पुणे(प्रतिनिधि)–पुणे शहरातील उद्योजक लक्ष्मण साधू शिंदे (वय-५५, रा.डी.पी.रस्ता, कोथरुड,पुणे) यांना सायबर चोरटयांनी संपर्क साधून व्यवसायाच्या निमित्ताने झारखंड मधील एक मोठी ऑर्डर देतो, असा बहाणा करुन बिहार मधील पाटणा जवळ जहानबाद येथे बोलावले. त्यानंतर या उद्योजकाला शेतात नेऊन त्यांच्याकडे पैशाची मागणी करुन, पैसे न दिल्याने निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिंदे बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी याबाबत कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
लक्ष्मण शिंदे हे पुण्यातील नामांकित पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ( माजी विद्यार्थी आहेत. रत्नदीप कास्टींग ( सेंट्रीफ्युगल कास्टिंग बेअरिंग) नावाने त्यांचा खेड शिवापूर परिसरात व्यवसाय आहे. कास्टींग घटकांच्या निर्मिती मधील तज्ञ त्यांना समजले जात. शिंदे यांना ईमेलच्या माध्यमातून शिवराज सागी नावाच्या व्यक्तीने संपर्क साधून झारखंड मधील ऑपरेशनसाठी खाण उपकरणांशी संबंधित कास्टिंगची सुमारे १०० कोटी रुपयांच्या संभाव्य मूल्याची मोठी ऑर्डर देतो,असे सांगून त्यांना बिहार मधील पटना येथे कामाच्या चर्चेसाठी बोलावण्यात आले. त्यानुसार ११ मार्च रोजी शिंदे हे विमानाने पटना येथे गेले. रात्री साडेआठ वाजता ते त्यांच्या मुलीशी बोलले. नंतर ते संबंधितांना भेटले. त्यावेळी शिंदे यांनी मुलीस एक व्हाटसअप मेसेज केला की, ‘मी झारखंड मध्ये १२०० फूट खाली असलेल्या प्लांट क्रमांक ३ मधील कोळसा खाणीत मशीन आणि टुल पाहण्यासाठी जात आहे. केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या कोल इंडिया लिमिटेडचे एकूण सात प्लांट आहेत.
परंतु, त्यानंतर रात्री दहा वाजल्यापासून ते संपर्काच्या बाहेर गेले. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन बंद लागत होता तसेच त्यांच्या फोनवरुन पाठवलेले सर्व मेसेज डिलीट करण्यात आले होते. त्यामळे शिंदे बेपत्ता झाल्याबाबतची तक्रार त्यांच्या कुटुंबियांनी तातडीने पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर कोथरुड पोलीसांचे एक पथक पाटण्याला रवाना झाले.पाटण्यातील विमानतळ पोलीस स्टेशन मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मदतीने त्यांचा शोध सुरु करण्यात आला. त्यावेळी शिंदे यांचे पाटणा विमानतळा बाहेरुन अपहरण झाल्याचे आढळून आले.
त्यानुसार पोलीसांनी गुन्हा दाखल करुन त्यांचा नालंदा, गया, पाटणा येथील पोलीस पथकांचे मदतीने विविध ठिकाणी शोध सुरु केला व संशयितांना ताब्यात घेण्यात आले. परंतु, दुर्देवाने त्यांचा मृतदेह १४ एप्रिल रोजी बिहारमधील जहानाबाद येथे घोसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मृतदेह मिळून आला. मृतदेहाची पाहणी केली असता दोन दिवसांपूर्वी त्यांचा खून झाला असावा,असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. दरम्यान बिहार व पुणे पोलिसांनी मिळून या गुन्हयातील आरोपींची ओळख पटवून १५ ते १६ आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी शिंदे यांच्या बँक खात्यावरुन तब्बल ९० हजार रुपये काढून घेतल्याचे दिसून आल्याची माहिती पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.