भाषेचा सन्मान करणे सर्वांचे दायित्व – पंतप्रधान नरेंद्र मोदी : दिल्ली येथे आयोजित 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी (दिल्ली) : महाराष्ट्राला सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. संतांच्या मांदियाळीमुळे आध्यात्मिक उर्जा मिळाली आहे. संतांनी उर्जारूपी ज्ञान समजण्यास मराठीत सुलभ केले आहे. राष्ट्रपुरुषांनी सरळ-सोप्या मराठी भाषेद्वारे शोषित, वंचितांसाठी सामाजिक द्वारे खुली केली आहेत. भाषा भेदभाव मानत नाही, ती कुणाची वैरी नसते. त्यामुळे भाषेत कोणी भेदभाव करण्याचा प्रयत्न केल्यास भाषाच त्यास प्रतिउत्तर देते. आपल्या भाषेचा सन्मान हे आपल्या सर्वांचे दायित्व आहे. भाषेत भक्ती, शक्ती आणि युक्ती आहे. भाषेला समृद्ध करणे ही आपली सामुदायिक जबाबदारी आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मातृभाषे विषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.

अखिल भारतीय साहित्य महामंडळतर्फे आणि सरहद, पुणे आयोजित 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज (दि. 21) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. विज्ञानभवन येथे संमेलनाचा दिमाखदार सोहळा आयोजित करण्यात आला होता.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. 98व्या संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार, मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे, कार्याध्यक्ष उज्ज्वला मेहेंदळे, सरहद, पुणेचे अध्यक्ष संजय नहार, महामंडळाचे कोषाध्यक्ष डॉ. प्रकाश पागे मंचावर होते.

अधिक वाचा  ‘हिंसेला चिथावणी देणाऱ्या ‘गायकवाड - बोंडें'वर गुन्हे दाखल करा : काँग्रेसची मागणी

महाराष्ट्र आणि देशभरातून दिल्लीत आलेल्या सर्व मराठी सारस्वतांना माझा नमस्कार या वाक्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगत्‌‍गुरू तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज यांच्यामुळे मराठी भाषा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली. त्यांना माझा प्रणाम. मराठी भाषा अमृताहूनी गोड आहे. त्यामुळे मी सातत्याने मराठी भाषा बोलण्यासाठी प्रयत्न करत आहे. मराठी भाषेविषयी माझ्या मनात प्रेम आहे. महाराष्ट्रातील महापुरुषांनी भाषा समृद्ध केली आहे. मराठी आता विज्ञानाची भाषा झाली असल्याचेही मोदी यांनी सांगितले. मराठीसाठी योगदान देणाऱ्या संत, राष्ट्रपुरुषांनी केलेल्या कार्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरव केला.

संतांनी समाजाला दिशा दिली आहे, असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले, काही दशकांपासून मराठीचे सारस्वत मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावी याची प्रतिक्षा करत होते. ते काम पूर्ण करण्याचे भाग्य मला मिळाले. भाषा केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती संस्कृतीचे वाहक असते. भाषा समाजात जन्म घेते आणि नंतर समाजाची निर्मित महत्त्वाची भूमिका निभावते. मराठी भाषेत संवेदना, सौंदर्य, समानता, विरता, अध्यात्म आहे. देशातील विविधतेतील एकतेचा सर्वत्र मोठा आधार भाषा हा आहे. भाषा आईप्रमाणे असते ती कधीच भेदभाव करत नाही. मराठीचा जन्म संस्कृतमधून झाला. त्यात प्राकृतचा प्रभाव असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले. भविष्यात होणाऱ्या 100व्या संमेलनानिमित्त युवकांसाठी विविध उपक्रम राबवावेत, अशी सूचना त्यांनी केली.

अधिक वाचा  पूजा खेडकरचा ठावठिकाणा लागेना? : खेडकर दाम्पत्याच्या घटस्फोटाबाबतचा अहवाल केंद्र सरकारला सादर

मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा देऊन स्वागताध्यक्ष शरद पवार म्हणाले, राजकीय संक्रमण काळात भाषिक अभिसरण देखील झाले. मराठी माणसे दिल्ली आणि दिल्लीच्या अवतीभवती स्थिरावली. त्यांनाही मराठीशी जोडून घेण्यासाठी दिल्लीत आयोजित केलेले साहित्य संमेलन महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ते पुढे म्हणाले, अलीकडच्या काळात टीका करणारा, विरोधात लिहिणारा तो विरोधक मानण्याची प्रथा रूढ होत आहे. ही असहिष्णुता योग्य नाही. सध्या समाजात एकात्मतेची वीण उसवत चालली आहे. समाज अत्यंत कठीण आणि नाजूक परिस्थितीतून जात आहे. अशा काळात साहित्यिकांची जबाबदारी वाढली आहे. नव्या पिढीला पुस्तकांशी बांधून ठेवण्यासाठी नव्या माध्यमांचा कल्पकतेने वापर करायला हवा. नव्या पिढीमध्ये साहित्याची गोडी टिकून राहिली तरच साहित्याला भवितव्य आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरचे हे पहिले संमेलन आहे. मराठी समृद्ध आणि लोकांची भाषा आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मराठी जन आग्रही होते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार मानतो. ते पुढे म्हणाले, राज्यकारभारात मराठी भाषेसाठी छत्रपती शिवाजी महाराज आग्रही होते. हा स्वाभीमानी बाणा आपण महाराजांकडून शिकलो आहोत. अशा संमेलनांमुळे बोली भाषांना महत्त्व मिळत असल्याचेही ते म्हणाले.

अधिक वाचा  मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा : एखादी भाषा 'अभिजात' कशी ठरते?,अभिजात दर्जाने काय बदल होतात?

प्रास्ताविकात संजय नहार म्हणाले, दिल्लीत संमेलन होत आहे हा महाराष्ट्राच्या दृष्टीने ऐतिहासिक क्षण आहे. क्रांती विचारातून होते या भावनेतून आम्ही कार्यरत आहोत.

स्वागतपर मनोगत व्यक्त करताना प्रा. उषा तांबे म्हणाल्या, संमेलनाचे निमंत्रण पंतप्रधान मोदी यांनी स्वीकारले यातूनच त्यांना भाषांबद्दल असलेली संवेदनशीलता दिसून येते. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर दिल्लीत संमेलन होत आहे ही विशेष अभिमानाची बाब आहे. या संमेलनामध्ये चाकोरीबाहेरील कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल रखुमाईची मूर्ती देऊन करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत डॉ. उषा तांबे, उज्ज्वला महेंदळे, अनुज नहार, डॉ. शैलेश पगारिया, शैलेश वाडेकर यांनी केले.

मिलिंद कुलकर्णी आणि समीरा गुर्जर यांनी सूत्रसंचालन केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love