संत ज्ञानेश्वर – तुकोबारायांचा पालखी सोहळा निघण्यापूर्वी प्रत्यक्ष संत ज्ञानदेवादि भावंडे व इतर संत मंडळी पंढरपूरला विठुरायाच्या भेटीसाठी आषाढी वारीच्या निमित्ताने येत असल्याचे अनेक पुरावे त्यांच्या अभंगातून सापडतात. ज्ञानदेवादि भावंडे व इतर संत मंडळी पंढरीरायाच्या भेटीसाठी पायी वारी करत पंढरपूरात पोहोचण्यापूर्वीच भक्तीचा भुकेला असणारा भगवंत पंढरीराया आतुरतेने या संतांच्या भेटीसाठी पंढरपूरच्या वेशीवर जाऊन वाट पहात उभा असे. ज्ञानदेवादि भावंडे व इतर संत मंडळी ज्यावेळेस पंढरपूरच्या वेशीवर पोहोचत, तेथेच भगवंताची व या संत मंडळींची भेट होत असे. या वेशीवर प्रत्यक्ष पंढरीरायाच्या चरणाची धूळ लावूनच ही सर्व संतमंडळी पंढरपूरात प्रवेश करत असत. या ठिकाणाला आज आपण विसावा असे म्हणतो. वाखरीपासून पंढरपूरच्या दिशेने निघाल्यानंतर आजही इसबावी येथे विठ्ठलाचे मंदिर आहे, ज्या मंदिराला विसावा मंदिर अथवा धूळ भेट मंदिर असे म्हटले जाते. ज्या ठिकाणी भगवंताची व संतांची भेट झाली त्या ठिकाणची धूळ ही पंढरीरायाच्या चरणाची धूळ आहे असे श्रद्धेने मानून विसावा मंदिराजवळ वारकरी वारीच्या दरम्यान आजही लोटांगण घालतात, लोळणही घेतात.
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आदि राज्यातील वेगवेगळ्या भागातून पंढरपूरला आषाढी वारीच्या निमित्ताने येणाऱ्या सर्व पालख्या आषाढ शुद्ध नवमीच्या रात्री अथवा दशमीच्या सकाळी वाखरी या ठिकाणी एकत्र येतात व तेथून आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी पंढरपूरच्या दिशेने निघतात. वाखरीहून निघणाऱ्या सर्व पालख्या विसावा मंदिराजवळ आल्यानंतर शेवटचे उभे रिंगण संपन्न करतात, कळसाचा अभंग म्हणतात-आरती करतात व येथूनच पुढे पंढरपुरात प्रवेश करतात. या ठिकाणी आल्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका रथातून उतरविल्या जात व पूर्वी विसावा विठ्ठल मंदिरात नेऊन भगवंत पंढरीराया व ज्ञानोबा माऊली यांची भेट घडवून आणली जात परंतु सध्या मात्र या पादुका केवळ विसाव्यासाठी थांबतात व यानंतर या पादुका स्वच्छ कपड्यामध्ये बांधून शितोळे सरदार यांच्या हातामध्ये दिल्या जातात, म्हणूनच या मंदिराला पादुका मंदिर असेही म्हटले जाते. हे विठ्ठल मंदिर म्हणजे शेवटच्या विसाव्याचे – थांब्याचे ठिकाण. पूर्वीच्या काळी प्रत्येक पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांची संख्या मर्यादित होती, त्या काळात या विसाव्याच्या स्थानी आल्यानंतर वारकरी लगोरी सारखा किंवा इतर मनोरंजक खेळ खेळून आपला विरंगुळाही करत असत व येथील विठ्ठल मंदिराचे दर्शन झाले म्हणजे आता वारी पोहोच झाली असे मानून तेथे थोडी विश्रांतीही म्हणजेच विसावाही घेत असत. आळंदी, देहू अथवा पुणे रस्त्याने जाणाऱ्या सर्व पालख्यांचा परतीला निघताना आषाढ पौर्णिमेच्या दिवशी पहिला विसावा-थांबादेखील याच मंदिराजवळ असतो. या मंदिराचे विश्वस्त म्हणून विठ्ठलपंत थिटे-पाटील या मूळ पुरुषांच्या वंशातील मंडळी आजही या मंदिराची देखभाल व नित्योपचाराचे कार्य करीत आहेत. आजच्या काळात श्री.काशिनाथ थिटे-पाटील व त्यांचे चिरंजीव सौरभ थिटे-पाटील हे या मंदिराची व्यवस्था पाहतात. थिटे-पाटील यांच्या परिवारातील सदस्य आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी सर्व पालख्यांचे स्वागत करताना व अध्यात्मिकदृष्ट्या मंदिरातील परंपरांचे पालनदेखील करताना दिसून येतात. (क्रमशः)
– डॉ.सचिन वसंतराव लादे, पंढरपूर
मो.क्र. ७५८८२१६५२६