वॉशिंगटन(ऑनलाईन टीम)– वादग्रस्त चिनी शॉर्ट व्हिडिओ अॅप टिकटॉकचे अमेरिकेतील भविष्य आता जवळजवळ निश्चित आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे इशारा दिला आहे की 15 सप्टेंबरपर्यंत टिकटॉकने अमेरिकेतील आपला व्यवसाय एकतर विकावा अथवा बंद करावा.
वादग्रस्त चिनी शॉर्ट व्हिडिओ अॅॅ प टिकटॉकने डेटा सुरक्षेबाबत अमेरिकेच्या मालकीकडे जाण्याचे तसे जवळ जवळ मान्य केलेलेच आहे. तरीही सोमवारी ट्रम्प यांनी टिकटॉकला पुन्हा इशारा दिला आहे. गेल्या महिन्याभराच्या प्रदीर्घ चर्चेनंतर टिकटॉकची मूळ कंपनी बाइटडांसने जवळ जवळ हा निर्णय घेतला आहे.
या अगोदर टिकटॉकने सांगितले होते की, अमेरिकेतील टिकटॉकवरील बंदी टाळण्यासाठी कंपनी अमेरिकेत काही हिस्सा विकू शकते. मात्र, त्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तयार नव्हते आणि ते तेव्हाच टिकटॉकवर बंदी घालणार होते, पण शेवटच्या क्षणी टिकटॉक अमेरिकेला संपूर्ण भागभांडवल देण्यास तयार झाल्याने ही बंदी घालण्यात आली नाही. मायक्रोसॉफ्ट आणि टिकटॉक यांच्यातील हा करार पाच अब्ज डॉलर्समध्ये होण्याची शक्यता आहे.
वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, मायक्रोसॉफ्टने जर टिकटॉक विकत घेतले तर ते अमेरिकेतील युजर्सच्या डेटासाठी ते जबाबदार असतील. युजर्सचा डेटा मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरवर संग्रहित केला जाईल. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास बाइटडांसने आपला चिनी पोशाख उतरवून फेकून दिला आहे. याबाबत मात्र,अद्याप टिकटॉक किंवा मायक्रोसॉफ्टने या दोघांमध्ये झालेल्या कराराबाबत अद्याप अधिकृत निवेदन केलेले नाही.
भारतानंतर अमेरिका टिकटॉकसाठी दुसर्या क्रमांकाची बाजारपेठ आहे. अमेरिकेत टिकटॉकचे मासिक सक्रिय वापरकर्ते 80 दशलक्ष म्हणजेच आठ कोटी इतके आहे. अशा परिस्थितीत कंपनीच्या या निर्णयामुळे त्याचे मोठे नुकसान होण्यापासून त्यांचा बचाव झाला आहे. त्याचबरोबर भारतातील टिकटॉक परतीची आशा देखील वाढली आहे.