार भक्तिपूर्वक अर्पण करण्यात आला.हा मुकुट विशेष धार्मिक प्रसंगी माऊलींना परिधान करण्यात येणार असून, भाविकांसाठी तो श्रद्धा, भक्ती आणि अभिमानाचं प्रतीक ठरेल. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं पारंपरिक श्रद्धेची अशी साजेशी मांडणी ही काळाशी सुसंगत अशी भक्तीची अभिव्यक्ती अशा भावना रामिनवार परिवाराच्यावतीने व्यक्त करण्यात आल्या .