पुणे(प्रतिनिधि)–महाराष्ट्राच्या राजकारणाचे लक्ष लागलेल्या पुणे जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘श्री जय भवानी माता’ पॅनलने दणदणीत विजय मिळवत कारखान्यावर पुन्हा एकदा एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी अजित पवारांनी आपला दबदबा कायम राखल्याचे सिद्ध झाले आहे.
विजयाची हॅट्ट्रिक
रविवारी पार पडलेल्या मतदानानंतर सोमवारी सकाळी मतमोजणी सुरू झाली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच अजित पवार यांच्या पॅनलचे उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने आघाडीवर होते. अंतिम निकालानुसार, ‘श्री जय भवानी माता’ पॅनलचे सर्व २१ उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीत अजित पवार यांच्या पॅनलविरोधात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी एकत्रितपणे ‘श्री छत्रपती बचाव’ पॅनल उभे केले होते. ही निवडणूक चुरशीची होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, मात्र अजित पवार, क्रीडा व युवा कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे आणि साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या पॅनलने ‘श्री छत्रपती बचाव’ पॅनलचा दारुण पराभव केला.
पृथ्वीराज जाचक अध्यक्षपदी निश्चित
या विजयानंतर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून पृथ्वीराज जाचक यांचे नाव निश्चित मानले जात आहे. निवडणुकीपूर्वी झालेल्या शेतकरी मेळाव्यात अजित पवार यांनी जाचक यांच्या नावाचे सूतोवाच केले होते. त्यामुळे आता त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा कधी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांची मिश्किल भेट
मतदानाच्या दिवशी बारामती येथील मतदान केंद्रावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची भेट झाली. यावेळी दोघांमध्ये मिश्किल टोलेबाजी झाली. “मतदान व्यवस्थित केले आहे ना, काही चुकले नाही ना,” अशी विचारणा हर्षवर्धन पाटील यांनी केली. यावर अजित पवार यांनी, “नमस्ते हर्षवर्धन पाटील साहेब… आम्ही संस्थेवर आहोत, मला माहितीच नाही,” असे उत्तर दिले. या भेटीदरम्यान दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य होते. हा कारखाना बारामती आणि इंदापूर कार्यक्षेत्रात येतो आणि हे दोन्ही नेते या कारखान्याचे प्रतिनिधी आहेत.