सार्वजनिक गणेशोत्सव:लोकमान्यांच्या राष्ट्रीय चळवळीची गर्जना..!!

लेख
Spread the love

स्मरण लोकमान्यांचे- भाग २

लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी श्रीगणेशा केलेला सार्वजनिक गणेशोत्सव केवळ धार्मिक न राहता तो राष्ट्रीय चळवळीचा प्रेरक वाहक बनला. “अहद् तंजावर तहत् पेशावर” अशा अखंड भारतात टिळकांच्या राजकीय आयुष्यक्रमातच गणेशोत्सवाने राष्ट्रीयत्वाच्या गर्जनेपर्यंत मजल गाठली. त्याने भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एक सोनेरी पान लिहिले.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी आपल्या राजकीय आयुष्यक्रमात हाती घेतलेल्या राजकीय चळवळींमध्ये सर्वाधिक यशस्वी ठरला तो गणेशोत्सव. या उत्सवाने स्वातंत्र्यलढ्याचे नुसते रूपच पालटले असे नाही, तर त्याचा आशयही पालटून टाकला. मवाळ पक्षाचे मर्यादित आणि दिवाणखानी राजकारण लोकमान्यांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत नेले. किंबहुना जनसामान्यांना गणेशोत्सवाने राजकारण, समाजकारणात ओढले.

खरे म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील सोनेरी पान आहे. टिळकांपासून ते सावरकर – सुभाषबाबूंपर्यंत सर्व राजकीय धुरिणांचा इतिहास कोठे ना कोठे सार्वजनिक गणेशोत्सवाशी जोडला गेला आहे. स्वातंत्र्यलढ्यातील प्रबोधन आणि वैचारिक भरणपोषणात गणेशोत्सवाने बजावलेली कामगिरी खरोखर अतुलनीय आहे.

गणेशोत्सवापूर्वी, जो समाज पूर्ण झोपलेल्या अवस्थेत होता, त्याला जागे करणे खूपच कठीण होते. त्या काळातले जोग महाराजांचे चरित्र वाचले तर आपल्या हिंदू समाजाची अवस्था किती बिकट होती, याची प्रचिती येते. ठिकठिकाणी चकाट्या पिटणारे तरूण सर्वत्र पसरलेत. पुण्यासारख्या शहरात ही अवस्था तर इतरत्र पाहायलाच नको, असे हे वर्णन आहे. टिळकांच्या त्या काळच्या अग्रलेखांमध्येही त्याचेच प्रतिबिंब दिसते. टिळक म्हणतात, “आधीच आमचे लोक काही करत नाहीत. लोकांनी काही केले तर इंग्रज सरकारला पटत नाही. ते मनाईहुकूम बजावतात. आमचे लोक पुन्हा थंड बसतात. ही अवस्था मृतवत समाजाची आहे.” आम्ही कधी जागे होणार आहोत की नाही?, असा उद्विग्न करणारा प्रश्नही ते विचारतात. समाजाची ही दारूण अवस्था बदलण्याची शक्ती टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवांमधून निर्माण केली.

गणेशोत्सवाच्या सुरवातीलाच इंग्रजांनी अडथळे निर्माण केले. कायद्याच्या खोडांमध्ये अडकवून लोकांवर बंदी घातली. “छत्रपती शिवाजी महाराज की जय” ही घोषणा दिली तर लोकांना ४०० रूपये दंड लावला. लोकांनी दंड भरले. पण “शिवाजी महाराज की जय” म्हणालेच. ही ईर्षा, विजिगिषू वृत्ती लोकमान्यांनी समाजमनात निर्माण केली. १८९७ चा प्लेग, पुण्याचा कमिशनर रँडची हत्या आणि १९०९ मध्ये नाशिकमध्ये झालेली कलेक्टर जॅक्सनची हत्या हे सार्वजनिक गणेशोत्सवावर कुठाराघात ठरले असते. या दोन्ही वेळी इंग्रजांचे दमनचक्र असे काही फिरले की समाज पुरता हबकून गेला होता. अर्थात त्याही वर्षांमध्ये गणेशोत्सव झालेच. किंबहुना या दोन आघातांनंतर गणेशोत्सवाचे स्वरूप वर्धिष्णू राहिल्याचे दाखले जागोजागी मिळतात.

