पुणे(प्रतिनिधि)– संस्कृत ही मराठी भाषेची जननी आहे ही वस्तुस्थिती नाही. संस्कृतच्या पूर्वकालावधीतही मराठीतून लिखाण झाले आह असे अनेक शिलालेखांमधून आढळून आले आहे. मराठी भाषेला समृद्ध पूर्व इतिहास आहे. मराठी भाषेच्या माध्यमातून प्रचंड ज्ञान आणि लिखाण निर्माण झाले आहे. अभिजात दर्जा मागण्याचा अधिकार मराठी भाषेला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनी केले. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे काव्यस्पर्धा घेऊन त्यातील काही कविता पुस्तकरूपात आणल्या ही कौतुकास्पद गोष्ट आहे, असेही त्यांनी नमूद केले.
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे आषाढी एकादशीनिमित्त बुधवारी ‘विठू माऊली माझी’ हा रौप्य महोत्सवी कार्यक्रम आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आयोजित स्पर्धेतील कवितांचा समावेश असलेल्या ‘मराठी अभिजात’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. पुस्तकाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. बालगंधर्व रंगमंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ उद्योगपती विठ्ठलकाका मणियार, खासदार सुप्रिया सुळे, शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, वरिष्ठ पत्रकार श्रीराम पवार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, लेखक-इतिहास तज्ज्ञ संजय सोनवणी उपस्थित होते.
‘संत शेख महंमद’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण
या वेळी ‘संत शेख महंमद’ या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी संत शेख महंमद यांचे वंशज आरिफभाई शेख उपस्थित होते. मराठी भाषेसाठी ग. दि. माडगुळकर, सुधीर फडके यांनी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेखही शरदचंद्र पवार यांनी या वेळी केला.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, राजकीय मतभेद बाजूल सारून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मराठी भाषा आपली आई आहे आणि ती टिकविण्यासाठी सामाजिक अभियान राबविण्याची गरज आहे. तरुण पिढीमध्ये मातृभाषेतील साहित्यकृतींच्या वाचनाची गोडी वाढणे आवश्यक असून मराठी भाषेची आन, बान आणि शान टिकावी यासाठी भाषेविषयी चर्चा घडली पाहिजे. युवा पिढीने मातृभाषेविषयी न्यूनगंड बाळगू नये व महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी कटिबद्ध रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
सुरुवातीस लक्ष्मीकांत खाबिया यांनी संस्थेच्या 27 वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेत संस्थेतर्फे महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
श्रीराम पवार म्हणाले, मराठी ही जैव पद्धतीने विकसित झालेली भाषा आहे. ती अभिजात आहे हे सांगण्याची गरज नाही तर हे सत्य आहे.
संजय सोनवणी म्हणाले, मराठी भाषेचा प्रवास अथक आहे. काळानुरूप भाषा बदलत गेली तरी ती प्रवाही राहणे आवश्यक आहे. मराठी वाचकांची संख्या वाढली पाहिजे.
शरदचंद्र पवार यांचा सन्मान वारकरी पटका, उपरणे आणि तुळशीहार घालून करण्यात आला. तसेच सुप्रिया सुळे यांचाही सत्कार तुळशीहार घालून करण्यात आला. मान्यवरांचे स्वागत उपरणे देऊन करण्यात आले. सूत्रसंचालन रवींद्र खरे यांनी केले तर आभार अश्विनी पाचरणे यांनी मानले.
‘विठू माऊली माझी’ या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक सुरंजन खंडाळकर, स्वरप्रिया बेहेरे, सचिन इंगळे यांनी भक्तीगीते सादर केली. अमृता ठाकूरदेसाई-दिवेकर, निलेश देशपांडे, विक्रम भट, केदार मोरे, सोमनाथ साळुंखे यांनी साथसंगत केली. सचिन इंगळे यांनी संगीत संयोजन केले तर ज्येष्ठ अभिनेते रवींद्र खरे यांनी रसपूर्ण निवेदन केले. ‘विठु माऊली माझी’ कार्यक्रमाची सुरुवात ‘आधी वंदिला वरद विनायक’ या गणाने करण्यात आली. त्यानंतर ‘रुप पाहता लोचनी’, ‘आधी रचिली पंढरी’, ‘त्या फुलांच्या गंधकोषी’, ‘कमोदिनी काय जाणे’, ‘खेळ मांडियेला’, ‘कानडा राजा पंढरीचा’, ‘विठु माऊली तू’ आदी संतरचना सादर करण्यात आल्या.