पुणे(प्रतिनिधि)–महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकालात १.४९ टक्के घट झाली आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९४.५८ टक्के तर मुलांचा निकाल ८९.५१ टक्के लागला आहे. दरम्यान, राज्यात यंदाही कोकण विभागाचा सर्वांत जास्त निकाल लागला असून पहिल्या नऊ विभागात प्रथम क्रमांक पटकाविला आहे तर लातूर विभाग शेवटच्या क्रमांकावर आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेमध्ये निकाल निकाल जाहीर केला.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ११ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२५ दरम्यान बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण १४,२७,०८५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,१७,९६९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी १३,०२,८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.८८ आहे.
खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ३६,१३३ एवढी असून त्यापैकी ३५,६९७ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून २९,८९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८३.७३ आहे.
या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ४२,३८८ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४२,०२४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी १५,८२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ३७.६५ आहे.
या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ७,३१० दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७,२५८ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी ६,७०५ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.३८ आहे.
गेल्या दोन महिन्यापासून विद्यार्थ्यांना आपला निकाल कधी लागणार याची उत्सुकता होती. त्यानंतर शिक्षण मंडळाने रविवारी ४ मे रोजी अधिकृत प्रसिद्धपत्राकाद्वारे निकाल कधी जाहीर केला जाणार याची माहिती दिली. त्यानुसार बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. आज दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी खुला करण्यात आला.
३३७३ केंद्रांपैकी १२४ केंद्राची चौकशी होणार आहे. या केंद्रांवर गैरप्रकार आढळल्याने चौकशी होणार आहे. या चौकशी दरम्यान त्रुटी आढळल्यास १२४ परीक्षा केंद्र बोर्ड कायमस्वरूपी बंद करणार असल्याची माहिती यावेळी शरद गोसावी यांनी दिली. पुणे ४२, नागपूर ३३, छत्रपती संभाजीनगर २१४, मुंबई ९, कोल्हापूर ७, अमरावती १७, नाशिक १२, लातूर ३७, असे एकूण ३७४ कॉपी प्रकार उघडकीस आले असल्याचंही यावेळी शरद गोसावी यांनी सांगितलं.
राज्यात मुलींनी बाजी मारली
बारावी परीक्षेत राज्यात मुलींनी बाजी मारली आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८ टक्के असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५१ टक्के आहे. या परीक्षेसाठी एकूण .
यंदा एकाही विद्यार्थ्याला १०० टक्के गुण नाहीत
पत्रकार परिषदेत माहिती देताना शरद गोसावी यांनी सांगितलं की, यंदा एकाही विद्यार्थ्याला १०० टक्के गुण मिळालेले नाहीत. पण, १९२९ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
विभागनिहाय निकाल
कोकण : ९६.७४ टक्के
पुणे : ९१.३२ टक्के
कोल्हापूर : ९३.६४ टक्के
अमरावती : ९१.४३ टक्के
छत्रपती संभाजीनगर : ९२.२४ टक्के
नाशिक : ९१.३१ टक्के
लातूर : ८९.४६ टक्के
नागपूर : ९०.५२ टक्के
मुंबई : ९२.९३ टक्के
शाखानिहाय निकाल
शाखा निकाल
विज्ञान ९७.३५ टक्के
कला ८०.५२ टक्के
वाणिज्य ९२.६८ टक्के
व्यवसाय अभ्यासक्रम ८३.२६ टक्के
आयटीआय ८२.०३ टक्के
निकाल पाहण्यासाठी रोल नंबर, आईचं नाव आवश्यक
निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर आणि आईचे पहिलं नाव आवश्यक असेल. निकालानंतर काही आठवड्यांत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येईल. तर जुलै-ऑगस्ट २०२५ मध्ये पुरवणी परीक्षा आयोजित केली जाईल, आणि त्याचा निकाल सप्टेंबर २०२५ मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.
निकाल कसा पाहाल?
सर्वात आधी महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.
होमपेजवरील HSC च्या लिंकवर क्लिक करा.
तुमच्या हॉल तिकीटावरील क्रमांक आणि इतर आवश्यक तपशील टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा. तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. सेव्ह करा आणि प्रिंट करा.
गुणपडताळणी,उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती
१. ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन यासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येणार असून यासाठी https://mahahsscboard.in या संकेतस्थळावर सर्व माहिती अटी शर्ती व सूचना देण्यात आलेल्या आहेत. या प्रक्रियेसाठीचे विहित शुल्क Debit Card/Credit Card/UPI/Net Banking या द्वारे ऑनलाईन पध्दतीनेच भरावयाचे आहे.
२. गुण पडताळणीसाठी मंगळवार, दि.०६/०५/२०२५ ते मंगळवार, दि.२०/०५/२०२५ पर्यंत विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील. गुणपडताळणीसाठी प्रती विषय रू. ५०/- इतके शुल्क ऑनलाईन पध्दतीने मंडळाकडे जमा करावे लागेल.
३. फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या परीक्षेतील विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मागणीसाठी ई-मेलद्वारे/संकेतस्थळावरुन, हस्तपोहोच, रजिस्टर पोस्टाने यापैकी एका पर्यायाची निवड करता येईल व त्यांनी मागणी केलेल्या पध्दतीने छायाप्रती उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी संबंधित विभागीय मंडळाकडे मंगळवार, दि.०६/०५/२०२५ ते मंगळवार, दि.२०/०५/२०२५ पर्यंत विहित नमुन्यात उपरोक्त संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. उत्तरपत्रिकेच छायाप्रतीसाठी प्रति विषय रू. ४००/- इतके शुल्क ऑनलाईन पध्दतीने मंडळाकडे जम करावे लागेल.
उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन
१. फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या परीक्षेतील उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून त्यापुढील कार्यालयीन कामाच्या पाच दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात प्रति विषय रु. ३००/- प्रमाणे शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील.
२. विविध स्पर्धा परीक्षा, प्रवेश पात्रता (उदा. जेईई व नीट इत्यादी) परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांची छायाप्रत व पुनर्मूल्यांकन तातडीने व प्राधान्याने करून देण्याबाबत सर्व विभागीय मंडळांना सूचना देण्यात येत आहेत. त्यासाठी त्यांनी सदर परीक्षेच्या प्रवेशपत्राची प्रत विषय शिक्षकांच्या अभिप्रायासोबत अपलोड करावी.
३. ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणाऱ्या माहिती तंत्रज्ञान (IT) व सामान्य ज्ञान (G.K.) या विषयांच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करून देण्यात येणार आहे. त्यासाठी देखील उपरोक्त पध्दतीने ऑनलाईन अर्ज करणे व ऑनलाईन शुल्क भरणे आवश्यक राहील.