पुणे- “कलाकार या नात्याने आमच्या हातात संहिता असते. दिग्दर्शकाच्या, कॅमेरामनच्या सूचना असतात. मात्र, रेषा, रंग आणि अवकाशातून स्वतंत्र कलानिर्मिती करणे, अधिक आव्हानात्मक आहे. असे आव्हान पेलून, रंगरेषांतून आनंदनिर्मिती करणारे कलाकार श्रेष्ठ वाटतात’, असे उद्गार प्रसिद्ध सिनेअभिनेते अशोक कुलकर्णी यांनी काढले.
इंडियन आर्ट प्रमोटर्स यांच्या संकल्पनेमधून आयोजित करण्यात आलेल्या ‘कला स्पंदन आर्ट फेअर’ च्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ज्येष्ठ थ्री डी कलाकार – रामजी शर्मा, रेलिकॉन शेल्टर्स प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक धनंजय निंबाळकर तसेच आयोजक सुदीप चक्रवर्ती आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
हे कलाप्रदर्शन रविवार दि. ४ मे, २०२५ दरम्यान एरंडवणे येथील डी पी रस्त्यावरील सिद्धी बँक्वेट्स या ठिकाणी कलारसिकांना पाहता येईल. दुपारी १२ ते रात्री ९ अशी कलाप्रदर्शनाची वेळ असून ते सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे, असे आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे.
यावेळी बोलताना अशोक कुलकर्णी म्हणाले, “चित्रकला हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मी प्रदर्शनातील कलाकृती पाहिल्या तेव्हा या सर्व जणांशी माझे कलामैत्र असल्याची भावना निर्माण झाली. मी पडद्यावरचा कलाकार आहे. येथील कलाकार रंगरेषांच्या व इतर माध्यमांतून कलानिर्मिती करणारे आहेत. आमच्या कलानिर्मितीची माध्यमे निराळी असली, तरी रसिकांना आनंद देणे, हे ध्येय समान आहे.” रंगरेषांशी असेच मिसळून जात, तुमची आनंदनिर्मिती सुरू राहो आणि जगात सगळीकडे सकारात्मक आणि हसरे वातावरण निर्माण होवो, अशा शुभेच्छा देखील त्यांनी दिल्या.
रामजी शर्मा म्हणाले, “कलाकार म्हणून कलाकारांची सर्वत्र एकच भाषा असते. ती सौंदर्यनिर्मितीची भाषा असते. त्या भाषेतूनच कलाकाराची ओळख निर्माण होते. तीच भाषा त्याच्या कलाकृतीद्वारा प्रकटते. अर्थात अशा निर्मितीसाठी परिश्रम आहेत, साधना आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून देशातील शेकडो गुणी, नव्या आणि होतकरू कलाकारांना प्रकटीकरणासाठी व्यासपीठ देण्याचे कार्य सुदीप चक्रवर्ती यांनी केले आहे.”
आयोजक सुदीप चक्रवर्ती म्हणाले, “कला प्रकट होण्यासाठी व्यासपीठ गरजेचे असते. तरच कलेच्या मार्गावरची पुढची पावले आणि पुढचे मार्ग दिसतात. प्रतिथयश व नवोदित कलाकार यामध्ये दुवा साधणे हे या आर्ट फेअरचे एक प्रमुख उद्दिष्ट्य आहे.” कलास्पंदन आर्ट फेअरमध्ये अमूर्त चित्रे, अल्कोहोल इंक आर्ट, ऑईल, वॉटर, अॅक्रेलिक कलर पेंटिंग्ज, मिक्स मिडीयम पेंटिंग्ज, रेझीन आर्ट, सिरॅमिक आर्ट, डेकोरेटिव्ह आर्ट्स यांबरोबरच पारंपारिक कला, कलाकृतींपासून ते डिझायनर संकल्पनांपर्यंत सर्व प्रकारच्या शेकडो कलाकृती पुणेकर रसिकांना पहाता येतील. देशाच्या विविध भागांतून आलेल्या उभरत्या कलाकारांनी त्या साकारल्या असून २५० पेक्षा अधिक कलाकारांच्या ४५०० कलाकृती यादरम्यान पुणेकरांना पाहता येतील. रथीम दत्ता यांनी या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.