पिंपरी(प्रतिनिधी)– प्रसिद्ध गायिका उत्तरा केळकर, गायक विनल देशमुख आणि गायिका अश्विनी मिठे यांच्या स्वरांनी सजलेला कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम पिंपळे गुरवमधील निळू फुले नाट्यगृह येथे पार पडला. प्रकाशाचा उत्सव असलेल्या भारतीय परंपरेतील सगळ्यात मोठ्या अर्थात दीपावलीचे स्वागत या कार्यक्रमाने झाले. हा कार्यक्रम जेवढा सुरेल ठरला, तेवढाच खुमासदार हाेता. जुन्या आठवणींचा पट उलगडत उत्तरा केळकर यांनी गीतरचना सादर केली.
दिवाळी पहाट कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, आयोजक माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, वारकरी महामंडळाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विजूअण्णा जगताप, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, माजी नगरसेवक राजू लोखंडे, माजी नगरसेविका चंदा लोखंडे, सुदर्शन पवार, सुनील कदम, अभिषेक जगताप, अर्जुन शिंदे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजाने उत्तरा केळकर यांनी रसिकांना खिळवून ठेवले. त्यांनी ‘अशी चिक मोत्याची माळ, चल जेजुरीला जाऊ, कुणी तरी येणार गं, बिल्यांची नागीण निघाली नागोबा दुलायला लागला, ही गाणी सादर करत रसिकांच्या मनाचा वेध घेतला. रसिकांनी टाळ्या शिट्ट्यांच्या साथीत उत्स्फूर्त दाद दिली.
गायक विनल देशमुख आणि गायिका अश्विनी मिठे यांनी ‘ऐरणीच्या देवा तुला’, ‘आली माझ्या घरी ही दिवाळी’, ‘गं साजणी’, ‘डीपांग डीपांग’, ‘छबिदार छबिदार’ लावणी, मल्हार वारी, आईचा जोगवा मागेन अशा एकाहून एक सरस गाण्यांनी उत्स्फूर्त दाद मिळविली.
‘जय जय महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्र गीताने स्वरमयी दिवाळी पहाटच्या पहिल्या दिवशीचा समारोप झाला. सदानंद गाडगीळ यांनी निवेदनातून या मैफलीला अलंकार चढवले.