गणेशोत्सवातील मेळे, व्याख्याने आणि करमणूक हा तर महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीचा जिवंत इतिहास आहे. मेळ्यांमधून घडलेल्या कलावंतांनी तर मोठा इतिहास घडवलाय. जयोस्तुते लिहिणाऱ्या सावरकरांचा पोवाडा पुण्यात मानाचा पहिला असलेल्या श्री कसबा गणपती समोर सादर झालाय. रँड प्रकरणात ज्या द्रविड बंधूंवर दगाबाजीचा आणि देशद्रोहाचा शिक्का बसला, त्या द्रविड बंधूंनी गणेशोत्सवातला पहिला मेळा काढल्याचा इतिहास आहे. गानहिरा हिराबाई बडोदेकर, अब्दुल करीम खाँ यांच्यासारखे बडे – बडे अभिजात संगीतकार, गदिमा, सुधीर फडके आदींचे कलाविष्कार प्रथम गणेशोत्सव मंडपात सादर झाले आहेत. रंगभूमीवरच्या मोठमोठ्या कलावंतांनी तोंडाला पहिला रंग लावलाय, तो गणेशोत्सवाच्या रंगभूमीवर. पुलंनी लोकमान्यांच्या गणेशोत्सवाने महाराष्ट्रात सांस्कृतिक क्रांती केल्याची साक्ष दिली आहे. लोकमान्यांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे मूल्यमापन करताना हा पैलू सर्वांसमोर असूनही तो दुर्लक्षित राहिलाय.

लोकमान्यांच्या हयातीतच गणेशोत्सव त्यावेळच्या अखंड भारतात म्हणजे ‘अहद् तंजावर, तहत् पेशावर’ पर्यंत पोहोचल्याच्या नोंदी मिळतात. टिळक जातील तेथे गणेशोत्सव सुरू झालाच पाहिजे, हा जणू दंडकच तयार झाला. कानपूरच्या प्रसिद्ध  घंटाघर चौकातल्या गणपती मंडपाचे भूमिपूजन टिळकांनी केले आहे. लखनौ, कलकत्ता, मद्रास, आजच्या पाकिस्तानातील सक्कर, हैदराबाद, कराचीच्या गणेशोत्सवांना टिळकांनी भेटी दिल्याच्या नोंदी आहेत. या भेटींमधून टिळकांची व्याख्याने नुसतीच गाजली नाहीत, तर तिचा परिणामही नोंदला गेलाय आणि तो नोंदवलाय, व्हँलेंटाइन चिरोल यांनी. टिळकांचा जनमानसावरचा प्रभाव रोखायचा असेल तर गणेशोत्सव “आटोक्यात” आणायची सूचना चिरोल यांनी सरकारला केली होती. टिळकांच्या नेतृत्वाखाली लोकांनी तिची वासलात लावली.

गणेशोत्सवातील आणखी सांगण्यासारखा पण दुर्लक्षित राहिलेला पैलू म्हणजे, प्रदर्शने. ज्या मवाळांचा प्रभाव मोडण्यासाठी टिळकांनी गणेशोत्सवाचा पुरेपूर वापर केला, त्याच मवाळांनी उत्सवात भाग घेतल्याच्याही नोंदी आहेत. न्यायमूर्ती रानडे, गोपाळ कृष्ण गोखले हे पानसुपारीला सार्वजनिक गणेशोत्सवात गेल्याच्या नोंदी आहेत. पण याही पेक्षा सर्वात मोठी गोष्ट घडली ती म्हणजे न्यायमूर्तींच्या पत्नी रमाबाई रानडे यांनी पुण्यात गणेशोत्सवात औद्योगिक, कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन भरविले होते. या प्रदर्शनात ५० हून अधिक स्टॉल होते आणि त्यामध्ये महिलांनी तयार केलेल्या वस्तू मांडून विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. या बातमीची नोंद इंग्रजांच्या अधिपत्याखालील टाइम्स ऑफ इंडियानेही घेतली होती.

लोकमान्यांनी घरात बसणारा गणपती मांडवात आणला. धार्मिक आशय व्यापक करून त्याला राष्ट्रीय आशय दिला आणि त्याच्यापुढे स्वराज्यप्राप्तीचे जबरदस्त ध्येय ठेवले. हे लोकमान्यांचे भारतीय समाजाप्रती योगदान आहे. “श्रीशाय जनतात्मने” या संस्कृत वचनातून याची प्रचिती येते.

१९०७ साली लोकमान्यांनी विसर्जन मिरवणुकीनंतर केलेल्या भाषणातूनही याची प्रचिती येते. ते म्हणतात, “स्वराज्य हा शब्द काही बंगालमधील चळवळीतून उगवलेला नाही. गणपतीकडे स्वराज्य मागण्याची प्रथा आमच्याकडे पूर्वापार चालत आली आहे. मंत्रपुष्पांजलीतले स्वाराज्यं, वैराज्यं हे नुसते शब्द नाहीत. तो स्वराज्यमंत्र आहे. गजाननाच्या विसर्जनानंतर येथील स्वदेशी, बहिष्काररूपी वाळू तुम्ही घरी नेऊन पसरा आणि स्वराज्यासाठी यत्न करा.”

लोकमान्यांचे हे स्फूर्तिदायक शद्बच स्वराज्याचा मंत्र ठरले आणि पुढचा इतिहास घडला…!!

– विनायक ढेरे

9284539978

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.त्यांचा विविध विषयांचा व्यासंग आहे.)

(विश्व संवाद केंद्र व प्रांत प्रचार विभाग द्वारा प्रकाशित)

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *