संत एकनाथ महाराज यांची पालखी स्वातंत्र्योत्तर काळात निर्वेधपणे प्रथम बैलगाडीवरून व नंतरच्या काळात ती रथातून पंढरपूरला येऊ लागली. या पालखीचे प्रस्थान ज्येष्ठ वद्य सप्तमीला होते व एकोणीस दिवसांच्या प्रवासानंतर पालखी पंढरपूरला पोहोचते, ही पालखी इतर पालख्याप्रमाणे वाखरी याठिकाणी संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सामील न होता ती वाखरी विसाव्यापाशी सामील होते. या पालखीचा येण्याचा मार्ग – पैठण – सणसवाडी – हदगाव – कुडल पारगाव – पाटोदा – खर्डा – परांडा – बिटरगाव – कुर्डू- अरण – करकंब- व्हळे – शिरढोण -विसावा -पंढरपूर. तर या पालखीचा परतीचा मार्ग मात्र वेगळा आहे, तो मार्ग पुढील प्रमाणे – पंढरपूर -बार्डी – निमगाव – सरडे – करमाळा -जामखेड -सौताडा – डोंगरकिन्ही _ मोगेवाडी – टेंभुर्णी – येळी- शिंगोरी – पैठण. या पालखीला पंढरपूरला येताना १९ दिवस लागतात तर जाताना ही पालखी १२ दिवसात आपला प्रवास पूर्ण करते. या पालखी मार्गावर ज्ञानेश्वर महाराज पालखीप्रमाणे मिडसांगवी, पारगाव घुमरा, नांगरडोह व कव्हे या ठिकाणी चक्री रिंगणे होतात.
संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील बंधू व गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज यांचे समाधी स्थान त्र्यंबकेश्वर हेदेखील आळंदीच्या समाधिस्थानाप्रमाणेच दुर्लक्षित होते. या समाधीच्या आसपास नाथपंथी गोसाव्यांच्या अनेक समाध्या होत्या, त्यातील श्री निवृत्तीनाथांची समाधी कोणती याची अचूक माहिती कोणालाही नव्हती. सन १८२० ते १८४० या दरम्यानच्या काळात श्री शाहूदादा महाराज बेलापुरकर यांनी त्र्यंबकेश्वर येथे श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पुण्यतिथीला बेलापूरवरून दिंडी नेण्यास सुरुवात केली. त्यांचे नातू श्री भानुदास महाराज बेलापुरकर यांनी देखील ती प्रथा तशीच चालू ठेवली व पुढे सन १८६० ते सन १८६५ च्या दरम्यान श्री भानुदास महाराज बेलापुरकर यांनीच श्री निवृत्तीनाथ महाराजांची समाधी शोधून काढली व त्यानंतरच्या काळात सन१८७० मध्ये त्यांनीच श्री निवृत्तीनाथांची पालखी पंढरपूरला आषाढी यात्रेसाठी आणण्याची प्रथा सुरू केली. (क्रमशः)
– डॉ सचिन वसंतराव लादे, पंढरपूर
मो.क्र. ७५८८२१६५२६