पुणे(प्रतिनिधी): पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून (Khadakwasla Dam) आज, १९ जून २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजल्यापासून ४३४५ क्युसेक्स (Cusecs) वेगाने पाणी सोडण्यात येणार आहे. सध्या धरणातून २००० क्युसेक विसर्ग सुरू होता, तो वाढवण्यात आला आहे. खडकवासला पाटबंधारे विभाग, पुणे येथील मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्षाने (Central Flood Control Room, Pune) यासंदर्भात ‘सतर्कतेचा इशारा’ जारी केला आहे.
पावसाचे प्रमाण लक्षात घेता, धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) परिसरातील नागरिकांना विशेषतः नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदीपात्रात (Riverbed) काही वस्तू किंवा जनावरे असल्यास ती तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्याची सूचनाही देण्यात आली आहे. प्रशासकीय विभागांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.