कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या ‘रमी’कांडामुळे पुण्यात राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन: ‘पत्ते खेळा, मुख्यमंत्री बना’ म्हणत सत्ताधाऱ्यांना डिवचले!

माणिकराव कोकाटे यांच्या 'रमी'कांडामुळे पुण्यात राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन
माणिकराव कोकाटे यांच्या 'रमी'कांडामुळे पुण्यात राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन

पुणे(प्रतिनिधी)–राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेत ‘जंगली रमी’ खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आज पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आक्रमक आणि प्रतीकात्मक आंदोलन केले. आंदोलकांनी थेट रस्त्यावरच पत्ते आणि जुगाराचे खेळ मांडून, कोकाटेंनी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी केली.

यावेळी आंदोलकांनी ‘तीन पत्ते’, ‘जंगली रमी’, ‘कल्याण मटका’ यांसारखे जुगाराचे खेळ आणि प्रतिकात्मक नोटा आणत जोरदार घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी आपल्या गळ्यात पत्त्यांच्या माळा घातल्या होत्या, हातात पत्ते घेतले होते आणि माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा फोटो असलेले पोस्टर्स झळकावत निषेध नोंदवला. या अनोख्या आंदोलनात महिला कार्यकर्त्याही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

अधिक वाचा  लहुजी शक्ति सेनेचा भाजपा-महायुतीला बिनशर्त पाठिंबा 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी कृषीमंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवला. जगताप म्हणाले, “महाराष्ट्रामध्ये सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आणि सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते पूर्ण करण्यात सरकार स्पष्टपणे नकार देत आहे”. “या असंवेदनशीलपणावर कळस म्हणून, राज्याचे कृषिमंत्री लोकशाहीच्या पवित्र सभागृहात, म्हणजेच विधिमंडळात, ऑनलाईन जुगार खेळतानाचे चित्र सबंध महाराष्ट्राने पाहिले आहे”. शेतकऱ्यांच्या प्रश्नांप्रती इतके निष्काळजी असलेले कृषिमंत्री महाराष्ट्राला नकोच अशी भूमिका त्यांनी मांडली.

“महाराष्ट्र सरकार भिकारी आहे,  या कोकाटे यांनी केलेल्या विधानाचा निषेध करत, आंदोलकांनी उपरोधिकपणे मागणी केली की, जर माणिकराव कोकाटे यांच्यामध्येच राज्याला १० लाख कोटींच्या कर्जातून बाहेर काढण्याची ताकद असेल, तर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना तात्काळ मुख्यमंत्री करावे. “माणिकरावांच्या मते, मंत्री म्हणून मी जर रमी खेळत असेल, तर तुम्ही तरुणांनी आणि शेतकऱ्यांनीही रमी खेळा, मटका खेळा, पोकर खेळा,” असा संदेश त्यांनी दिला असल्याचा आरोप करत, हा संदेश ‘चांगला’ असल्याने त्यांनाच मुख्यमंत्री करावे अशी खिल्लीही उडवण्यात आली.

अधिक वाचा  सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय राज्य सरकारने बदलला तर मला वाईट वाटण्याचे कारण नाही - शरद पवार

प्रशांत जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस साहेबांचा सगळ्यात अवगुणी लाडका मंत्री म्हणून माणिकराव पुढे आलेला आहे. देवेंद्र फडणवीसांनी त्यांची बाजू लावून धरली, याचा अर्थ देवेंद्र फडणवीसांना हा अवगुणी मंत्री आवडतोय”. मुख्यमंत्र्यांचे माणिकरावाला पाठीशी घालणे ही त्यांची ‘लाचारी’ असल्याचेही ते म्हणाला. विशेष म्हणजे, ज्यावेळी राज्यात शेतकरी कर्जमाफीचा विषय पेटत आहे आणि ओल्या दुष्काळाची गंभीर परिस्थिती आहे, अशा परिस्थितीत कृषीमंत्री विधानभवनात रमी खेळत असतील, तर यापेक्षा महाराष्ट्राचे दुर्दैव असू शकत नाही असे आंदोलकांनी स्पष्ट केले. त्यांनी माणिकराव कोकाटे यांनी तात्काळ राजीनामा देऊन गावात जाऊन पत्ते खेळावेत आणि त्यातून उदरनिर्वाह करावा, असा सल्लाही दिला. कोकाटे यांनी केलेल्या विधानानाचा संदर्भ देत “ओसाड गावची पाटीलकी” सोडून शेतकऱ्यांवर उपकार करावेत आणि मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा असा टोलाही जगताप यांनी लगावला.

अधिक वाचा  आई.. कुस्ती जिंकली पण मी हरले.. माफ कर मला : भारताची कुस्तीगीर विनेश फोगाट हिचा कुस्तीला अलविदा

 

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love