पुणे : मुळशी तालुक्यातील आंबवणे ग्रामपंचायतचे माजी सरपंच मच्छिंद्र चंद्रकांत कराळे यांनी २७ लाख रूपयांचा घोटाळा केला आहे. तसेच वर्ष २०१८ ते २०२३ या कालावधीत आंबवणे ग्रामपंचायतासाठी १५ टक्के मागासवर्गीयांसाठी उपलब्ध असलेल्या निधीमध्ये जवळपास १कोटी २६ लाख ४० हजार ६२७ रूपये, ५ टक्के अपंग निधीमध्ये २० लाख ५७ हजार १३७ रूपये आणि गावातील कॉक्रीट रोड मध्ये ५ कोटी ४६ लाख ८२ हजार ५४२ रूपयांची तफावत उघडपणे दिसून येत आहे. त्यामुळे घोटाळेबाज सरपंच कराळे यांच्यावर शासनाने कठोर कारवाई करून त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी. अशी मागणी आंबवणे ग्रामपंचायतचे उपसरपंच निलेश लक्ष्मण मेंगडे, माजी सरपंच व विद्यमान सदस्य सुनिल हुंडारे, ज्ञानेश्वर लोखरे, सौ. कोमल फाटक, सौ. अक्षरा दळवी आणि सौ. मेघा नेवासकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
परंतू १३ महिन्यांपासून सरपंचपदावर आरूढ असलेल्या घोटाळेबाज सरपंच मच्छिंद्र यांच्या पत्नी शिता मच्छिंद्र कराळे ह्या हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न करीत असल्याचा आरोप ही त्यांनी केला आहे.
उपसरपंच निलेश मेंगडे यांनी सांगितले की, मच्छिंद्र कराळे यांनी ५ वर्षाच्या काळात १० ते १२ कोटी रूपयांचे कामे केली. त्यातून करोडो रूपयांची अफरातफर केल्याचा संशय आहे. वर्ष २०२२ मध्ये २७ लाख रूपयांचा रोड कागदोपत्री बनविण्याचा दाखविला आहे. परंतू प्रत्यक्षात रोडच नाही. ही बाब नवीन सदस्यांच्या लक्षात आल्यावर संबंधीत विभागाकडे अर्ज करून चौकशीची मागणी केली. शासनाने कमिटी नेमून चौकशीचा अहवाल सादर केला. यामध्ये आम्ही मांडलेले मुद्दे योग्य असल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतू त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने डेप्यूटी सीईओ नवले साहेब यांच्याबद्दल मनात शंकेची पाल चुकचुकत आहे.
ग्रामपंचायत सदस्य सुनिल हुंडारे यांनी सांगितले की, लोकांकडून हप्ते वसूली करणे, ग्रामपंचायत मध्ये नवा बंगला किंवा प्रकल्प सुरू करावयचा असेल तर एनओसीसाठी पैसे उकळणे, निर्मिती कार्यासाठी लागणारे सर्व साहित्य जसे की दगड, माती, विटा, रेती माझ्याकडूनच घेण्याची अट मच्छिंद्र कराळे घालत आहेत. लोकांना धमकावणे, शिव्या देणे, खोट्या केस दाखल करणे आणि पैशांच्या जोरावर अधिकार्यांना मॅनेज करण्याचा कारभार ते सतत करत असतात. याच त्रासाला कंटाळून एक व्यक्तीने लाचलुचपत (एंटी करप्शन विभागाला) तक्रार दिल्यानंतर विभागाने सापळा रचून त्यांना रंगेहाथ पकडले होते.
सौ. कोमल फाटक यांनी सांगितले की, अॅम्बी व्हॅलीतील कार्यक्रमासाठी एनओसी, ग्रामपंचायत हद्दीत होणार्या शूटिंगसाठी संबंधीतांकडून पैसे उकळणे, पैसे न दिल्यास कार्यक्रम बंद करण्याची धमकी देणे, अॅम्बी व्हॅली मॅनेजमेंटला धमकावणे, अॅम्बी व्हॅलीचे कामे मिळाली नाही तर थकीत टॅक्स वसूलीची धमकी देत होते. सरपंच पदाच्या पाच वर्षाच्या काळात नियमानुसार कोणतेही टेंडर काढण्यात आलेले नाही. तसेच आपल्याच मर्जीतल्या ठेकेदारांना हाताशी धरून मोठा भ्रष्टाचार केला आहे.
सौ. अक्षरा दळवी यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीच्या महत्वपूर्ण योजनांना डावलून उपलब्ध निधीचा वापर स्वतःचा फायद्यासाठी केला. रस्त्यांच्या कामासाठी त्यांनी स्वतःचा काँक्रीट प्लांट काढला. त्यानंतर ग्रामपंचायतमध्ये सतत काँक्रेट ची कामे काढणे, नियमांना धाब्यावर बसवून गावातील लोकांचे अंगण व खाजगी रस्ता ग्रामपंचायत निधीमधून बनविण्यात आले आहेत. हा निधी महिला बालकल्याण, अपंग व मागासवर्गीयांसाठी होता तो रस्त्यांवर खर्च करून मोठा भ्रष्टाचार केला आहे.
पंचायत राज्य व्यवस्थेत पंचायत आणि ग्रामीण भागाच्या विकासाची जबाबदारी असलेले लोकच भ्रष्टाचारात गुंतलेले असतात. परिस्थिती अशी आहे की वर्तमान सरपंच शिता मच्छिंद्र कराळे आणि माजी सरपंच मच्छिंद्र चंद्रकांत कराळे यांनी मिळून संपूर्ण आंबवणे गावाचा विकास निधीचा दुरुपयोग केला.
उपसरपंच निलेश मेंगडे